डाॅ. मीना श्रीवास्तव

? मनमंजुषेतून ?

☆ आली दिवाळी मंगलदायी… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

‘दिवाळी आणि दवाखाना’ या द्वयीचा दुरून देखील संबंध येऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटत असतांनाच हाच तो क्षण आणि हीच ती वेळ साधून नवीन मॅटर शब्दांकित करावे असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच. मात्र हा बादरायण संबंध नसावा असे मला कळकळीने वाटते. हे सुजाण प्रेक्षकांनी समजून घ्यावे.

या बादरायण संबंधाच्या मुळाशी जायला गुगल बाबांकडे गेल्यावर मजेदार माहिती मिळाली.

युष्माकं बदरी वृक्ष: अस्माकं बदरी चक्रम्| बादरायण संबंधात यूयं यूयं वयं वयम्||

– – या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुमच्या घरी बोराचे झाड आहे आणि आमच्या रथाच्या चाकाचे लाकूड बोरीचे आहे. तेव्हा तुमचा आणि आमचा बादरायण संबंध तयार झाला. या संबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत. म्हणून बादरायण संबंध! म्हणजे ओढून ताणून आणलेला संबंध!

विषयांतर करण्याची मला कधी कधी हुक्की येते. तेच जिवाणू… तेच संसर्गजन्य रोग…. तीच प्रतिजैविके! एखाद्या चांगल्या प्रसिद्ध झालेल्या टीव्ही मालिकांत पाणी टाकून टाकून त्या कशा पुढे ढकलल्या जातात हे त्या मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच माहित असते. तरीही त्या रोज बघणे हा त्यांच्या टाइमटेबलचा भाग असतो. मात्र माझ्या लेखांद्वारे तुम्हाला हा फील येऊ नये म्हणून मी नवनवीन जिवाणू. संसर्गजन्य आजार आणि प्रतिजैविके यांची नावे वेगवेगळी आहेत हे निक्षून सांगत असते. आमच्या फार्माकॉलॉजीच्या विषयाचा ऐन परीक्षेआधी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र ही नावे एकसारखी वाटतात. कधी तर हद्द म्हणजे प्रतिजैविक कुठले आणि जिवाणू कुठले यात देखील त्यांचा गोंधळ उडतो. असो! एका वर्षाचे अन्न एका महिन्यात पचवण्याची त्यांची ही ओढाताण मी समजू शकते.

माझे नियोजित आख्यान मुद्दाम पुढे ढकलले. कारण सणासुदीच्या दिवसात ही रुक्ष माहिती म्हणजे स्वादिष्ट पक्वान्ने आणि रुचकर फराळाची अपेक्षा असताना नेमकी कारल्याची भाजी समोर यावी असे वाचकांना वाटले असते. या रविवारची तिथी बघता त्यात छोटी दिवाळी (नरक चतुर्दशी) आणि मोठी दिवाळी (लक्ष्मी पूजन) अशा दोन लहान-थोर दिवाळ्या एकत्रच आल्या आहेत.

मंडळी. आताचे तापमान आणि आमच्या लहानपणच्या तापमानात इतका भयानक बदल झालाय! नरकचतुर्दशीच्या पहाटे उठून सूर्योदयाच्या आधी साग्रसंगीत अभ्यंगस्नान म्हणजे एक शिक्षा वाटे. कडाक्याची थंडी असतांना घरच्या मोठ्या मंडळींपासून लहान मुलांपर्यंत असा क्रमवार उठण्याचा कार्यक्रम असला तरी तो गारवा परत कधी अनुभवास येईल काय असे आता वाटते. या चढत्या तापमानाला आणखीनच धार आणायची की ती बोथट करण्याचा प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचे आहे. पहाटे उठण्याचा सोपस्कार नरकचतुर्दशीलाच कां? रोज पहाटे उठून व्यायामाचे. योगाचे. किंवा निव्वळ चालण्याचे जरी ठरवले तरी सकाळी मिळणाऱ्या प्राणवायूचा थोडा तरी डोज आपल्या फुफ्फुसात जाईल. नाही कां? विद्यार्थ्यांसाठी तर ब्रह्ममुहुर्ताचा काळ म्हणजे अभ्यासासाठी पर्वणीच! पहाटेच्या शांत वेळी आपला मेंदू सर्वाधिक सक्षम असतो. हे वारंवार सिद्ध करण्यात आले आहे. तेच मी परत सांगते आहे. पुरावा म्हणून विद्यार्थ्यांनी एकदा पहाटे आणि एकदा रात्री त्यांनी केलेल्या अभ्यासाचे परिणाम एकत्रित करून तपासावेत. त्यांचे त्यांनाच उत्तर नक्की मिळेल.

आपल्या पूर्वजांनी जे सांगितले त्यामागील शास्त्रीय विचार मागे पडला आणि ते समाजाला संस्कार म्हणून बहाल करण्यात आले. म्हणूनच त्या विचारांमागचे नेमके कारण शोधणे आवश्यक आहे. रात्र ही झोपण्यासाठी असते. थकलेल्या शरीराला आणि मनाला पुढील दिवशी भरपूर काम करता यावे म्हणून ही विश्रांती आवश्यक असते. हा नैसर्गिक क्रम बदलून रात्रीचा दिवस करण्यासाठी चहा-कॉफीचे कप रिचवून जागरण करीत अभ्यास करण्याने काय साध्य होईल. याचा विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावा. विनोबा भावे नेहमी म्हणत. “सूर्यप्रकाशात आपली सर्वाधिक वाचन आणि लेखनाची कामे उरकावीत. ”

इथे आठवतो तो प्रामुख्याने आपल्या आणि पाश्चात्य देशातील फरक! सूर्यस्नान करण्याची त्यांना अनिवार ओढ असते. आपल्यावर सूर्यनारायणाची अमाप कृपा आहे. आपल्याला जीवनसत्व ड मिळावे यासाठी कांही विशेष करायची गरज नाही. त्याची कमतरता भासू नये म्हणून दररोज फक्त १५ ते ३० मिनिटे (सन स्क्रीन न वापरता! ) सूर्यप्रकाश अंगावर घेणे पुरेसे आहे. भारतीय त्वचेच्या नैसर्गिक रंगांमुळे सूर्यप्रकाश अधिक वेळ उघड्या अंगावर घेणे आपल्याला आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते. सकाळी ९ ते ११ या वेळेत सूर्याची अतिनील किरणे सर्वाधिक सक्रिय असतात. जी शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असतात. हीच वेळ सर्वोत्तम आहे. दुपारी कडक उन्हामुळे त्वचेचे नुकसान होण्याचा धोका असतो. सकाळी ७ वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ५ नंतरच्या तिरप्या उन्हातून व्हिटॅमिन डी फारसे मिळत नाही.

– – भारतात वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. तरीही अंदाजे ७० टक्के ते ९० टक्के भारतीय लोकांमध्ये जीवनसत्व डीचे प्रमाण आवश्यकतेहून कमी असते. मंडळी. आधुनिक बंदिस्त जीवनशैलीमुळे उन्हाला शिरकाव नसतो. जाडजूड पडद्यांनी कार्यालयात व घरी त्याला मज्जाव केलेला असतो. मात्र उजेडासाठी दिवसाढवळ्या विजेचा अपव्यय करीत ट्यूबलाईट जाळणे व एसीचा वापर करणे सर्रास सुरु आहे. या शिवाय आहारातील कमतरता हे कारण आहेच. जीवनसत्व ड कमी असेल तर सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. हाडे. कंबर किंवा सांधे दुखणे आणि स्नायूंची कमजोरी. इत्यादी लक्षणे दिसून येतात. कुमारवयात आणि स्त्रियांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. याचा सोपा उपचार म्हणजे दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे सूर्यदेवाची आराधना करणे आणि आहारात व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ (दूध. अंडी. मासे इ.) समाविष्ट करणे. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूरक जीवनसत्व डी कॅप्सूल घ्यावीत!

मैत्रांनो. आजपासूनच मंगल-मुहूर्त साधत घरात आणि कार्यालयात सकाळी ९ ते ११ सूर्यकिरणांचे उत्साहात स्वागत करू या. प्रकाशपर्वाच्या रात्रींना श्रीमहालक्ष्मीदेवींचे स्वागत करायला गावरानी मातीच्या इवल्या इवल्या पणत्यांचा दैवी प्रकाश पुरेसा आहे. त्यासाठी वीज जाळणाऱ्या तोरणमाळा हव्याच का?

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted