श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “पिता त्वमेव!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
१६ मार्च. २०१४ रोजी जन्मलेल्या या मुलाचं नाव पुढे अवनिश झालं… पण त्या आधी तो बिन्नी म्हणून ओळखला जाई. अवनिश म्हणजे पृथ्वीचा ईश्वर. मालक असं असलं तरी त्यावेळी बिन्नी अनाथच म्हणावा असा होता. खरं तर विवाहित दांपत्याने त्यांच्या एकुलत्या एक आणि अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या मुलाला असं अनाथाश्रमात टाकून देऊन निघून जाणं कुणाच्याही मनाला न पटणारं… पण तसं झालं होतं खरं. अवनिशच्या हृदयाला जन्मत:च एक छिद्र होतं. त्याच्या पायांत मोठा दोष होता आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे अवनिश निसर्गाच्या एका निर्दयी निर्णयाचा बळी होता… अवनिश फार तर त्याच्या वयाच्या दीड दोन वर्षांतच या जगाचा निरोप घेऊन जाणार असं सर्वांनाच वाटत होतं!
जगात काही बालके समाज सहजी स्वीकारत नाही अशी शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये घेऊन जन्माला येतात. आणि यात त्या बालकांचा काहीही दोष नसतो… दोष असलाच तर तो निसर्गाचा. गर्भाच्या जन्मापर्यतच्या प्रवासात आई-बापाकडून प्राप्त झालेल्या गुणसूत्रांचा वाटा अत्यंत मोठा असतो. किंबहुना हा जीव शारीरिक. मानसिक. वैद्यकीय पातळीवर कोणत्या दर्जाचा असेल याचा ही गुणसूत्रे म्हणजे नकाशाच असतात. त्याच वाटेवर हा जीव पुढे चालत राहतो. सामान्यतः माणसाच्या पेशींमध्ये ४६ गुणसूत्रे (२३ जोड्या) असतात. म्हणजे एका गुणसूत्राची आणखी एक प्रत असते. यातील २१ क्रमांकाच्या गुणसूत्राची एक जादाची म्हणजे तिसरी प्रत असल्यास जन्माला येणारं बालक अनेक आव्हाने सोबत घेऊनच जन्माला येतं.
सर्वसाधारणत: गोल आणि सपाट चेहरा. चपटे नाक. वरच्या दिशेने तिरके डोळे. लहान मान. तोंडाबाहेर येणारी मोठी जीभ आणि स्नायूंमध्ये कमजोरी. शरीराचा आणि मेंदूचा विकास संथ होणे. शिकण्यात व बोलण्यात अडचणी येणे. हृदयाचे आजार. पचनसंस्थेचे विकार किंवा थायरॉईडच्या समस्या असण्याचा धोका अधिक असणे इत्यादी गोष्टींना ही बालके तोंड देत जगतात. उत्तम पालनपोषण झाल्यास ही बालके सरासरी ६० वर्षांपर्यंत जगू शकतात. १९८३ पर्यंत ही सरासरी आयुर्मर्यादा केवळ २५ वर्षे इतकीच होती.
जॉन लँगडन डाऊन नावाच्या एका वैद्यकीय तज्ज्ञाने या वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय परिस्थितीचे आकलन करून ते जगापुढे मांडले म्हणून या लक्षणसमुच्चयास ‘डाऊन लक्षणसम्मुच्चय’ (‘Down Syndrome’) हे नाव दिले गेले आहे… आपला अवनिश ‘Down Syndrome’ शरीरात घेऊनच जन्माला आला होता.. आणि त्यात त्याच्या हृदयाला एक छिद्र होतेच.. आणि हे बालक आपल्याला झेपणार नाही म्हणून त्याच्या जन्मदात्यांनी त्याला अक्षरश: मरण्यासाठी काळाच्या हवाली केलं होतं!
सप्टेंबर. २०१४. त्या दिवशी मध्यप्रदेशातील इंदूर इथला रहिवासी असलेल्या संगणक तज्ज्ञ आदित्य तिवारी या २५ वर्षे वय असलेल्या तरुणाच्या वडिलांचा वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इंदूर येथे स्थित मिशनरीज ऑफ चॅरीटी सेंटर या अनाथाश्रमातल्या बालकांना भेटवस्तू. देणगी द्यावी म्हणून आदित्यही त्यांच्यासोबत अनाथाश्रमात गेला होता. तिथे त्याला ‘बिन्नी’ अर्थात अवनिश दिसला. त्याच्यासारखी अनेक अनाथ बालके लहान-लहान पाळण्यांमध्ये छताकडे नजर लावून पहुडलेली होती… आपल्याला दत्तक घेऊन जातील अशी देवमाणसं त्या छतावरच्या आभाळातूनच येतील… असं त्या जीवांना वाटत असेल!
आदित्यने उत्सुकतेपोटी अनाथाश्रमातील लोकांना विचारले. ”या मुलांचं पुढं काय होतं? ” त्यावर “या मुलांना दत्तक दिलं जातं! ” असं उत्तर मिळालं. त्यावर आदित्यने विचारलं. ”या सर्व मुलांना दत्तक आई-बाप मिळालेत का? ” यावर त्याला सांगण्यात आलं… ”होय! फक्त ‘बिन्नी सोडून! ” त्यावर उत्कंठेपोटी आदित्य उदगारला… ”का बरं? ”
“वेडं पोर आहे ते! त्याला कोण दत्तक घेईल? ” कुणीतरी म्हणालं! आदित्य म्हणाला. ”मला बघायचंय ते मूल! ” त्याला त्या मुलाच्या पाळण्याकडे नेण्यात आलं. तो खाली वाकला. त्याने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि त्या बाळानं याच्या डोळ्यांत. याने हात पुढे केला आणि बाळाने याचं बोट त्याच्या मुठीत धरलं… आणि त्या स्पर्शातून याला काहीतरी जाणवलं… बिन्नी आदित्यचं बोट सहजी सोडायला तयार नव्हता! या माणसाचं बोट धरून या जगातील वाटा थेट हिमालयापर्यंत चालता येतील असं त्यावेळी बिन्नीला वाटलं असावं!
एका महिन्याने आदित्य त्या अनाथाश्रमात एका निश्चयानेच गेला. पण त्या आधी आदित्यने पूर्वतयारी केली होती… त्याने Down Syndrome असलेल्या एका मुलाच्या आई-बापाची भेट घेऊन अशा बालकांना वाढवताना येणा-या समस्या जाणून घेतल्या होत्या!
”मी घेईन बिन्नीला दत्तक! ” आदित्य तिवारी म्हणाले… हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकीत झाले यात नवल नव्हतं. एक तर हा पंचवीस वर्षांचा अविवाहित तरुण. त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काही दानधर्म घडावा म्हणून त्या अनाथ बालकाश्रमात आलेला केवळ काही वेळेपुरता येऊन गेलेला एक पाहुणा. याने इतक्या तडकाफडकी आपला निर्णय जाहीर करावा हे जगावेगळंच होतं. शिवाय ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अविवाहित व्यक्तीला दत्तक घेता येत नाही. हा नियम तर होताच. शिवाय हा तर पुरुष. सहा महिन्यांच्या आणि त्यातून इतक्या गंभीर आरोग्यसमस्या असलेल्या बालकाचे पालनपोषण हा माणूस करू तरी कसा शकणार होता? व्यवस्थेने अर्थातच नकार दिला! पण आदित्यचा निर्धार पक्का होता… बिन्नी त्याला खुणावत राहिला… ”मला घरी घेऊन चला… बाबा! ”
२०१४ मधली ही गोष्ट. आदित्य तिवारीने मग कायदेशीर बाजू तपासल्या. वयाच्या अठराव्या वर्षी विवाह झालेली महिला एकोणीसाव्या वर्षी माता होऊ शकते आणि तिचा दोन-पाच वर्षांनी मोठा असलेला पती आणि ती असे दोघे मिळून त्या बालकाचा सांभाळ करू शकतात… म्हणजे ते काही तीस वर्षांपेक्षा मोठे नसतात. मग दत्तक पिता ३० वर्षे वयापेक्षा मोठा असावा. ही अट तशी अन्यायकारकच नाही का? या मुद्यावरून आदित्यने सर्व संबंधित शासकीय विभागांना शेकडो पत्रे. अर्ज. ई-मेल्स लिहिल्या. कायदेशीर मार्गाने दाद मागितली. ऑगस्ट २०१५ मध्ये दत्तक एकल पित्याचे वय ३० वरून २५ वर्षांपर्यंत खाली आणण्यात आले. दरम्यानच्या काळात एकूणच दत्तक देण्याची कायदेशीर प्रक्रिया आणि अनुषंगिक बाबींचा आदित्य तिवारी यांनी सखोल अभ्यास केला. बेकायदेशीररीत्या परदेशात दत्तक दिली जाणार होती अशी ३० बालके आदित्य यांच्या सजगतेमुळे भारतातच राहिली आणि त्यातली कित्येक बालके पुढे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जाऊन दत्तक दिली गेली.
आदित्यने दुसरे एखादे मूल दत्तक घ्यावे. बिन्नी नको… असं अनेकांनी सुचवलं. पण आदित्य त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले गेल्यावर १ जानेवारी. २०१६ रोजी आदित्य बिन्नीचा बाप झाला… भारतातील सर्वांत कमी वयाचा एकल दत्तक-पिता असा विक्रम आदित्य तिवारी यांच्या नावावर नोंदला गेला! बिन्नी आदित्य तिवारी यांच्या घरच्या गोकुळात दाखल झाला… एकट्याचं गोकूळ! इथं कुणी यशोदा नव्हती… तुम्ही हो माता… पिता तुमही हो… अशी स्थिती होती. आदित्य तिवारी यांनी नूतन बालकाचे नामकरण मोठ्या थाटात केलं… अवनिश.
बालकाचे संगोपन करायला आई असेल तर आणखी उत्तम होईल. असं आदित्य यांना जाणवलं. कारण पुरुषाच्या आईपणाला नाही म्हटलं तरी मर्यादा असतातच. अवनिशला आई पाहिजेच असा आदित्य यांनी विचार केला आणि त्यांच्या या हाकेला प्राध्यापिका अर्पिता यांनी प्रतिसाद दिला… अवनिश घरी आल्याच्या सातव्याच महिन्यात त्याला आई मिळाली!
आदित्य आणि अर्पिता यांनी अवनिशच्या नावाने संस्कृत भाषेत आमंत्रण पत्रिका तयार करवून घेतल्या… ”माझ्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं! ” अशी प्रेमळ विनंती अवनिशने सर्वांना केली होती. आमंत्रितांची संख्या होती… तब्बल दहा हजार! या व-हाडात Down Syndrom असलेली बालके. त्यांचे पालक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अर्पिताच्या आई-वडिलांनी या पाहुण्यांचे जंगी स्वागत केले. आणि आणखी १०० ‘विशेष’ पाहुणेही बोलावले गेले होते… विविध प्राणी संग्रहालये आणि रस्त्यावरची भटकी जनावरे… असे मिळून शंभर प्राणीही पाहुणे म्हणून आमंत्रित होते… त्यांच्या भोजनाची विशेष व्यवस्था केली गेली होती… इंदूरमध्ये असा विवाहसोहळा न भूतो असाच होता. आदित्य यांनी स्वत:साठी केवळ दोनशे रुपयांची अंगठी घेतली होती! परिसरातील अनाथाश्रमातील बालकांसाठी त्यांच्या त्यांच्या निवासस्थानीच अनोख्या विवाहसमारंभाप्रीत्यर्थ चार वेळा भोजन दिले गेले!
नोकरीच्या निमित्ताने आदित्य तिवारी आणि अर्पिता तिवारी पुण्यात स्थायिक झाले. आदित्य तिवारी यांना देशभरातील अनेक सामाजिक संस्थांनी मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यासाठी सन्मानाने बोलावून घेतले. एड्सपिडीत पालकांच्या बालकांच्या संदर्भातही आदित्य तिवारी यांनी पंढरपूर येथील एका संस्थेला कायदेशीर साहाय्य मिळवून दिले. अवनिशच्या निमित्ताने आदित्य आणि अर्पिता तिवारी यांचा Down Syndrome अनुभवाच्या आधारे उत्तम अभ्यास झाला. भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक आदित्य यांच्याशी संपर्क साधू लागले. तिवारी यांनी अवनिशच्याच नावाने एक संस्था उभारून मार्गदर्शन करण्यास आरंभ केला.
अवनिशच्या हृदयाला एक छिद्र होते. त्यामुळे तो एका वर्षापेक्षा अधिक काळ जगू शकणार नाही. अशी शक्यता व्यक्त केली गेली होती… पण आदित्य-अर्पिता यांनी केलेली सुश्रुषा. पालनपोषण आणि देवाची कृपा झाली आणि अवनिशच्या हृदयातील ते छिद्र नैसर्गिकरीत्या भरून आले! आदित्य तिवारी नोकरी करीत असलेल्या बार्कले कंपनीने ‘Real Life Hero’ पुरस्कार देऊन आदित्य यांचा गौरव केला. असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले.
विविध शारीरिक समस्यांनी त्रस्त असलेल्या अवनिशने सुद्धा आदित्य-अर्पिता यांच्या प्रयत्नांना साथ दिली… वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अवनिशने आदित्य यांच्या सोबतीने हिमालयाच्या बेस कॅम्प पर्यंत जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला… यातच सर्वकाही आले! अवनिशला वाघ खूप आवडतो म्हणून आदित्य यांनी एका प्राणी संग्रहालयातील एक वाघ दत्तक घेतला आहे. अवनिशने पुढे चक्क TED TALK मध्ये भाषणेही दिली! आता तो blogger बनण्याच्या मार्गावर आहे. असे समजते.
२०२२ मध्ये अवनिशला भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभहस्ते ‘श्रेष्ठ दिव्यांग बाल राष्ट्रीय पुरस्कार’ दिला गेला. पुरस्काराच्या मानपत्रात लिहिले गेले आहे… ”अवनिश त्याच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटांवर परिश्रमपूर्वक मात केलेला बालक आहे. जन्मत:च अनाथ असलेला परंतू नंतर दत्तक गेलेला अवनिश Down Syndromeशी झुंजत असतानाही प्रगती करतो आहे. वयाच्या अवघ्या तिस-याच वर्षी तो TEDx Talks मध्ये बोलला आणि चौथ्यावर्षीही. वयाच्या सातव्या वर्षी त्याने Mt. Everest base camp पर्यंत पायी चढाई केली आहे. अवनिश ‘श्रेष्ठ दिव्यांग बाल राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त करणारा सर्वांत लहान मुलगा ठरला आहे.”
२०२४ मध्ये अवनिशने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला… प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. याही वेली अवनिशला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सन्मानित केले गेले. २६ जानेवारी २०२४ च्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात अवनिश सहभागी झाला होता. महू येथील आर्मी स्कूलमध्ये अवनिश इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शालेय शिक्षण घेत आहे.
अर्थातच अवनिशच्या मागे आदित्य आणि अर्पिता तिवारी. आदित्य तिवारी आणि अर्पिता यांच्या कुटुंबातील सदस्य ठामपणे उभे असल्यानेच हे शक्य होते आहे.
“It is fatal to be a man or woman pure and simple: one must be a woman-manly. or a man-womanly. ”= व्हर्जिनिया वुल्फ या महिला लेखिकेचे हे वाक्य आदित्य तिवारी यांनी जगून दाखवले आहे. प्रत्येक पुरुषात महिलांच्या अंगी असलेल्या अंगभूत प्रीती. मार्दव. माया यांचा अंश असलाच पाहिजे आणि महिलांच्या व्यक्तिमत्वातही पुरुषांच्या अंगी असलेले धैर्य. शौर्य. निश्चय अशा सारख्या गुणांचा समावेश असला पाहिजे. पुरुषाने केवळ पुरूषच आणि स्त्रियांनी केवळ स्त्रीच असणे चांगले नाही… असं वुल्फ म्हणतात. त्यांनी वेगळ्या संदर्भात हे वाक्य लिहिले असले तरी यातील सर्व बाबी आदित्य तिवारी यांना लागू पडतात. हेही खरेच.
या लेखातील माहिती विविध स्रोतांतून मिळवली असून जमेल तशी मांडली आहे. या निमित्ताने आदित्य. अर्पिता तिवारी आणि अवनिशचे अभिनंदन. विशेष मुलांचे प्रेमाने. जबाबदारीने संगोपन करणारे आई-वडील. वैद्यकीय कार्यकर्ते. व्यक्ती. संस्था यांना नमस्कार. आणि दिवाळीनिमित्ताने शुभेच्छा.
(हा लेख लिहिताना कुणाचीही लेखी परवानगी घेता आलेली नाही.. क्षमस्व.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




