सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २८७
☆ प्रेम… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
प्रेम म्हणजे काय?
कुठे कळते, जे तुझ्या माझ्यात,
जाणवलेच नाही कधी,
अगदी उंबरठ्यावरचं माप ओलांडून,
मन हेच गुणगुणले,
“आले तुझिया घरी….
कराया तुझीच रे चाकरी”
किती बाळबोध मन,
लग्न हेच आयुष्याचं
इतिकर्तव्य,
हेच मनावर बिंबलेलं—-
पण कुठं माशी शिंकली,
समजलंच नाही!
आणि सुरू झाला,
समांतर रेषांवरचा प्रवास!
पण आज “संध्याछाया”
भिववित असताना,
तुझ्या आवाजात,
तिच ‘जरब’ ,
मालकी हक्काची…
आणि आजही माझ्या मनात,
उसळणारी बंडखोरी,
यालाच प्रेम म्हणत असावेत बहुतेक,
कौटुंबिक भाषेत!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






