image_print

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

🌸  काव्यानंद  🌸

 ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण –सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

एक प्रतिभा संपन्न कवयित्री, लेखिका, मराठीच्या प्राध्यापिका, सह संपादिका, अनुवादिका, तसेच बालगीते, कथा, कविता, ललित लेख यावर हुकूमत गाजवणाऱ्या रसिक प्रिय कवयित्री शांताबाई शेळके. त्यांची अनेक भावगीते, भक्तीगीते, कोळी, सिने गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी जपानी हायकूचे अनुवाद ही केले आहेत. एक सालस, सोज्वळ व्यक्तीमत्व. अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या शब्दाचं गारूड होत. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्मृतीदिन ६ जूनला आहे. त्या निमित्ताने. त्याच्या “खांब” या कवितेचे रसग्रहण.

कवयित्री ची ‘खांब’ ही कविता समस्त संसारी महिलाचे प्रतिनिधित्व करते. या कवितेत संसारी स्त्रीला बाई असे संबोधले आहे. इथ मी तोच शब्द वापरते. लग्न होवून बाई घरात आली की तिचे विश्व बदलते.ती त्या घराशी एकरूप होऊन जाते. आनंदाने ते घर स्विकारते. तिला ही घरातील लोक गृहित धरतात. सरळ साध्या बाईचा आधार घराला किती मोलाचा असतो हे कवयित्रीने या  कवितेत मांडले आहे. ही कविता शहरी, ग्रामिण प्रत्येक बाईची आहे असे मला वाटते.प्रत्येकीचे सोसणे सारखेच असते.

संसार करत असताना बाई किती सहनशीलतेने वावरते. नव्या घरात तिला अडचणी येतात, वावरताना अवघडल्या सारखे होते, माहेरची आठवण येते, काही गोष्टी खटकतात, तेव्हा रडू कोसळते, पण हे सारे आवेग बाई चेहऱ्यावर दाखवून देत नाही. आपल्या मनातील खळबळ बोलून दाखवत नाही. ओठांवर आणत नाही, हसून वेळ मारून नेहते. आतल्या आत दु: ख दाबून ठेवते. कुढत राहते. चेहऱ्यावर हसरे मुखवटे चढवते, ओठावर हसू आणते. आतल्या आत खुप काही साठवते. सगळी कामे सहज करत राहते.

त्याच हसऱ्या चेहऱ्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे, पैपाहुण्याचे स्वागत करते. त्यांना हव नको ते विचारते. स्वत:राबते. त्याचे आदरातिथ्य करते. हे काम बाईनेच करावे असा अलिखित नियम आहे. असे जणून तशीच वावरते. इथं तिच्या हालचालींना कवयित्रीनी वाऱ्याची उपमा दिली आहे. अगदी वाऱ्या सारखी घरभर फिरून ती बाई आपल कर्तव्य करते असते त्या तिला काही कमीपणा वाटत नाही.

घरातील प्रत्येक व्यक्तीला छोट्या मोठ्या कामासाठी बाई हवी असते. तिच्या शिवाय कुणाचे पान हलत नाही. तिला गृहित धरलेले असते. शिवाय तिच्या कामात नेमकेपणा असतो. तिच्या कामावर सर्वाचा विश्वास असतो. म्हणून नवऱ्या पासून सासऱ्या पर्यत सगळेजण तिच्या कडून कामाची अपेक्षा ठेवतात. “बिन पगारी फुल अधिकारी” प्रमाणे सगळी कामे बाई मनापासून करते पण साधे कौतुकाचे चार शब्द मिळतं नाहीत.मोबदला मिळणे दूरची गोष्ट.

घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाचे नाते जुळते.आपलेपणाने त्यांची काळजी घेते. त्यांचे आरोग्य सांभाळते.सर्वानी आरोग्य संपन्न असावे ही गरज वाटते तिला. जर कोणी आजारी पडले तर उश्यापायशाला बसून मनोभावे सेवा करते. दिव्या प्रमाणे स्वत: जळते. रात्रभर जागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी नित्याच्या कामाला लागते. बाईच झीजणं दिसतच नाही.तिच्या मनाची कदर केली जात नाही. तिच्या शिवाय घरची कामे कोण करणार? सर्वांना तिची सवय झालेली असते. ती फक्त आपलं काम करत असते.

बाईच्या पाठीला पुजलेले काम म्हणजे “रांधा वाढा उष्टी काढा”. बाईने किती पराक्रम गाजवला. ती किती ही कर्तृत्वाने असली तरी ही कामे तिच्या पाठची जात नाहीत. हे तिचेच काम आहे असे गृहीत धरले जाते. या बाबत कवयित्रीनी या ठिकाणी खुप छान ओळी लिहिल्या आहेत. “राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण” हे त्रिकाल सत्य आहेत. लग्नात कुणा कुणाला छान छान वस्तू भेट मिळतात. त्या भेटीतून आनंद मिळतो. पण बाईला मात्र लग्नात राबण भेट मिळत. मूल आणि मूल ही प्रतिमा आज ही विचारात घेतली जाते. तिची काय कळते? तिला कुठाय अकल्ल आहे? तिने चुल आणि मूल सांभाळावे एवढंच तिला कळत. तिने स्वयंपाक करावा,स्वच्छता करावी. सगळ्यांच्या मर्जीने वागावे हेच तिच्या कपाळावर सटवीने ठळक गोंदलं आहे.गोंदण जसं कपाळावर कायम स्वरुपी असतं तसे बाईच्या कपाळी राबणे गोंदलं आहे. कवयित्रीनी खुप छान प्रतिमा वापरली आहे.

आपल्या सुंदर दिसण्याच्या कल्पना ही बाईच्या मनावर बिंबवल्या असतात. अतिशय साध्या गोष्टीत ती समाधानी राहते.रहायला भाग पाडतात.गोंदणावर रूपया एवढे लालभडक कुंकू लावले तरी ती सुखावते. ती तिला सुंदर दिसते.आनंद मानते.सोन्या चांदीच्या दागिण्याची हौस नाही. चार काळे मनी गळ्यात असले तरी तिला ती साजरी वाटते.आपले हे सौभाग्य आहे असं  मानते.तिच्या अपेक्षा जास्त नाहीत.पती परमेश्वरासाठी घरात आनंद पेरते. नवऱ्याच्या  आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या अहेव मरण यावे असे वाटते.हातातला चुडा अखंड रहावा ही बाईची इच्छा असते. दुसऱ्यावर तिचा विश्वास नसतो म्हणून सगळी कामे स्वत: करते.

आपल्या हातावर तिचा विश्वास आहे. किती कष्ट करण्याची तयारी आहे.

मुला शिवाय घराला घरपण नाही. अगंणात मुलं खेळलं तर संसार सुखाचा होतो हे तिला ठाऊक आहे. ती स्वत: भार सोसून  घराला वंशाचा दिवा देते आणि अनेक पिढ्यांना जोडली जाते. बाळाला मोठं करते तो जेव्हा पुढची पिढी घडवतो. तेव्हा ती पिढीत जोडली जाते. नाते बदलते. घराच घरपण पिढीच्या रूपात बाईच पुढं नेते. हे कवयित्रीने नेमक्या शब्दात मांडले आहे.

धरतीच प्रतिक बाई. संसाराची धरती बाई.घराचा डोलारा बाईच फुलतो. तो फुलवण्यासाठी बाई कष्ट करते. फुलोरा गगनाला भिडतो तेव्हा बाई जमिनीत घट्ट मूळे रोवून उभी असते. ती स्वत: चा तोल ढळू देत नाही. डगमगत नाही. ती या घराचा आधार असते. सारं घर तोलून धरण्याची ताकद फक्त बाईच असते. कवयित्रीने तर या कवितेत “देहाचाच खांब” असे प्रतिक वापरले आहे. संसारात बाई स्वत:चे मूल्य विसरते, आपल्या देहाचे कौतुक विसरते, केवळ आपले घर सावरण्यासाठी, फुलवण्यासाठी कणाकणाने, क्षणाक्षणाने झीजते. आपल्या आधारावर घराचा भार तोलून धरते, सर्वांना सुरक्षित करते.सर्वाची काळजी घेते.स्वत: खांब होते.आपले अस्तित्व विसरून. बाई घरासाठी झिजते, खपते. घर उभं करते.

भुईत पाय रोवून आभाळ फुलवणारी, गंधित करणारी जाई आणि आपल्या देहाचा खांब करून अवघं घर तोलून धरणारी बाई या कवियत्री ने मांडलेल्या प्रतिमा कवितेला अत्युच्च उंचीवर नेतात व रसिकांना बाईपणाच्या समस्त दुखण्याबद्दल संवेदनशील करतात. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते.हे समजून कवयित्रीने स्त्रियांचे चिरंजीव दु:ख व्यक्त केले असले तरी ती घराचा खांब आहे हे सांगून तिच्या मोठेपणाची व अस्तित्वाची सर्वांनाच जाणीव करून दिली आहे.हे या कवितेचे यश म्हणावे लागेल.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments