श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ जावईबापूंचे प्रकार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
☆
आपल्याकडे जावईबापूंचे साधारणपणे पाच प्रकार सांगितले जातात… ते पुढीलप्रमाणे:
१) साखऱ्या जावई
साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि. मी. पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, ‘कुठे बसवू अन् कुठे उठवू? ‘ अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना ‘साखऱ्या जावई’ असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे…
२) भाकऱ्या जावई
या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची आठवण आली तर तिच्या सोबतसुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते… हे नेहमीचेच आहेत, ‘नित उठे, अन् कपाळ बसे. ‘ या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे. म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना ‘भाकऱ्या जावई’ असं म्हटलं जातं.
३) ढोकऱ्या जावई
या प्रकारात २% जावई मोडतात. हे ‘घरजावई’ असतात. या जावयांना घरात पाणीसुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तूसुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना ‘ढोकऱ्या जावई’असं म्हटलं जातंय.
४) दयावान जावई
हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात. म्हणून यांना ‘दयावान जावई’ असं म्हटलं जातंय.
५) बेरकी जावई
हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाहीत, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना ‘बेरकी जावई’ असं म्हटलं जातंय.
शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी ‘जात्यावरच्या ओवीत’ म्हटलंच आहे, की
(१)
जावाई, जावाई नको करू तू मायबाई,
जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.
(२)
जावयाची जात फार बेईमान सांगती,
‘लक्ष’ गं केलं दान, तरी माझ्या ‘ताई’ ला गांजती.
शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,
“शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,
म्हणून ‘दादासले’ पुण्य काशीतून सवाई. “
आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणत्या जावईबापूंमध्ये मोडतात ते…
या समूहातील सर्वच धोंडोपंतांना आहे धोंड्याच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



