श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला जाणवला होता पण त्यामुळेच ‘प्रभूदेसाई यांच्याविरुद्ध लेखी तक्रार करण्यामागच्या त्यांच्या भूमिकेवर ते ठाम राहिले तर? ‘ हा प्रश्न मनाला त्रास देत होताच.)

कांहीही झालं तरी हा तिढा सुटायलाच हवा असं उत्कटतेनं मनात आलं आणि ‘त्या’ची आठवण झाली. ‘तो’ जे करेल तेच सर्वार्थाने योग्यच असेल असं वाटलं न् मन थोडं शांत झालं. आजोबांच्या तेव्हाच्या मन:स्थितीचा विचार करता आपण लगेचच घाईघाईने मुद्द्याला हात घालणं योग्य नाही हेही जाणवलं. जे करायचं ते आधी विचार करूनच ठरवायला हवं होतं. त्यामुळे आजच्यापुरता हा विषय इथंच थांबवणं ओघानं आलंच.

“आजोबा, आज तुमच्याशी बोललो, खूप बरं वाटलं ” मी म्हणालो. “तुम्ही मोकळेपणानं सगळं सांगितलंत म्हणून तुमची नेमकी बाजू तरी मला समजली. आणि पटलीही. त्यामुळे तुम्ही केलेल्या तक्रारीच्या बाबतीत काय करायचं, तुमच्यावर अन्याय न होता कसा मार्ग काढायचा हे मी पाहिन. याबाबत आधी आमच्या साहेबांशीही बोलेन. आपण भेटू लवकरच. येत्या एक-दोन दिवसातच मी आधी फोन करून तुमच्याकडे येईन. चालेल? “

त्यांनी होकारार्थी मान हलवली. माझ्या बोलण्यातली सकारात्मकता ही त्यांनी जे सांगितलं त्यावरची माझी त्याक्षणीची उस्फूर्त प्रतिक्रिया होती. माझ्या या प्रतिक्रियेनंतरचं आजोबांच्या नजरेत उमटलेलं समाधान माझी उमेद वाढवणारं होतं!

तरीही आपण नेमकं काय करायचं याबद्दल मात्र त्याक्षणी माझ्या मनात पुरेशी स्पष्टता नव्हती हे खरंच. प्रभूदेसाईंना जास्तीतजास्त कठोर शिक्षा करायची म्हणजे नेमकं काय करायचं की जेणेकरून सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान होईल? शिक्षा कोणतीही असो बँकांच्या नियमात बसूनच करायला हवी. सहस्त्रबुद्धे आजोबांची बाजू मला पटणं पुरेसं नव्हतं. जे घडलं असं आजोबांनी सांगितलं त्याला कोणतेही सबळ पुरावे, साक्षीदार त्यांनी सादर केलेले नव्हते. केवळ ते म्हणतात म्हणून एका जबाबदार ब्रॅंच मॅनेजरला कठोर शिक्षा करण्याची कोणतीही तरतूद कोणत्याच बँकेच्या नियमात नाहीय. स्वतःची बाजू मांडताना प्रभूदेसाई मला म्हणाले होते त्यातला शब्द न् शब्द मला स्वच्छ आठवला. “एका यशस्वी ब्रॅंच मॅनेजरचं वीस वर्षांचं निर्दोष, चांगलं रेकॉर्ड पहायचं की एका य:कश्चित तक्रारदाराला अनावश्यक महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवायला हवं सर.. ” असं

प्रभूदेसाई मला म्हणाले होते. त्यांचं तेव्हाचं बोलणं ऐकताना मला ते कांहीसं अति आत्मविश्वासाचं, अहंकाराचा दर्प असलेलं असंच वाटलं होतं. पण आज मी काय करायला हवं हे ठरवायची वेळ आली तेव्हा तेच बोलणं नकळत मला दिशा दाखवून गेलं. त्यामुळे आता सहस्त्रबुध्दे आजोबांबाबतची माझ्या मनातली सहानुभूती जपत असतानाच ग्राहक-सेवेच्या गुणात्मकतेबरोबरच बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले बॅंकेचे नियमही मला दुर्लक्षून चालणार नव्हतं. तरीही जे करायचं ते सहस्त्रबुद्धे आजोबांना न्याय मिळाल्याचं समाधान देणारंही असायला हवं असं मला मनापासून वाटत होतं!

त्यादिवशी सहस्त्रबुद्धे आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडल्यानंतर परस्पर आॅफिसला जाताच गेल्या दोन दिवसांपासूनचा सविस्तर वृतांत वखरेसाहेबांना सांगून त्यांच्याशी चर्चा करायला मी त्यांच्या केबिनमधे पोहोचेपर्यंतच्या तासाभरात माझ्या मनात येऊन गेलेल्या उलट-सुलट विचारांचा हा सगळा सारांश!

आज उद्या एवढ्यात हा प्रश्न मार्गी लागायची निकड असणारे वखरेसाहेब माझीच वाट पहात होते.

“भेटले कां ते तक्रारदार? झालं बोलणं? “

“हो सर.. “

“काय म्हणतायत? तक्रार मागं घ्यायला तयार झाले कीं अजूनही हटून बसलेत? “

आत्ता या घटकेला ती तक्रार मागे घेतली जाणं हेच वखरेसाहेबांइतकंच मलाही निकडीचं वाटत होतं.. पण…?

“त्यासंबंधीच सविस्तर बोलायचंय सर. तुम्ही बिझी असाल तर दुपारी लंचनंतर येऊ कां सर? ” त्यांचा अंदाज घेत मी विचारलं.

“छे छे.. नाही.. नको. हाच विषय आधी एकदाचा संपवायला हवा. आत्ताच सेंट्रल ऑफिसमधून याचसंबंधी फोन आला होता. मी एक-दोन दिवसात काम होऊन जाईल असं सांगितलंय. “

मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं.

“कां? प्रॉब्लेम आहे कां कांही? ” त्यांनी उतावीळपणे विचारलं.

“प्रॉब्लेम आहेच सर. आणि आपल्यालाच तो सोडवायचाय. त्याबद्दलच बोलायचं होतं. “

“ठीकाय. बोला. “

“या तक्रारीला जी घटना निमित्त झाली ती नेमकी काय होती याबाबत प्रभूदेसाईंनी मला जो सांगितला होता तो आणि सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेला असे दोन्ही घटनाक्रम पूर्णतः परस्परांच्या विरूध्द आहेत सर. ” मी म्हणालो.

“हो. हे अपेक्षितच होतं. प्रभूदेसाई बोललाय माझ्याशी. आणि ते सहस्त्रबुध्दे आजोबाही कसे तर्कटी, संतापी आणि तक्रारखोर आहेत हेही सांगितलंय त्यानं. “

मी सावध झालो. मी फक्त सहस्त्रबुद्धेंबद्दलची सहानुभूती आणि बँक कर्मचाऱ्यांबद्दलचे नियम याच दोन बाबींचा विचार केलेला होता. वखरेसाहेबांचं

प्रभूदेसाईंबद्दलचं अतिशय चांगलं मत मी गृहितच धरलं नव्हतं. पण खरं तर कोणताही निर्णय घेताना हे मतही अतिशय निर्णायक ठरायचीच शक्यता जास्त होती कारण वखरेसाहेब हेच स्वतः कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब करणारे अधिकारी होते!

‘डोण्ट वरी. प्रभूदेसाई माझाच माणूस आहे. स्टार परफॉर्मर आहे तो. त्याच्या विरुद्ध कुणी तक्रार करावी हेच आश्चर्य आहे ‘ असं याच संदर्भात प्रभूदेसाईंबद्दल बोलताना

वखरेसाहेब मला यापूर्वीही म्हणाले होते ते आठवलं. प्रभूदेसाई मला पूर्णतः अनोळखी असताना, अतिशय अल्पसहवासातल्या त्यांच्या बोलण्यावरून आणि सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवावरून तयार झालेलं प्रभूदेसाईंबद्दलचं माझं मत व्यक्त करायची घाई करणं अनेक वर्षांच्या अनुभवावरून तयार झालेल्या वखरेसाहेबांच्या मनातल्या प्रभूदेसाई या व्यक्तीच्या प्रतिमेला तडा देणारंच ठरणार होतं. ते मला नको होतं. कारण हे माझ्यासाठी योग्य निर्णय घेण्यातला फार मोठा अडसरच ठरायची शक्यता होती.

“हो सर. काल मी सहस्त्रबुध्देंना प्रथम भेटलो तेव्हा त्यांच्याबद्दलचा हाच पूर्वग्रह माझ्या मनात होता. ” गेल्या दोन दिवसात मी आणि सहस्त्रबुद्धे यांच्या भेटीत नेमकं जे जे बोलणं झालं ते सांगायला मी सुरुवात केली. वखरेसाहेब शांतपणे आणि उत्सुकतेने सगळं ऐकत होते. प्रभूदेसाईंबद्दलचं त्यांचं मत कलुषीत न करता सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दलचा त्यांच्या मनातला पूर्वग्रह आणि गैरसमज दूर होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.

त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं ते सगळं सहस्त्रबुद्धेंच्याच शब्दात माझ्या तोंडून ऐकताना वखरेसाहेबांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला ठळकपणे जाणवली. माझं बोलणं संपलं तेव्हा नि:शब्दपणे ते क्षणभर स्तब्ध झाले.

“सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभूदेसाई काय किंवा सहस्त्रबुद्धे आजोबा काय कुणालाही झुकतं माप न देताही अन्याय झाल्याची भावना त्या दोघांच्याही मनात निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. “

“हे सगळं प्रकरण इतके दिवस दुर्लक्षित राहिलंच कसं पण? त्याला जबाबदार कोण हेही ठरवायला हवंच ना? ” ते उद्वेगाने म्हणाले.

“हे प्रकरण तडजोड न होता यापुढंही असंच लटकत राहिलं, तर तेही करावं लागेलच. पण ती नंतरची गोष्ट. आत्ता तडजोड होण्यासाठी तातडीनं काय करायचं ते आधी ठरवूया सर. “

“मी.. मी आज त्या प्रभूदेसाईला बोलावून घेतो ताबडतोब. आपण बोलू या त्याच्याशी. तशीच वेळ आली तर तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही खात्री आहे माझी. “

“नाही सर. नको. आत्ता नको. आता कोणत्याही परिस्थितीत जे करायचं ते आपणच ठरवायला हवं. शिवाय तुम्हाला प्रभूदेसाईंच्याबद्दल एवढी खात्री असेल तर तशीच वेळ आली तर त्यांची मदत तेव्हा घेता येईलच कीं.. ” शक्य तेवढं सौम्य शब्दांत त्यांचा अंदाज घेत मी म्हणालो.

“पण आपण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं..? ” त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

“सर, मी माझं मत सांगेन आणि मार्गही सुचवेन. त्यात तुमच्या सल्ल्यानुसार बदलही करूया, मात्र जे कांही करायचं ते वेळेची निकड बघता आपण तातडीने करायला हवंय. “

“नो प्राॅब्लेम. बोला.. “

मला पटकन् काय बोलावं सुचेचना. मनाशी पुसटसंही कांहीच ठरवलेलं नसल्यामुळे जे आपल्या मनात आहे ते सगळं हातचं कांहीही राखून न ठेवता मोकळेपणानं व्यक्त होण्याखेरीज पर्यायच नव्हता. आणि मग दुसऱ्याच क्षणी, याच संदर्भात घडलेल्या सर्व प्रसंग, चर्चा आणि त्या त्या वेळी मनात उमटलेल्या माझ्या प्रतिक्रिया याच्याच गेले दोन रात्रंदिवस मनोमन सुरू असलेल्या मंथनाचं उत्स्फूर्त शब्दरूप माझ्याही नकळत मनाच्या तळातून उत्कटतेने व्यक्त होत राहिलं…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments