image_print

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ प्रतिबिंब  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

चिमण्या घरातल्या आरशावर येऊन टोची मारत बसतात. हा बिलोरी आरसा त्यांना आकर्षित करतो खरा, पण ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’असं काहीसं होऊन जातं. स्वतःच्याच प्रतिबिंबाची त्यांच द्वंद्व सुरू असतं.

त्या दिवशी दुपारी अशीच एक चिमणी पंख फडफडत आली आणि आरशावर बसून टोच्या मारू लागली. तो टकटक आवाज ऐकून माझीही झोप चाळवली गेली.आरशावर टोची मारायचं चिमणीचं प्रयोजन ती थोडीच मला कानात सांगणार होती?….भुरकन गेली देखील उडून ती…..

विचारांचा भुंगा माझ्या भोवती भुण भुण करू लागला. लहानपणी गोष्टीत वाचलेला सिंह आठवला. स्वतःचे प्रतिबिंब विहिरीत पाहून विहिरीत उडी मारणारा..

चिमणीला आरशातले प्रतिबिंब म्हणजे दुसरी चिमणीच आहे असं वाटत असेल का ? म्हणूनच तर ती तिच्याशी भांडत असेल का ?नाही! नाही! गरीब बिचारी… ती कशाला भांडेल ? मग गप्पाच मारत असेल का तिच्याबरोबर?

माझं मन माझ्या प्रश्नांना अनुत्तरीत झालं.

माझं त्या चिमणीशी मूक संभाषण सुरू झालं “अगं वेडाबाई, आभासी आहे गं सगळं !तू जर तिच्याबरोबर भांडत असशील तर ते तुझंभांडण स्वतःशीच आहे आणि जर गप्पा मारत असशील तर स्वतःशीच किती वेळ बोलणार?त्यापेक्षा माझ्याशी बोल ना!! इटुकली धिटुकली तू मला खरच खूप आवडतेस गं! असं म्हणून मी उठले तर ती भुरकन उडून गेली. ती पुन्हा परत यायची मी वाट बघू लागले. मनातलं सगळं बोलणार होते मी तिच्याशी…..

बऱ्याच वेळाने ती परत आली.’आता नाही हं तुझ्या जवळ येत मी !आवडत नाही ना मी तुला ?ठीक आहे.तू आपली तुझ्या मैत्रिणीशी बोल किंवा भांड… मला काय करायचे ?तुला माझी कदरच नाही. माझ्या मनांतल ऐकून घेशील तर शपथ!नुसतं टोच्या मारत बसली आहेस….

अग चिऊ, तू माझ्या बाळाची अगदी जिवाभावाची…..माझं बाळ लहान होतं तेव्हा अंगणात पोत्यावर त्याला बसवलं की लगेच तुम्हा मैत्रिणींचा घोळका चिवचिवाट करत येत असे. फेर धरून तुम्ही सगळ्या माझ्या बाळाच्या भोवती रिंगण करून नाचायचात आणि माझं बाळ बसल्याजागी उड्या मारायचं….. तुम्हाला ते मुठी मुठी भरून जोंधळ्याचे दाणे भिरकवायचं.तासनतास त्याला तुम्ही खेळवायचात तुला मी कशी विसरू?

माझ्या बाळाला तुझीच गोष्ट सांगून मी झोपवत असे. तुझी गोष्ट ऐकता ऐकता माझ्या बाळाच्या डोळ्यात नाजूक पावलांनी झोप यायची आणि माझं बाळ गुढुद झोपायचं. तू तुझं घर माझ्या घराच्या वळचणीला बांधलंस कारण माझ्या बाळाची अन तुझी गट्टी !काऊचं घर मात्र माझ्या बाळानं उन्हात बांधलं हं! माझ्या बाळाला तू घाबरत नव्हतीस पण माझ्यापासून का इतकी दूर पळतेस? एक नाही अन् दोन नाही.तिच्या टोच्या मारणं चालू होतं.

इतक्यात सोनाली आली आणि तिला म्हणाली, “आलीस वाटतं तू ?जरा चुकून पडदा सरकवायचा राहिला की हिचं आपलं टुकटुक टुकटुक सुरुच!आई, इथून हिला हुसकलं की ही शेजारच्या काकूंच्या कपाटाच्या आरशावर जाऊन बसते.

आई,आपल्यालाच फक्त आरशातलं प्रतिबिंब समजतं का गं? या पक्षी आणि प्राण्यांना का समजत नसेल?” तिच्या या प्रश्नावर मी विचार करू लागले.

शेजारच्या घरातल्या आरशावर गेल्यावर या चिमणीच्या मनांत पुन्हा तीच चिमणी इथे कशी आली हा प्रश्‍न येत नसेल का ?आरसा बदलला तरी प्रतिबिंब बदलत नाही हे हिला कसे कळावे ?दिसेल तिच्याशी भांडायचं वृत्ती असलेल्या या चिमणीला आरशातल्या चिमणीचा इतका राग का बरं येत असेल? दुसरी चिमणी म्हणून तर इतका राग राग करत नसेल ना ती?

माझ्या मनांत असाही विचार आला की जर आरशातले प्रतिबिंब म्हणजे आपणच आहोत हे तिला समजलं तर आपण आपलाच किती राग राग केला ह्याच तिला वाईट वाटेल का ?…

आताशा मी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहते. चेहराच नव्हे तर मनही दिसतं का? हे शोधण्याचा प्रयत्न करते.आरशातील प्रतिबिंबकडे पाहते तेव्हा माझा चेहरा माझ्याशी बोलतो. तो माझ्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तो माझ्या मनाचा देखील आरसा आहे. त्यामुळे प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर दिसते. माझं मन आरशासारखं चमकदार बनवायचा मी चंग बांधला आहे. एकदा का ते आरशासारखं चकचकीत झालं की माझ्या मनात मी डोकावले की माझं खरंखुरं प्रतिबिंब दिसेल. तेव्हा कदाचित ती स्वतःभोवती एक गिरकी घेऊन म्हणेन……

मी कशाला आरशात पाहू ग….

मीच माझ्या रुपाची राणी ग…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

image_print
0 0 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments