सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंगांतून गीतेचे तत्वज्ञान
देह बुद्धी नष्ट होऊन भक्तिमार्गाने परब्रम्ह प्राप्त झाले, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होते, हे तत्त्वज्ञान आहे. परंतु तुकाराम महाराजांना पांडुरंगाची अखंड भक्ती करून त्याची सेवाच करायची आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही, म्हणून त्यांच्या एका अभंगात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,
आमुचे उचित/ हेचि उपकार/
आशपुलाची भार/ घालू तुज//
आमच्या योगक्षेमाचा भार देवा तुझ्यावर घालून स्वस्थ बसणे हेच उचित आहे.
मी भक्त व तू माझा हरी, अशी द्वैतभावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसत असली
तरी अद्वैत झाल्याशिवाय, खरा भक्त असूच शकत नाही हे त्यांच्या अभंगातून दिसणारे गीतेचेच तत्त्व आहे. ते अभंगातून स्पष्ट सांगतात,
दुजेखंडे तरी/ उरला तो अवघा हरी/
आपण बाहेरी/ नलगे ठाव धुंडावा//
इतुले जाणावया जाणा/ कोड तरी मने मना/
पारधीच्या खुणा/ तेणेची जाणाव्या//
तुकाराम बुवा या अभंगात काय सांगतात? मनानेच मनाला जाणले पाहिजे. जो पारधी असतो तो शिकारीचा शोध कसा घेतो, हे दुसरा पारधीच जाणतो. आपला हरी हा आपल्या जवळच आहे, तो दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही.
देह आधी काय खरा/ देहसंबंध पसारा/
बुजगावणे चोरा/ रक्षणसे भासते//
तुका करी जागा/ नको वासपू वाऊगा/
आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//
तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात, आणि सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैत रूप हरी तुला सापडेल, कारण तू स्वतःच परमात्मरूप आहेस. तुझी आत्मदृष्टी उघडी ठेवशील तर तुला हा बोध होईल.
थोडक्यात महाराजांना इथे असे सांगायचे आहे, की संपूर्ण विश्वात, चराचरात जो परमात्मा भरलेला आहे, तो तुला तू जर डोळे उघडे ठेवलेस तरच दिसू शकेल. आपल्याला एखादा माणूस सहज कुठेतरी भेटतो, आणि आपली मदत करून जातो. परमेश्वराच्या रूपानेच आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला होता याची मात्र आपल्या देहधारी माणसाना जाणीव नसते.
भगवंताने अर्जुनाला काय सांगितले?
“तुझे सर्व कर्म मला अर्पण कर.” तुकाराम महाराजही मुमुक्षुंना हेच सांगत आहेत.
आहे ते सकळ/ कृष्णासी अर्पण/
नकळता मन/ दुजे भावी//
म्हणून पाठे/ लागतील भुते/
येती गिवसित /पाच जणे/
(पंचमहाभूते, ज्यापासून माणसाचे शरीर बनले आहे)
ज्याचे त्या वंचले/ आठव न होता/
दंड हा निमित्त कारणे/ तुका म्हणे//
अर्थात सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण न ठेवल्यामुळे, माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्याला दंड मिळतो.
तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा गीतेत आलेल्या धर्म रक्षणाचे महत्त्व जीवनात का आहे ते त्यांच्या अभंगातून सांगतात, त्याचप्रमाणे शांत मनोवृत्तीचे महत्व ते समजावून सांगतात.
शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख/
म्हणवुनी शांती धरा/ उतराल पैलतीरा//
अंगी भरती आधी व्याधी/ तुका म्हणे त्रिविध ताप/ मग जाती आपोआप//
मन जेव्हा शांत असेल, त्याचवेळी सर्व दुःखांचा नाश होऊन पैलतीरास जाणे सोपे होईल.
साळंकृत कन्यादान/ पृथ्वीदानाच्या समान/
परिते न कळे या मुढा/ येईल कळो भोग पुढा//
आचरता कर्म/ भरे पोट राहे धर्म/
सत्या देव साहे/ ऐसे करूनिया पाहे//
अन्न मान धन/ हे तो प्रारब्ध आधीन/
तुका म्हणे सोसे दुःख/ आता पुढे नासे//
गीतेतील कर्मयोग महाराजांनी या अभंगात भक्तांना सांगितला आहे. या ठिकाणी त्यांनी तत्कालीन वर्णाश्रमधर्माचे महत्त्व लक्षात घेतले आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला अनुसरूनच कर्म केल्याने दुःख राहत नाही असा या अभंगातून त्यांनी उपदेश केला आहे.ज्याप्रमाणे
कृष्णाने पार्थास त्याच्या क्षात्र धर्माचे पालन करण्यास सांगितले.
क्रमशः…
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




