सुरेखा चिखलकर

🌸 विविधा 🌸

☆ मुद्दा माझा मते तुमची… ☆ सुरेखा चिखलकर ☆

☆

गुगल आणि AI मुळे पुस्तकांचे महत्व कमी झाले आहे का? वाचन संस्कृती लयास जाण्याची भीती निर्माण झाली आहे का?

खरे सांगायचे झाले तर नाण्याला जशा दोन बाजू असतात. तसेच या मुद्द्याला दोन बाजू असू शकतात.

काही वेळा आपण ही एखाद्या मुद्द्याला अडखतो एखादा शब्द आपल्याला आठवत नाही मग त्यावेळी आपण गुगल सर्च करतो. पण याचा अर्थ आपण सगळे त्याच्याकडून शब्दशः नाही घेऊ शकत ना. जरी AI कडून जरी घेतले तर ते फक्त शब्द असतात त्यात आपली भावना थोडीच असते नाही ना. म्हणून मला वाटते. पुस्तकाचं महत्त्व कमी झालं नाही. त्याचा अर्थ बदलला आहे. मी माझ्याच कवितेचे उदाहरण देऊ शकते

मी माझ्या कवितांमध्ये म्हणते. “कागदाच्या कुशीत नाही. तर माझ्याच मनाच्या गर्भातून एक शब्द जन्म घेतो तेव्हा त्याला मी कविता म्हणते. ” हीच गोष्ट पुस्तकाची आहे. गुगल माहिती देतं. AI शब्द जोडून देतं. पण त्या शब्दाला गर्भातून जन्म देणं. त्याला नसा-नसांतून दुडू-दुडू धावायला लावणं. आणि लेखणीला पान्हा फोडणं – हे काम फक्त माणसाचं मनच करू शकतं. आणि तेच काम पुस्तक करतं. मग आता प्रश्न उरतो. तर मग बदललं काय?

पहिला बदल म्हणजे आपण वाचणं विसरलो नाही. आपण खोल वाचणं विसरलो आहोत. आपल्याला ३०० पानांची कादंबरी वाचायला वेळ नाही. पण ३० सेकंदात तीन रील्स बघायला वेळ आहे. तासनतास आपण मोबाईल घेऊन बसायला वेळ आहे. पण मन पुस्तकांच्या पानावर स्थिर होत नाही. हीच खरी भीती आहे. वाचन कमी झालं नाही. वाचन उथळ झालं आहे. सगळ्या गोष्टी वरवरच्या झाल्या आहेत.

दुसरा बदल म्हणजे लिहिणं खूप सोपं झालं आहे. आज कोणीही एका क्लिकवर कविता तयार करू शकतो. पण त्यामुळे खरी कविता ओळखणं कठीण झालं आहे. बऱ्याच वेळा कविता AI कडून लिहून घेतली जाते पण तीच कविता मनापासून सादर करता येईल का. तर नाही कारण AI फक्त शब्द देते तर लेखक आपला जीव ओतून एक भावनाशील कविता तयार करतो

म्हणून तर जे अस्सल आहे ते कधीच लयास जाऊ शकत नाही. आजपर्यंतच्या सर्व लेखकांची पुस्तक आजही आपण वाचतोच ना. कितीही रिल्स आल्या तरीही पुस्तक हातात घेऊन वाचल्याशिवाय आपले समाधान होत नाही. म्हणून तर पुस्तकाला अनुभव म्हणून जपायचं आहे.

गुगल हे उत्तराचं दुकान आहे. पण पुस्तक हे प्रश्नांचं अगणित भंडार आहे. ते तुम्हाला विचार करायला लावतं. AI तुम्हाला कविता लिहून देईल. पण मी माझ्याच कवितेत म्हणल्याप्रमाणे “मी तुझा किनारा नाही. तू माझी भरती आहेस” ही भरतीची ओढ AI ला कधीच कळणार नाही. ती फक्त कविता जगलेल्या कविलाच कळते.

शेवटी मी म्हणेल AI ला सोबती म्हणून घेऊया. पुस्तक हे फक्त कागदाचा तुकडा नाही. माझ्याच शब्दात सांगायचं तर. “माझ्या मनस्पर्शाने कागदाचा तो कोरा तुकडा देह होतो… ” हा देह जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. एक पुस्तक विकत घ्या. एका मुलाला गोष्ट वाचून दाखवा. एक कविता मोठ्याने म्हणा. आपण काही गोष्टी आपल्या पासून सुरू केल्या तर पुस्तक मरणार नाही. कारण जोपर्यंत माणसाच्या मनात वेदना आहे. वात्सल्य आहे. तोपर्यंत त्याला व्यक्त होण्यासाठी कागदच लागेल. बरोबर ना

🙏 

© सुरेखा चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted