विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ६ – ढिंचणीया – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
काही दिवसापूर्वी एका जुन्या घरात जाण्याचा योग आला. त्या घरातील वयस्कर व्यक्तीने खूप जुन्या वस्तू एका पत्र्याच्या पेटीत ठेवल्या होत्या. त्यात एक लाकडी वस्तू सापडली. ती काय असेल? हे काहीच समजेना. मग त्या गावात जरा वयस्कर, जाणकार व्यक्तींकडे चौकशी करताना काही माहिती मिळाली. तर या वस्तूचे नाव होते, ढिंचणीया किंवा गुडघवणी या वरूनही काही संदर्भ लागेना. पण जरा सखोल चौकशी करता, या बहुउपयोगी वस्तूची काही माहिती मिळाली.
‘ढिंचणीया’ हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील, विशेषतः मराठा आणि राजस्थानी दरबारी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण साधन आहे. हे मुख्यत्वे गुडघा किंवा कोपर टेकण्यासाठी वापरले जात असे.
शिष्टाचार म्हणून जुन्या काळी राजदरबारात किंवा मोठ्या व्यक्तींसमोर बसताना जमिनीवर गुडघे टेकून बसण्याची पद्धत होती. बराच वेळ या स्थितीत बसल्यामुळे गुडघ्यांना त्रास होऊ नये, म्हणून या ‘ढिंचणीया’चा आधार घेतला जात असे. हे केवळ एक साधन नसून ते वापरणाऱ्याच्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. राजा-महाराजांचे ढिंचणीया हस्तिदंती, चांदीचे किंवा महागड्या लाकडावर नक्षीकाम केलेले असायचे.
याचे वेगवेगळे आकार असतात. त्या नुसार त्याचे उपयोग बदलतात.
काहींचा वरचा भाग चंद्राकार असतो, ज्यावर गुडघा व्यवस्थित स्थिरावतो. खालचा भाग रुंद आणि जड असतो जेणेकरून ते हालू नये.
ढिंचणीयावर अतिशय सुंदर मणी काम आणि झालर लावलेली असे. अशा वस्तूंवर सहसा रेशमी कापड, मखमलीचे अस्तर किंवा बारीक धातूचे काम केलेले असते.
हे महाराष्ट्रातील जुन्या घरांमध्ये वापरले जाणारे एक लहान आसन किंवा आधार आहे. याचा आकार डमरूसारखा किंवा पेला उलटा ठेवल्यासारखा असतो. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवण करत किंवा इतर कामे करत, तेव्हा गुडघ्याला किंवा हाताला आधार देण्यासाठी याचा वापर केला जात असे.
ढिंचणीया विविध प्रकारात पाहायला मिळते.
लाकडी व संखेडा प्रकार:
‘संखेडा’ शैलीतील ही गुजरातमधील एक प्रसिद्ध लाकडी कोरीवकाम आणि रंगकाम करण्याची कला आहे, ज्यामध्ये गडद लाल, मरून आणि सोनेरी रंगांचा वापर करून सुंदर नक्षीकाम केले जाते.
पितळी सजावट: लाकडी ढिंचणीयावर पितळी फुले लावून त्याला अधिक आकर्षक बनवलेले असते. हे विशेषतः श्रीमंत किंवा सरंजामी थाटाच्या घरांमध्ये पाहायला मिळत असे.
हे साधारणपणे ४ ते ६ इंच उंचीचे असतात, जेणेकरून बसलेल्या स्थितीत हाताचा कोपर किंवा गुडघा त्यावर टेकवता येईल. त्या मुळे गुडघ्या वरचा ताण कमी होतो. मांडी लॉक व्हायला मदत होते, ज्या मुळे दीर्घकाळ ताठ बसता येत असे. या मुळे रक्ताभिसरण सुरळीत रहाते. आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. काशाचे ढिंचण आरोग्यासाठी चांगले असते.
यावर नक्षीकाम, छिद्रे असतात. त्या मुळे हवा खेळती रहाते. आणि घाम येत नाही.
काही लाकडी ढिंचण बुद्धीळातील प्याद्याच्या आकाराचे असायचे. त्याने शरीराच्या काही भागावर मसाज करण्यासाठी वापर केला जायचा. काहीवर जप करताना कोपर टेकवला जात असे. त्यामुळे हाताला रग लागत नसे.
हे केवळ उपयोगाची वस्तू नसून घराच्या सौंदर्यात भर घालणारे एक शोभेचे साधनही मानले जात असे.
आजच्या काळात या वस्तू केवळ संग्रहालयात किंवा जुन्या घराण्यांच्या वारशात पाहायला मिळतात. पण कोणाच्या घरात असेल तर त्याची काळजी घेऊन शोभेच्या वस्तूंची नक्कीच शोभा वाढवेल.
सफाई आणि निगा राखण्यासाठी काही गोष्टी कराव्यात.
धुळीपासून संरक्षण करण्यासाठी यावर बारीक मणी आणि धागे असल्याने ओल्या कापडाचा वापर टाळावा. मऊ ब्रशने (उदा. पेंट ब्रश) हळुवारपणे धूळ झटकून घ्यावी.
पाण्याचा वापर टाळावा. जर यामध्ये लाकूड किंवा पुठ्ठा असेल, तर पाणी लागल्याने ते फुगू शकते किंवा मणी सुटू शकतात.
धातूची चकाकी टिकवण्यासाठी जर त्यावर चांदीचे किंवा पितळेचे मणी असतील, तर त्यांना हलक्या हाताने कोरड्या सुती कापडाने पुसावे. कोणत्याही प्रकारचे तीव्र केमिकल वापरू नका.
या वस्तूचा वापर केवळ प्रदर्शनासाठी म्हणून करावा. हवेतील ओलाव्यापासून वाचवण्यासाठी काचेच्या कपाटात (Showcase) ठेवणे सर्वोत्तम ठरेल.
अशाच काही पूर्वी उपयुक्त पण आता काळाच्या ओघात हरवलेल्या व दुर्मिळ वस्तूंची माहिती घेऊ या.
© विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





