image_print

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ श्री सूक्तएक ‘अर्थ ‘पूर्ण  प्रार्थना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कुठल्याही देवी- पूजनाच्यावेळी आवर्जून श्रीसूक्त म्हटलं जातं. देवी-स्तुतीव्यतिरिक्त श्रीसूक्तात काय आहे याची माहिती मिळाल्यावर, ती साररूपात इतरांनाही सांगावी असं मनापासून वाटलं.

धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, त्यापैकी धर्म हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. अर्थ आणि काम हे जीवनाच्या भौतिक विकासासाठी आवश्यकच आहेत,पण त्यांच्या मुळाशी धर्म असावाच लागतो. श्रीसूक्तात अशा धर्माधिष्ठित लक्ष्मीला आवाहन केलेले आहे. अर्थ म्हणजे धन धर्ममार्गाने प्राप्त केले तर कधीच सोडून जात नाही, हा विश्वास यात आहे. ही लक्ष्मी कशी यावी, कायमस्वरुपी कशी रहावी, आणि आयुष्यातल्या सर्व सुखांचा मर्यादशील उपभोग घेण्यासाठी कशी जपावी, यासाठी केलेली सुंदर प्रार्थना म्हणजे श्रीसूक्त.

श्रीसूक्त हे एक व्यापक ‘अर्थ’ शास्त्र आहे. अर्थ, अर्थात धन आयुष्यात महत्त्वाचे असतेच. म्हणूनच ‘धनलक्ष्मी’ ही संपत्तीची देवता असे म्हणतात. इथे संपत्ती म्हणजे फक्त पैसा अभिप्रेत नाही. उत्तम गुण, उत्तम आरोग्य, उत्तम अन्न, उत्तम ज्ञान, उत्तम मित्र, ही सुद्धा मौल्यवान संपत्ती आहे जी यथायोग्य मिळाली तरच आयुष्य सुखी-समाधानी होते आणि आत्मिक विकासाची वाटही सापडू शकते. उपभोग-दान-विलय या धनाच्या तीन अवस्था आहेत.

लक्ष्मी मातृस्वरूप आहे असे मानले आहे, म्हणूनही तिची पूजा केली जाते. मिळवलेली सर्व प्रकारची माते-समान पवित्र संपत्ती कायम-स्वरुपी आपल्या घरी रहावी, ती प्रसाद समजून स्वीकारावी, हा फार मोठा हेतू लक्ष्मी-प्रार्थनेमागे आहे.

श्रीसूक्तात अग्नीला प्रार्थना केली आहे की, ‘त्या तेजस्वी लक्ष्मीला तू माझ्या घरी घेऊन ये. ती कधीही परत जाऊ नये. आणि ती वाजत गाजत येऊ दे ‘….. गर्भितार्थ असा की, ही धनरूपी लक्ष्मी पवित्र, स्वकष्टार्जित आणि चोख असावी. ती लपवावी लागू नये. ती उजळ माथ्याने घरात विसावली तरच मनःशांती आणि समाधान लाभते. तिला ‘आर्द्रा’ असेही म्हटलेले आहे. समुद्रपुत्री आणि विष्णूपत्नी म्हणून ती क्षीर-सागरात तर रहातेच. शिवाय तिच्यात वात्सल्याचा, भावनांचा ओलावा आहे, म्हणून ती अंतर्बाह्य ‘आर्द्रा’ आहे, जिच्या सोबत जीवन सुसह्य आणि आनंदमय होऊ शकतं.

धनाला अशी लक्ष्मी मानल्यामुळे, सर्वांनीच याप्रमाणे चोख व्यवहार केला, तर समाजजीवनही अत्यंत आनंदमय आणि समाधानी राहील हाच अप्रत्यक्ष संदेश श्रीसूक्तातून दिलेला आहे.

यात धनलक्ष्मीला  आवाहन केलेले आहे की ….’देवांनीही तुझा आश्रय मागावा इतकी तू उदार आहेस. तुझ्या-मुळेच आमचं दारिद्र्य नष्ट होईल‘…… अर्थात ‘दारिद्र्य फक्त पैशाचे नसते. ते बुद्धीचे,विचारांचे आणि भावनांचेही असते. तेही नष्ट व्हावे आणि माणसाचे व्यक्तिमत्व संपन्न व्हावे‘. दारिद्र्य म्हणजे ‘अलक्ष्मी‘. हिचे वर्णनही यात केलेले आहे…..’अनेक प्रकारच्या तहान-भुकेमुळे मलीन झालेली, जगभर मोठ्या प्रमाणात वास करणारी, आणि अतिदुःखदायक अशी लक्ष्मीची मोठी बहीण‘…..ती घराबाहेर गेली तरच क्लेशकारक दारिद्र्य सर्वतोपरी नाहीसे होऊ शकते, जे एका माणसासाठीच नाही, तर एका राष्ट्रासाठीही आवश्यक आहे. तरच श्रीमंती आणि गरिबी यात जगभर दिसणारी प्रचंड दरी सांधण्याची शक्यता आहे.

श्रीसूक्तात पुढे म्हटले आहे की, या तेजस्वी लक्ष्मीने तपश्चर्या केली त्यातून बेलाचे झाड निर्माण झाले. त्याचे त्रिदल पान म्हणजे सत्व- रज- तम या त्रीगुणांचे, त्रिविध तापांचे, बाल्य- तारुण्य- वार्धक्य या तीन अवस्थांचे, आणि कर्म- अकर्म- विकर्म या कर्मत्रयांचे प्रतीक आहे. हे त्रिदल ईश्वरचरणी समर्पित करायला लक्ष्मी शिकवते, आणि स्वतः अर्थलक्ष्मी, ज्ञान- लक्ष्मी आणि आत्मलक्ष्मी, या त्रिविध रूपात उपासकाकडे रहाते.

श्रीसूक्तात अशीही प्रार्थना आहे की….. “या समृद्धी संपन्न राष्ट्रात मी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे कुबेराने मलाही ‘चिंतामणी’ देऊन समृध्द करावे. माझी कीर्तीही वाढावी. माझ्या राष्ट्राची थोर परंपरा, समृध्द संस्कृती आणखी उज्ज्वल होण्यासाठी माझाही हातभार लागावा. “म्हणूनच वाटते की श्रीसूक्त ही राष्ट्र -प्रार्थनाही आहे……..’आसेतू हिमाचल पसरलेल्या या संपन्न राष्ट्राचा प्रतिनिधी असणारा मी, लक्ष्मीचा वरद-हस्त लाभलेला समृध्द नागरिक असावा ‘…… अशी ही मनोमन प्रार्थना आहे.

शेवटी आशिर्वाद मागितला आहे……..” उपासकांच्या मनाला कामक्रोधादी सहा रिपूंचा वाराही लागू नये. आणि त्यांच्यावर या पवित्र लक्ष्मीचा वरदहस्त सदैव रहावा. ”

…… श्री लक्ष्मी नमो नमः…….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

माहिती सहाय्य: सौ शुभदा मुळे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments