image_print

सौ. पुष्पा चिंतामन जोशी

संक्षिप्त परिचय 

संप्रत्ति – प्रथम रिजर्व बैंक ऑफ इंडिया व नंतर आई डी बी आई,  डेप्युटी मैनेजर म्हणून स्वेच्छानिवृत्ति

आवड – वाचन, लेखन, संगीत व प्रवास

प्रसिद्ध साहित्य – लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, श्री दीपलक्ष्मी, ललना, विवेक, भटकंती, रूची, मेनका, अथश्री , ब्रह्मवार्ता, चार चौघी वगैरह

दिवाळी अंक – मानिनी, अनुराधा, उत्तम कथा, हेमांगी यामध्ये प्रवासवर्णन वर लेख

इतर – ललित लेख, कथा, टी व्ही व रेडिओवर कार्यक्रम, परिक्षक म्हणून तसेच अनेक मंडलमध्ये विविध  विषयांवर भाषणे

पुस्तके – देशोदेशींचे नाभांगण  (माननीय यशवंतराव चव्हाण वांग्मय परितोषिक प्राप्त), चला आसामापासून अंदमान पर्यंत, निसर्गरम्य सातारा, सफर अलीबागची (शालेय विद्यार्थ्यासाठी), ओंजळीतली चांदणफुळे

 ☆ विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामन जोशी ☆ 

लग्न होऊन मी आगाशी ला म्हणजे विरारच्या पुढे राहायला गेले. कोकणातल्या सारखे मागे पुढे अंगण विहीर छोटी वाडी असलेले ते घर होते. साहजिकच घरात विठू नावाचा लाडका कुत्रा  सोबतीला होता.

लहानपणापासून माझं कुत्रा या जमातीशी अजिबात पटत नाही. पण विठू म्हणजे सासर घरचं इमानी श्वान होतं. मी विठू बरोबर सुरक्षित अंतर राखून राहिले. त्यानेही माझी फारशी दखल घेतली नाही .माझा अलिप्तपणा एखाद्या सूज्ञ वृद्धा सारखा त्याने सहन केला. एक-दोन वर्षातच  वृद्धत्वामुळे विठू  ‘विठू चरणी’ विलीन झाला. त्यानंतर अर्थातच घरात पुन्हा श्वान प्रवेश झाला नाही.

जोगेश्वरीला रहायला आल्यावर रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे माझ्या त्यांच्याविषयीच्या नाराजीत भरच पडली. दिवसभर झाडाखाली नाहीतर मातीच्या खळग्यात डाराडूर झोपणारे हे प्राणी रात्र झाली की ताजेतवाने होतात. आणि अपरात्री तारस्वरात चित्र विचित्र आवाजाने आपल्या झोपेचे खोबरे करतात. अनेक श्वानप्रेमी रस्त्यावरच्या कुत्र्यांना इतकी बिस्किटे खायला घालतात की नंतर ही बिस्कीटही त्या कुत्र्यासारखीच ठिक ठिकाणी लोळत पडलेली असतात. अशाच एका श्वानप्रेमी बाईला मी एकदा म्हटले की ‘अहो,आता तो मारी खाऊन खाऊन कंटाळला आहे. क्रिमची बिस्किट घाला त्याला. माझा उपहास लक्षात न घेता ती म्हणाली, ‘नही उसे मारी ही प्रिय है. आज शायद उसकी तबियत ठीक नही है.’

आमच्या लहानपणी भटके कुत्रे पकडून नेण्यासाठी म्युनिसिपालिटीची गाडी येत असे. पण हे हुशार प्राणी आधीच तिच्या वासाने पळून लपून बसत. नंतर त्यांच्या नसबंदी ची योजना आली. कागदोपत्री या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च झाला. पण मूळ समस्या रस्तोरस्ती आरामात वाढत राहिली आणि अशा भटक्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे मृत्यू  झाल्याच्या बातम्यात आणखी भर पडली.

अनेक श्वानप्रेमी त्यांच्या लाडक्याला गळ्यात पट्टा बांधून रस्त्यावर फिरवीत असतात. त्यावेळी रस्त्यांवरील कुत्रे त्यांच्या अंगावर भुंकून भुंकून आपल्या हद्दीत अतिक्रमण  केल्याबद्दल त्यांना तंबी देतात. हे पाळीव लाडके हमखास रस्त्याच्या मधोमध विधी उरकतात. आणि साखळी हातात धरून श्वानप्रेमी ती बाललीला कौतुकाने पहात असतात. अशा एका श्वान प्रेमी तरुणीला मी एकदा  हटकले .तेव्हा रागारागाने माझ्याकडे पहात ती म्हणाली,

‘Surely we have a right to bring  our pets to the streets.’

‘Definitely. But  you  also have a duty to clean up after your  pet.’

माझ्यासारख्या पिकल्या केसांच्या बाईकडून तिला तिच्याच भाषेतल्या उत्तराची अपेक्षा नव्हती. ती आश्चर्याने माझ्या कडे पहात असताना आमचा वाद विवाद ऐकून, माझ्यासारखे फिरायला बाहेर पडलेले व इतर लोक गोळा झाले. त्यांनी माझ्या सुरात सूर मिळवला

‘What she says is right.’

‘हा. बराबर है. ध्यान नही रहता तो  वो गंदगी चप्पल बूट के साथ हमारे घर तक आती है.’

तेवढ्यात मी पर्स मधली प्लास्टिक पिशवी काढून तिच्यासमोर धरली आणि म्हटलं,

‘Use  this for  to-day and  don’t forget  next time. ‘

नाईलाजाने तिला ते काम करणं भाग पडलं. मला तात्पुरतं समाधान मिळालं. कारण सगळ्या श्वान  प्रेमींच्या वेळा सांभाळून त्यांना प्लास्टिक पिशव्या देणं अशक्य होतं.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामन जोशी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments