श्री जगदीश काबरे
☆ “आयुष्य बदलणारा क्षण ओळखा” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“कॅलेंडर नेहमी तारीख बदलत राहते, पण एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरच बदलून टाकते. म्हणून संयम ठेवा, प्रत्येकाची वेळ येणार असते.” ही ओळ केवळ प्रेरणादायी वाक्य नाही, तर मानवी जीवनाच्या सामाजिक आणि मानसिक गतीमानतेचे अत्यंत सूचक रूपक आहे. माणसाचे दैनंदिन जीवन हे सवयी, दिनक्रम, आणि पुनरावृत्ती यांमध्ये अडकलेले असते. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, परिस्थिती बदलत नाही असे भासते, आणि त्यामुळे निराशा किंवा हताशा निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण इतिहास आणि समाजजीवन आपल्याला सतत दाखवत असते की, या सतत चालणाऱ्या “तारीख बदलण्याच्या” प्रक्रियेतच एखादा क्षण असा येतो, जो संपूर्ण प्रवाह बदलून टाकतो. हा बदल वैयक्तिक स्तरावरही असू शकतो—जसे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य एका निर्णयामुळे पूर्णपणे बदलते किंवा सामाजिक स्तरावरही, जिथे एखादी घटना संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवते. येथे मला मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनातील एका विविक्षित घटनेची आठवण होते. अजून ते महात्मा व्हायचे होते तेव्हाची गोष्ट आहे ही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना एका खटल्यासाठी प्रिटोरियाला जात असताना डरबन रेल्वे स्टेशनवर एका गोऱ्या माणसाने गांधींकडे पहिल्या वर्गाचे तिकीट असूनही तो काळा माणूस आहे म्हणून त्यांच्या सामानासकट त्यांना प्लॅटफॉर्मवर धक्के मारून फेकले होते. तो क्षण गांधीजींच्या जीवनातला वळणबिंदू होता. कारण त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रहाचे हत्यार उपसून स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. हा क्षण म्हणजेच गांधीजींचा महात्मा होण्याचा क्षण होता. त्यांच्या जीवनात ती तारीख अशी होती की जिने कॅलेंडरच बदलून टाकले.
दुसरी गोष्ट अशी की, माणसाला जर यश मिळवायचे असेल तर त्याने संयम ठेवायची आवश्यकता असते. पण मानवी मन हे तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवते. मेहनत केल्यावर लगेच यश मिळावे, संघर्ष केल्यावर लगेच बदल दिसावा, अशी अपेक्षा असते. पण वास्तवात बदल हा संथ प्रक्रियेतून घडत असतो. ही संथता अनेकदा माणसाला खचवते, त्याचा आत्मविश्वास कमी करते. अशा वेळी “तुझीही वेळ येईल” हा आशावाद मनाला उभारी देतो. मात्र, या आशावादाची एक मर्यादाही आहे. केवळ वेळ येईल म्हणून निष्क्रिय राहणे, किंवा सर्व काही नशिबावर सोडणे, ही मानसिकता घातक ठरू शकते. तेव्हा संयम म्हणजे केवळ थांबणे नव्हे, तर सतत प्रयत्न करत राहण्याची तयारी आणि अपयशाला सामोरे जाण्याची ताकद होय.
समाजातील असमानतेमुळे अनेक लोक आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक कारणांमुळे मागे पडलेले असतात. त्यांच्यासाठी “एक दिवस येईल” ही कल्पना आशेचा किरण ठरते. पण दुसरीकडे, हीच कल्पना सत्ताधाऱ्यांकडून किंवा प्रभावशाली गटांकडून लोकांना शांत ठेवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. “तुमची वेळ येईल” असे सांगून वर्तमानातील अन्याय, विषमता किंवा शोषण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे या वाक्याकडे अंध आशावाद म्हणून न पाहता, त्यामागील वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी, हे वाक्य जीवनातील परिवर्तनाच्या शक्यतेवर विश्वास ठेवायला शिकवते, पण त्याचबरोबर तो बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीची जाणीवही करून देते.
थोडक्यात काय तर, कॅलेंडर बदलणारी तारीख आपोआप येत नाही; ती घडवावी लागते. म्हणूनच संयम आणि प्रयत्न यांचा समतोल साधणे हीच या विचाराची खरी किल्ली आहे.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






