श्री जगदीश काबरे
पुस्तकावर बोलू काही
☆ “देव का नाही?” – लेखक : आर्मीन नवाबी – डॉ. शरद अभ्यंकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : देव का नाही?
लेखक : आर्मीन नवाबी
अनुवादक : डॉ. शरद अभ्यंकर
प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा
डार्विनच्या सिद्धांतानुसार माणूस उत्क्रांत होत असताना आदिमानवाच्या काळापर्यंत तरी त्याच्या मनात देवाची संकल्पना निर्माण झालेली नव्हती. त्यानंतर तो जेव्हा टोळ्याटोळ्या करून राहू लागला आणि निसर्गातील अगम्य घटनांचा अर्थ काढायचा प्रयत्न करू लागला, त्यावेळेस त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली आणि त्या भीतीपोटी त्याने आपला कोणीतरी एक रक्षणकर्ता आकाशात बसलेला असे समजून देवाची निर्मिती केली. पण खरंच देव आहे की नाही, याचे खात्रीशीर उत्तर मात्र आजपर्यंत माणसाला मिळालेले नाही. सर्वसाधारण माणूस भीतीच्या छायेखाली जगत असल्यामुळे त्याला सतत देवाची गरज लागते. पण देव नाकारणारे त्यांच्या भीतीला आणखीन गडद करत असतात. त्यांना आपल्या श्रद्धेची मुळे उखडल्यासारखी वाटतात. म्हणून ते नास्तिकांना दुर्जन समजायला लागतात आणि मूळ प्रश्नापासून पळ काढतात. या सगळ्या विचाराचा परामर्श घेणारे ’देव का नाही? ’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालेले आहे. त्यात आपली भूमिका स्पष्ट करताना लेखक म्हणतात…
संघटित धर्माने पुरस्कृत केलेल्या हत्या आणि हिंसा यांचा सामना करताना श्रद्धावान मंडळी लगेच दाखवून देतात, की नास्तिक मंडळीसुद्धा तितकीच हिंस आणि आक्रमक असतात. काही तर असे सुचवतात, की नजीकच्या इतिहासात घडलेली अनेक हत्याकांडे जोसेफ स्टालिन किंवा माओ झेडोंग या मंडळीनी घडवलेली ही नास्तिक नेत्यांचीच करणी होती. आता हे मान्य, की स्टालिन व माओ हे भ्रष्ट नेते होते आणि त्यांनी आपल्या देशात धर्माची निर्भत्सना केली. पण या लोकांची अमानुष कृये ही नास्तिकतेतून निर्माण झाली किंवा अशी कृत्ये हे नास्तिक विचाराचे चिन्ह आहे असे म्हणणे त्यातून निष्पन्न होत नाही तसेच नास्तिकवाद हाच हुकूमशाहीचा निर्माता असतो हे म्हणणेही निश्चित चूक आहे. ईश्वरवादी लोकांनी श्रद्धेपायी घडवून आणलेल्या हत्या आणि हिंसा यांनी इतिहास भरलेला आहे. असा थेट संबंध निरीश्वरवादी हुकूमशहांचे बाबतीत आढळत नाही. खरे तर, असे थेट संबंध अधार्मिक एकाधिकारशहांचे मध्ये दिसून येतात, कारण ते स्वतः धार्मिक हुकूमशहांचे सारखेच वागतात आणि आपल्या विचारसरणीचे आपण देवच आहोत अशा थाटात वावरतात.
इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात असणारी हिंसा त्या धर्माच्या विचारसरणीतच अंतर्भूत असलेली दिसते. अनेक वेळा देवाच्या किंवा धर्माच्या नावाखाली पुकारलेले लढे आणि क्रौर्य हे धर्माव्यतिरिक्त, राजकारण, राज्य वाढवणे, अशा महत्त्वाकांक्षेपायी आचरणात आणले जातात, तरी यांचे समर्थन करण्यासाठी धर्माचे मायावरण त्याचेवर चढवले जाते, कारण केवळ अधिभौतिक हेतू असेल तर लोक आपले प्राण पणाला लावण्यास तयार होणार नाहीत. देवाचे नावाखाली लोक हौतात्म्य पत्करतात आणि बलिदान देतात, असे इतिहासात सर्वत्र आढळते आणि धर्मतत्त्वांचे खातर ‘धर्म-युद्धे’ पुकारली जातात.
नास्तिकवादासाठी असे काही घडलेले नाही, कारण नास्तिकवाद हा धर्म नाही. ‘देव देवता यावर विश्वास नसणे’ म्हणजे नास्तिकता. अधिकार गाजवणारी तत्त्वे त्यात नाहीत, कोणते नियमांचे पुस्तक नाही अथवा हटवादी तत्त्वे नाहीत. धर्म आणि नास्तिकवाद याची तुलना म्हणजे आंबा आणि केळी यांची तुलना होय. नास्तिकवादाची तुलनाच करायची झाली तर ‘देवावर विश्वास’ एवढेच मानणाऱ्या आस्तिकवादाशी करावी. काही आस्तिक हे मूलतत्त्ववाद मानतात; असे असले तरी केवळ ‘देवावर विश्वास’ यासाठी कोणी युद्ध वा लढे पुकारत नाहीत. अशासाठी लढे पुकारायला आणखी काही ठाम सिद्धांत आवश्यक असतात.
केवळ देव आहे वा देव नाही या कारणासाठी कोणी हत्याकांड घडवून आणत नाही. काही जादा हटवादी सिद्धांत त्याला जोडावे लागतात तरच अशी भयंकर कृत्ये साकारतात. आस्तिकवादी लोकांना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म अशी तत्त्वे पुरवतात, त्यातून सोयिस्कर सबबी उभ्या केल्या जातात. धर्मविरहित हुकूमशाही राजवटी आणि धर्म यात हे सिद्धांत साम्य आढळते. कोठला तरी ठाम सिद्धांत असे मांडतो, की आम्ही अधिकारी सांगतो म्हणून तो सिद्धान्त खरा आहे आणि त्याला विरोध कराल तर परिणाम भयंकर होतील; नव्हे प्राणघातक होतील. त्यामुळे नास्तिकवाद हिंसेला चालना देतो वा समर्थन करतो हे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. एवंच हुकूमशहांनी नास्तिकवादापायी हत्या केलेल्या नाहीत तसेच त्यांनी केलेल्या वाईट वा चांगल्या कृती या नास्तिकवादाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. दोन नास्तिक व्यक्तींची अन्य विषयातील मते एकसारखीच असतील असे नाही. पण ‘देवाचे अस्तित्व मान्य नाही’ एवढेच सर्व नास्तिकवादी लोकात समान सूत्र असते.
काही आस्तिक लोक श्रद्धेचे समर्थन थेट करण्याऐवजी असे मांडतात की, देवाची व्याख्या करता येत नाही किंवा मानवी मनाला देव समजावून घेणे अशक्य आहे. शेवटी असे दावे ‘म्हणून श्रद्धा मान्य करा’ या विधानावर येतात. जर एखादी गोष्ट वर्णन करता येत नसेल किंवा समजत नसेल तर तर्कसंगत प्रश्न असा की त्यावर विश्वास तरी का ठेवायचा? वर्णन न करता येणाऱ्या देवाची कल्पना मला खोडून काढता येणार नाही, पण तुम्हाला सिद्धही करता येणार नाहीं. एक उदाहरण घेऊ. मी समजा असा दावा केला की पुरातन वस्तूंचा शोध घेत असताना मला एक असे पात्र सापडले जे पूर्वी कोणी पाहिले नव्हते वा ज्ञात नव्हते. तुम्ही साहजिकच विचारणार, ‘ते कसे होते सांगा म्हणजे त्याचे वर्गीकरण करता येईल’, आणि मी उत्तर दिले की ते कसे दिसते ते मला अजिबात सांगता येणार नाही, तर ते कसे मान्य होणार? त्याचा आकार, रंग, जाडी, चमक, असे काही सांगितले तरच माझा दावा मान्य होणार ना? कदाचित काही लोक म्हणतील की वर्णन करता न येणे किंवा समजून घेता न येणे हा काही देव नाही असे समजण्याचा पुरेसा पुरावा होऊ शकत नाही. पण देव आहे असा खात्रीशीर पुरावा देता येत नाही, तोपर्यंत आम्ही तो नाही असे समजूनच आमचे व्यवहार चालू ठेवणार.
अशाप्रकारे देवाच्या संकल्पनेबाबत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विश्लेषण करणारे हे पुस्तक वाचकांना विचार करण्यास उद्युक्त करते. म्हणून सर्वांनी हे पुस्तक वाचावे अशी मी शिफारस करत आहे.
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






