श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक ११ वा – –
जनी सर्वसुखी असा कोण आहे?
विचारे मना तूचि शोधूनि पाहे|
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|
अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.
आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?
म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!
परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.
गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.
संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.
हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.
म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.
स्वसंवाद ::
- जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
- पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
- वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
- माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)
– – – –
श्लोक १२ वा – –
मना मानसी दुःख आणू नको रे|
मना सर्वथा शोक चिंता नको रे|
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|
अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.
देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.
जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.
समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.
स्वसंवाद ::
- मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
- भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
- देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
- विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
- माझे मन नियमितपणे भगवद्चिंतनात स्थिर राहते का?
– क्रमशः श्लोक ११ आणि १२.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



