श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७७ — –
करी काम नि:काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।
अर्थ : या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.
(नि:काम – निष्काम होऊन/निरिच्छ वृत्तीने, निर्द्वंद्व – सुखदुःखाच्या पलीकडे जाणे /द्वैतभाव नष्ट होणे, हरिकीर्तन – परमेश्वराचे गुणगान करणे)
विवेचन : परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.
त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, ” कुठे आहे तुझा ईश्वर? ” तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.
पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.
त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला. ” अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद ::
१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी ‘मागण्यासाठी’ (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या ‘स्वरूपासाठी’ (निष्काम) त्याची आराधना करतोय?
२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?
३. माझ्या मनातील ‘आपले-परके’, ‘चांगले-वाईट’ हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा ‘वृत्तीविश्वास’ दृढ झाला आहे का?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे “हे विश्वचि माझे घर” ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा ‘छेद’ (त्याग) करायला तयार आहे का?
– – – –
श्लोक क्र. ७८ – –
अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ।
महाराज तो स्वामी कैवल्यदाता ।
वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।।
अर्थ : ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला (पामराला) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.
(पामर – क्षुद्र /हीन /दीन /दुबळा, बाधणे – त्रास होणे, कैवल्यदाता – मोक्ष देणारा, वृथा – व्यर्थ)
विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. गरीब माणूस आपल्या कर्तृत्वाने स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. पामर हा त्या दृष्टीने महामूर्ख म्हणावा लागेल. कारण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा नाही, अशा माणसांना समर्थ पामर म्हणतात. मग तो ऐहिक दृष्ट्या भलेही श्रीमंत असेल, पण पारमार्थिक दृष्ट्या अभागी आणि हीन दीन.
असा माणूस आर्थिक दृष्ट्या भलेही सधन असेल पण प्रपंचात येणाऱ्या संकटांनी तो खचून जातो. प्रपंचातील संकटांचे तडाखे भल्याभल्यांना सोसवत नाहीत. छोट्यामोठ्या गोष्टींनीही अशी माणसे विचलित होतात. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर अशा माणसांना संसार आणि त्यातील अडचणी बाधक ठरतात. पण ज्यांची रामावर श्रद्धा आहे, अशा माणसांना प्रपंचातील संकटे विचलित करीत नाहीत. त्यांना संकटे येत नाहीत असे नाही. पण भगवंतावर सर्व भार टाकल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही.
या श्लोकात भगवंताच्या गुणांचे वर्णन करताना समर्थ तीन विशेषणे वापरतात. तो ‘महा ‘राज आहे, स्वामी आहे आणि कैवल्यदाता आहे. महाराज म्हणजे महान राजा. राजांचा राजा. रामराज्य होऊन आज हजारो वर्षे लोटली तरी रामराज्याची कल्पना आजही लोकांना भावते. रामराज्य म्हणजे आदर्श राज्य होते. राम हा आदर्श राजा. दुसरी गोष्ट म्हणजे तो या चराचराचा स्वामी आहे. इंग्रजी शब्द वापरायचा तर तो ‘ सुप्रीम पॉवर ‘ आहे. या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता तोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो कैवल्यदाता आहे. कैवल्यदाता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा. ज्याने ज्याने रामनाम घेतला, तो तरून गेला. मग तो वाल्या कोळी असेल, भक्त प्रल्हाद असेल, रामनाम घेणारी शबरी असेल किंवा अहिल्या असेल. हनुमंत आणि बिभीषण हे रामाचे भक्त तर चिरंजीव झाले.
थोडक्यात सांगायचे झाले तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष हा इच्छिलेले देणारा असतो. त्याच्या सावलीत बसून आपण काय मागायचे हे आपल्यावर आहे. तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारा आहे. कैवल्य प्रदान करणारा आहे. असा हा भगवंत आपल्या पाठीशी असताना आपण देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहत असतो. माझे कसे होईल, माझ्या मुलाबाळांचे, नातवंडांचे कसे होईल अशी चिंता आपण करीत बसतो. तर कोणाला या जगाचे कसे होईल अशा प्रकारची चिंता. अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी सामान्य माणूस गोंधळून जातो.
समर्थ म्हणतात, ‘ मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ‘ प्रारब्धानुसार जे घडायचे असते, ते घडणारच असते. आपण मात्र व्यर्थ चिंता करीत बसतो. त्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व भार त्याच्यावर सोपवावा. याचा अर्थ मात्र असा नाही की आपल्या वाट्याला आलेले कर्म न करता स्वस्थ बसायचे. अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठीच तर भगवंताने गीता सांगितली ना! तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वाट्याला आलेले निहित कर्म उत्तम प्रकारे करावे. तोच पुरुषार्थ आहे. इतर गोष्टी परमेश्वरावर सोपवाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, “घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. “मग देहाच्या आणि प्रपंच्याच्या चिंता आपल्याला सतावणार नाहीत.
स्वसंवाद ::
१. “माझे कसे होईल? माझ्या कुटुंबियांचे कसे होईल? ” या विचारसरणीत अडकून मी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे प्रपंचाची ‘वृथा’ (व्यर्थ) चिंता करत बसलो आहे का?
२. संकटाच्या काळात मी एका ‘पामरा’सारखा विचलित होऊन खचून जातो, की भगवंतावर संपूर्ण भार टाकून खंबीरपणे परिस्थितीचा सामना करतो?
३. कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आल्यावर मी त्याच्याकडे केवळ तात्पुरती ऐहिक सुखे मागत आहे, की चिरंतन शांती आणि मोक्षाची आस धरतो आहे?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “देव सुखाचा सागर” आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे का? मी माझे निहित कर्म करून उरलेला भार त्याच्यावर सोपवायला शिकलो आहे का?
– क्रमशः श्लोक श्लोक ७७ आणि ७८
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






