श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११३ आणि ११४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ११३ – –
जनीं हीत पंडित सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षेस झाले ।
तयाहूनि वित्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ।।११३।।
अर्थ : मोठमोठया पंडितांनी आत्महिताचा जो योग्य मार्ग होता, तो सोडून दिला. त्यांच्यामध्ये (आपल्या ज्ञानाचा) अहंकार निर्माण झाल्याने ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले. खरे तर अशा लोकांपेक्षा विद्वान कोण असू शकेल? तेव्हा हे मना, आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नकोस.
(हीत सांडीत गेले – आत्मकल्याणाचा श्रेयस्कर मार्ग सोडला, अहंता- गर्व/अभिमान, वित्पन्न – विद्वान, जाणीव – अहंकार)
विवेचन : आपल्या ज्ञानाचा व्यर्थ अहंकार बाळगणाऱ्या विद्वान किंवा पंडितांची मरणोत्तर कशी अवस्था होते ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. समर्थांच्या या सांगण्याला त्यांच्या आणि त्यांच्या काळातील परिस्थिती कारणीभूत होती. १३ व्या शतकापासून ते अगदी समर्थांच्या काळापर्यंत बऱ्याच शास्त्री पंडितांना आपल्या ज्ञानाचा अतिशय अहंकार होता. काही ग्रंथांचे अध्ययन केले म्हणजे ते स्वतःला प्रकांड पंडित समजत. आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी कोणी नाही असा अहंकार त्यांना होई. असे पंडित मग आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी देशोदेशी फिरत. तेथील विद्वानांना चर्चेत हरवून आपण श्रेष्ठ असल्याचे प्रशस्तिपत्रक मिळवीत आणि अभिमानाने ते मिरवीत. अशाच अभिमानी पंडितांनी साधुसंतांना त्रास दिला आहे. आयुष्यभर त्यांचा हाच विद्वत्तेचा अहंकार कायम राहिल्याने अंतकाळी देखील आपण वादात दुसऱ्याला हरवतो आहोत असे दृश्य त्यांना दिसत असे. ‘ अंते मती सा गती ‘ असे म्हटले जाते. असे विद्वान साहजिकच मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होत असत. आपल्याकडे अशी समजूत होती की अशा अभिमानी पंडितांना मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसाची पिशाच्च योनी प्राप्त होते. समर्थ म्हणतात की खरं तर यांच्यापेक्षा विद्वान कोण असू शकत होतं? पण त्यांनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग आत्मकल्याणासाठी न करता आपले पांडित्य मिरवण्यासाठी केला.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथरचनेचे श्रेय आपले गुरु आणि ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांना दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या ज्ञानाचे श्रेय रामकृष्ण परमहंसांना दिले. समर्थ तर स्वतःला रामाचे दास म्हणवून घेत. कोणीही आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगला नाही किंवा श्रेय आपल्याकडे घेतले नाही. तुकाराम महाराज तर ‘ फोडिले भांडार, धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही । असे म्हणतात. एवढी नम्रता संतांकडे असते.
समर्थांच्या चरित्रात एक मजेशीर घटना वाचायला मिळते. समर्थांच्या काळी वामन पंडित म्हणून एक विद्वान होऊन गेले. त्यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते आणि त्यांनी संस्कृतात ग्रंथरचना केली होती. परंतु सर्वसामान्यांना संस्कृत ग्रंथ वाचणे शक्य नसल्याने त्यांना समर्थांनी मराठीत लिहा म्हणून सांगितले. पण झाले उलटच! हे वामन पंडित समर्थांनाच नावे ठेवू लागले आणि तुम्हीच उलट संस्कृतमध्ये लिहा असे त्यांनी समर्थांना सांगू लागले. एक दिवस प्रवास करीत असताना वामन पंडितांना अंधार झाल्याने एका मोठया झाडाखाली मुक्कामासाठी थांबावे लागले.
त्या झाडाच्या एका फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसला होता. थोड्याच वेळात तिथे एक दुसरा ब्रह्मराक्षस आला. तो पहिल्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला, ” मी या शेजारच्या फांदीवर राहू शकतो का? ” तेव्हा तो ब्रह्मराक्षस म्हणाला, ” तू दुसरी जागा शोध. ही जागा मी वामन पंडितांसाठी राखून ठेवली आहे. ” हे ऐकताच वामन पंडितांना दरदरून घाम फुटला. पुढील जन्मी आपण ब्रह्मराक्षस होऊ या भीतीने त्यांची बोबडी वळली. सकाळी धावतच जाऊन त्यांनी समर्थांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. त्यावेळी समर्थांची प्रशंसा करताना त्यांच्या मुखातून पुढील रचना बाहेर पडली जी आजही समर्थ संप्रदायात म्हटली जाते.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।
कवी वाल्मिकीसारिखा मान्य ऐसा ।नमस्कार माझा तया रामदासा ।।
– तेव्हा आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगून आत्मकल्याणाचा हितकारक मार्ग सोडू नये, आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा हेच समर्थांना येथे सांगायचे आहे.
स्वसंवाद
१. माझ्याकडे असलेल्या पदव्या, ज्ञान किंवा माहितीचा मला वामन पंडितांसारखा ‘व्यर्थ अहंकार’ तर झालेला नाही ना?
२. मी माझ्या ज्ञानाचा उपयोग संतांसारखा समाजाच्या ‘आत्मकल्याणासाठी’ आणि हितासाठी करतो, की केवळ चर्चेत दुसऱ्याला हरवून स्वतःचे ‘पांडित्य मिरवण्यासाठी’ करतो?
३. तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे, “मी केवळ एक हमाल असून हे सर्व ज्ञान त्या भगवंताचे आहे” अशी नम्रता माझ्या ठायी आहे का?
४. मृत्यूच्या अंतापर्यंत जर मी माझा ज्ञानाचा किंवा पदाचा अहंकार सोडला नाही, तर माझ्याही वाट्याला वैचारिक किंवा शापयुक्त ‘ब्रह्मराक्षसाचे’ जिणे तर येणार नाही ना?
====
श्लोक क्र. ११४ – –
फुकाचे मुखीं बोलता काय वेचे ।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ।
क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे ।
विचारे तुझा तूंचि शोधून पाहें ।।११४।।
अर्थ : उगीचच बडबड करून व्यर्थ ज्ञान पाजळल्याने काहीच साधत नाही. मनातील अहंकार मात्र दिवसेंदिवस वाढतो. आचरण न करता केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणून हे मना, ही गोष्ट खरी आहे की नाही हे तू स्वतः शोधून काढ.
(काय वेचे – काही साधत नाही, अभ्यंतरीं – अंतरात, साचे – साठत जातो)
विवेचन : आधीच्या श्लोकात आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगणाऱ्या विद्वानांची अंती काय गत होते ते समर्थांनी आपल्याला सांगितले. या श्लोकात ते व्यर्थ पोकळ बडबड करून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या दांभिक लोकांवर कोरडे ओढतात. ‘ उथळ पाण्याला खळखळाट फार ‘ अशी आपल्याकडे म्हण आहे. थोडाफार अभ्यास केलेली माणसे आपल्याला फार कळते म्हणून व्यर्थ बडबड करीत असतात. कीर्तन, प्रवचने किंवा सभा संमेलनात अशी अनेक माणसे आपण पाहतो. त्यांच्याजवळ उत्तम वक्तृत्व असते. आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर ते श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतात. त्यातून त्यांचा अहंकार फुलत जातो. त्यांना कोणी काही सांगितले तरी त्यांची ऐकून घेण्याची तयारी नसते. आपल्या पांडित्याच्या जोरावर आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे ते दुसऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात.
आजकाल ज्ञान देणारी खूप साधने उपलब्ध झाली आहेत. दूरदर्शन, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यातून दररोज निरनिराळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. पण त्यातील खरी किती आहे, त्याला खरोखर अनुभवाची जोड आहे का हे पारखून घेणे महत्त्वाचे असते. जो तो माझेच म्हणणे कसे बरोबर असे सांगून आपले मत लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असतो.
व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की जी व्यासपीठावरून बोलतात एक आणि करतात वेगळेच. वैयक्तिक जीवनात त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते. हा शुद्ध दांभिकपणा आहे. आपण जे काही सांगतो, त्यामागे काही एक तपश्चर्या किंवा साधना असणे आवश्यक असते. जे ज्ञान आपण प्राप्त केलेले असते, ते आचरणात आणणे ही पहिली पायरी आहे. नंतरच ती गोष्ट लोकांना सांगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. ‘अभ्यासोनि प्रकटावे ‘असे समर्थांचे सांगणे आहे. एखादी गोष्ट केवळ आपल्याला माहीत आहे पण आपण स्वतः ती कधी आचरणात आणली नाही अशी गोष्ट दुसऱ्यांना सांगू नये. आपल्या बोलण्याला तेव्हाच वजन प्राप्त होते, जेव्हा आपण ती गोष्ट आचरणात आणतो. नाहीतर ती केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ‘
स्वतःचे मन हा आपले प्रतिबिंब पाहण्याचा एक उत्तम आरसा आहे. आपण बोललो आहे ते कितपत बरोबर आहे, आपण स्वतः ते आचरणात आणतो का हे आपले मन आपल्याला सांगत असते. म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या वागण्याबोलण्याविषयी विचार करावा. म्हणूनच समर्थ या श्लोकातील शेवटच्या चरणात म्हणतात, ‘ विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे. ‘ प्रत्येक श्लोकाच्या शेवटी दिलेले स्वसंवादाचे प्रश्न देखील असेच आत्मपरीक्षण आपल्याकडून व्हावे यासाठी आहेत.
स्वसंवाद :
१. मी चारचौघांत किंवा समाजमाध्यमांवर जे मोठे विचार मांडतो, ते मी केवळ ‘वक्तृत्वाचा प्रभाव’ पाडण्यासाठी मांडतो की प्रत्यक्षात आचरणातही आणतो?
२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या व्यर्थ बडबडीतून किंवा वाद घालण्यातून माझ्या अंतरात केवळ ‘गर्व’ साठत चालला आहे का?
३. माझ्याकडे येणारी कोणतीही माहिती किंवा ज्ञान पुढे सांगण्याआधी मी ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या सूत्राचा अवलंब करतो का?
४. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ओळखून, मी माझ्या स्वतःच्या मनालाच आरसा बनवून माझ्या ‘कथनी आणि करणीतील’ फरकाचे आत्मपरीक्षण करण्यास तयार आहे का?
– क्रमशः श्लोक ११३ आणि ११४
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





