श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १२१ आणि १२२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १२१ – – –
महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तया कारणे सिंहय झाला ।
न ये ज्वाळ वीषाळ संन्नीध कोण्ही ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२१।।
अर्थ : प्रल्हाद हा भगवंतांचा थोर भक्त होता. जेव्हा त्याला त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी भगवंताने सिंहाचे रूप धारण केले. सिंहरूपी भगवंताच्या अंगातून येणाऱ्या प्रचंड ज्वाळांमुळे त्याच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. भगवंत हा भक्ताभिमानी असून आपल्या भक्तांची तो कदापिही उपेक्षा करीत नाही.
(ज्वाळ वीषाळ – आगीच्या प्रचंड ज्वाला, सन्निध – जवळ, कोण्ही – कोणी)
विवेचन : प्रल्हाद हा भगवंताचा परमभक्त होता. प्रल्हादाचा उल्लेख करताना नेहमी भक्त प्रल्हाद असा केला जातो. त्याची कथा यापूर्वी ९६ व्या श्लोकात आली आहे. समर्थांनी त्याला महा भक्त म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे राक्षस कुळात जन्माला येऊनही आणि अत्यंत विपरीत परिस्थिती असूनही भगवंताची भक्ती तो एकनिष्ठपणे करीत राहिला. प्रल्हाद हा वयाने लहान असला तरी अत्यंत ज्ञानी होता. या चराचरात सर्वत्र भगवंत भरला आहे या गोष्टीवर त्याची दृढ श्रद्धा होती आणि त्या दृष्टीनेच तो सर्वांकडे पाहत होता. प्रल्हादाला महाभक्त म्हणण्याचे आणखी एक कारण आहे. त्याने परमेश्वराकडे त्याच्या एकट्याच्या मुक्तीची याचना केली नाही. भगवंताने सर्वसामान्य माणसांचा देखील उद्धार करावा अशी विनंती त्याने केली.
त्याच्यावर अनेक संकटे आली पण प्रत्येक वेळी प्राणांतिक संकटातून त्याला भगवंताने तारून नेले. प्रल्हादाची भक्ती जेवढी शुद्ध आणि निष्कपट होती, त्याच्या नेमका उलट त्याचा पिता हिरण्यकश्यपू हा होता. तो अत्यंत दुराचारी, भोगी आणि विलासी स्वभावाचा होता. त्याला मिळालेल्या वरामुळे त्याचा अहंकार कमालीचा वाढला होता. मीच परमेश्वर आहे असे तो समजू लागला होता. ज्याप्रमाणे शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून ठार केले. त्याप्रमाणेच आता हिरण्यकश्यपूच्या अपराधांची सीमा झाली होती.
हिरण्यकश्यपूला दिलेल्या वरानुसार देव, दानव किंवा मानव यांच्या हस्ते, अस्त्राने किंवा शस्त्राने, जमिनीवर किंवा आकाशात त्याचा वध होऊ शकत नव्हता. एक प्रकारे हिरण्यकश्यपूने अमरत्वच प्राप्त केले होते. त्यामुळे आपल्या भक्ताला छळणाऱ्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताला नरसिंह रूप धारण करावे लागले. हे नरसिंह रूप अत्यंत उग्र होते. त्याच्या अंगातून दाहक ज्वाळा निघत होत्या. त्यामुळे ते पाहून सर्वसामान्यांची पाचावर धारण बसली. त्याच्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होईना. परंतु भगवंताचा भक्त असलेला प्रल्हाद मात्र त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रणाम करू लागला. हाच नरसिंह अवतार. प्रल्हादाने नंतर त्याला सौम्य रूप धारण करण्याची विनंती केली. आता लक्ष्मीनृसिंह म्हणून या अवतारातील भगवंताची पूजा केली जाते.
या नरसिंह रूपात हिरण्यकश्यपूला दरवाज्यापर्यंत फरफटत नेऊन त्याला आपली नखे खुपसून ठार मारले. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचा कैवारी आहे. त्यांच्या रक्षणासाठी तो कोणताही अवतार धारण करून त्यांचे रक्षण करतो.
स्वसंवाद :
१. प्रल्हादाप्रमाणे माझ्या सभोवताली कितीही विपरीत, नकारात्मक किंवा नास्तिक परिस्थिती असली, तरीही मी माझ्या चांगुलपणावर आणि भगवंताच्या सात्त्विक विचारांवर एकनिष्ठ राहू शकतो का?
२. हिरण्यकश्यपूला मिळालेल्या अफाट सत्तेसारखा किंवा संपत्तीसारखा अहंकार माझ्या मनात डोकावतो का? मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो का?
३. जेव्हा भगवंताचे रूप उग्र किंवा संकटाचे वादळ प्रचंड असते, तेव्हा मी घाबरून दूर पळतो, की प्रल्हादासारखा निष्कपट आणि निर्भय भाव ठेवून त्या परिस्थितीला सामोरा जातो?
४. प्रल्हादाने जशी केवळ स्वतःच्या सुखाची किंवा मुक्तीची हाव न धरता सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली, तशी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही व्यापक भावना माझ्या प्रार्थनेत आणि आचरणात कधी उमटते का?
—–
श्लोक क्र. १२२ – – –
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तयाकारणे वामनु चक्रपाणी ।
द्विजांकारणे भार्गव च्यापपाणी
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२२।।
अर्थ : इंद्राने देवाची करुणा भाकली तेव्हा भगवंताने वामन अवतार धारण केला. द्विजांच्या रक्षणार्थ त्याने धनुष्यबाण धारण केलेल्या परशुरामाचा अवतार घेतला. भगवंत आपल्या भक्तांचा अशा प्रकारे कैवारी असून त्यांची तो कधीही उपेक्षा करीत नाही.
(वज्रपाणी – इंद्र, वामनु – वामन अवतार, चक्रपाणी – विष्णू /भगवंत, द्विज – ब्राह्मण, भार्गव – परशुराम, च्यापपाणी – धनुष्यबाण धारण केलेला/भगवंत)
विवेचन : आधीच्या श्लोकात आपण भक्त प्रल्हादाबद्दल जाणून घेतले. या श्लोकात त्याचा नातू असलेला बली याचा संदर्भ आला आहे. त्याशिवाय द्विजांच्या रक्षणासाठी झालेल्या परशुराम अवताराचा देखील संदर्भ आहे. प्रल्हादाप्रमाणेच बली हा देखील भगवंताचा महान भक्त होता. तो अत्यंत पराक्रमी होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे म्हणून शंभर यज्ञांचे आयोजन केले होते. त्यापैकी ९९ यज्ञ निर्विघ्नपणे पार पडले. आता शंभरावा यज्ञ पूर्ण झाला तर आपले इंद्रपद जाईल याची भीती इंद्राला वाटू लागली. त्याने विष्णूंची प्रार्थना केली.
विष्णूने मग अदितीच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला. बटू वेशात थेट बलीच्या यज्ञशाळेत प्रस्थान केले. बली हा दानवीर होता. त्याने वामनरूपातील विष्णूचे यथोचित स्वागत करून त्यांना आपल्याला जी गोष्ट हवी आहे, ती सांगा. मी लगेच आपल्याला देतो असे म्हटले. याप्रसंगी वामन रूपातील भगवंताने आपल्याला केवळ तीन पावले एवढी भूमी द्यावी अशी विनंती केली. ही अजब आणि अत्यंत किरकोळ विनंती ऐकून बली क्षणभर चक्रावला. पण त्याने वामनाची मागणी पूर्ण करण्याचे ठरवून हातावर उदक सोडले. यावेळी दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी बलीला विरोध करून असे करू नकोस असे सांगितले. पण आपल्या शब्दाचा पक्का असलेल्या बलीचा निश्चय अटळ होता.
त्याने हो म्हणताच वामन रूपातील भगवंताने विश्वव्यापक रूप धारण केले. एका पावलाने जमीन आणि दुसऱ्या पावलाने आकाश व्यापले. आता बलीने नम्र शरणागती पत्करली आणि आपले मस्तक त्याच्यापुढे झुकवले आणि तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्याची विनंती केली. तेव्हा वामनाने आपले तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवले. त्याने बलीला पाताळात धाडले. तिथले राज्य दिले आणि स्वतः विष्णू त्याचे द्वारपाल झाले. शिवाय पुढील मन्वंतरात विष्णूने बलीला इंद्रपद दिले. अशा रीतीने भगवंताने इंद्र आणि बली अशा आपल्या दोन्ही भक्तांची लाज राखली.
या श्लोकातील पुढील संदर्भ भगवान परशुरामांचा आहे. त्यांच्या काळात काही क्षत्रिय राजे अत्यंत अहंकारी आणि अन्यायी झाले होते. त्यांनी भगवंताचे भक्त असलेल्या निरपराध ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या या भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंताने जमदग्नी ऋषींच्या पोटी जन्म घेतला. हाच परशुराम अवतार. त्यांनी उन्मत्त झालेल्या क्षत्रिय राजांशी युद्ध करून त्यांचा नाश केला. काही लोक परशुराम अवताराला ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते योग्य नाही. कारण अन्यायी आणि अधर्मी राजांचा वध श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी देखील केला आहे. अशा रीतीने आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला भगवंत त्यांच्या रक्षणार्थ धावून जातो. तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
स्वसंवाद
१. बली राजाप्रमाणे मी माझ्या आयुष्यात दिलेला ‘शब्द’ किंवा घेतलेला चांगला ‘निश्चय’ कितीही मोठे नुकसान सोसावे लागले तरी अढळ ठेवतो का?
२. इंद्राप्रमाणे जेव्हा मला माझ्या पदाची किंवा वैभवाची भीती वाटते, तेव्हा मी मत्सर करत बसतो, की विवेकाने ईश्वराचा धावा करून योग्य मार्ग शोधतो?
३. वामन अवताराप्रमाणे, भगवंत जेव्हा माझा अहंकार दूर करण्यासाठी मला संकटात टाकतो, तेव्हा मी बलीसारखे स्वतःचे मस्तक (अहंकार) त्याच्या चरणी समर्पित करायला तयार असतो का?
४. परशुराम अवताराच्या कथेवरून, माझ्या अंगी असलेल्या शक्तीचा किंवा अधिकाराचा उपयोग मी उन्मत्तपणे इतरांना त्रास देण्यासाठी करतो, की दुर्बलांच्या रक्षणासाठी करतो?
– क्रमशः श्लोक १२१ आणि १२२
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





