?इंद्रधनुष्य?

 ☆ मार्ग शोधतांना — ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हां सगळ्यांना आठवत असेल. आंद्रे आगासीची एक मुलाखत नुकतीच माझ्या पाहण्यात आली. त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितला… 

तेव्हा जर्मनीच्या बोरीस बेकरने आगासीला सलग तीन सामन्यांमध्ये हरवले होते. बोरीस बेकर ज्याप्रमाणे सर्विस करायचा ती भेदणे जवळपास अशक्य होतं. आणि यावर मात कशी करायची यासाठी आगासी जंग जंग पछाडत होता. त्याने बोरीस बेकरच्या अनेक व्हिडिओ कॅसेट्स सारख्या बघितल्या. केवळ एकाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अँगलने पण बघितल्या. 

खूप बारीक अभ्यास करत असताना आगासी ला बेकरची एक सवय लक्षात आली. प्रत्येक वेळी सर्व्हिस करत असताना बेकर आपली जीभ बाहेर काढत असे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बेकरच्या सर्व्हिस ची दिशा आणि जिभेची दिशा एकच असायची. आगासीने वारंवार अनेक कॅसेट्स बघितल्या. प्रत्येकवेळी बेकरची जीभ त्याच्या मनात काय चाललं आहे हे आधीच सांगायची. मुख्य म्हणजे बेकरच्या नकळतच हे घडत होतं.

एकदा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आगासीला बेकरची सर्व्हिस भेदणें फार कठीण गेले नाही. मात्र बोरिस बेकरला संशय येऊ नये म्हणून आगासी मुद्दामच थोड्या चुका करत राहिला. कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस कळली आहे हे आगासीला लपवून ठेवायचे होते.

त्यानंतर सलग पुढचे ९ सामने आगासीने जिंकले. अचानक हा बदल कसा झाला हे बोरिस बेकरला शेवटपर्यंत कळले नाही. अखेरीस बोरिस बेकर निवृत्त झाल्यानंतर आगासीने बोरिसला याबद्दल सांगितले. ते ऐकून बोरिस जवळजवळ खुर्चीतून पडलाच !

बोरिस म्हणाला प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर सामना हरल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणायचो की “ हा माणूस माझं मन वाचतोय असं मला वाटतं आहे….” पण हे कसं ते कळत नव्हतं !!

मित्रांनो, स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच. पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास, मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहिजेतच !!

आंद्रे आगासीच्या या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. 

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments