सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना…… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख)

काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं…. “माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!”  या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी!!!!!

दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये…..!

असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा…..

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर!!!   मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं. अत्रेंचं तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे….

अत्र्यांच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पु.ल.नी अचूक पकडला आणि म्हणाले,

‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीति का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात, अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,

“मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.”

आचार्य अत्र्यांचा शब्द पु.ल.नी खोटा ठरू दिला नाही.  अत्र्यांच्यानंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पु.ल.नी चोख केले….!!!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा:…. याचंच मनोहारी दर्शन वरील प्रसंगातून सतेज दृग्गोचर झालं…!!!

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments