?इंद्रधनुष्य? 

☆ कृतज्ञता…. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

एका वाळवंटात एक चिमणी रहात होती. ती खूप आजारी होती, तिला पंख नव्हते, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि रहायला घरही नव्हतं. 

एके दिवशी एक कबूतर तेथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, “तू कुठे जात आहेस?” कबूतराने उत्तर दिलं, “मी स्वर्गात जात आहे.”

ती आजारी चिमणी म्हणाली, “कृपा करून माझा त्रास कधी संपणार या बद्दल माहिती मिळवशील का?” कबूतर म्हणालं, “नक्कीच, मी तपास करेन.” आणि कबुतराने त्या आजारी चिमणीचा निरोप घेतला.

कबुतर स्वर्गात पोहोचलं आणि प्रवेश द्वारावरील देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला. 

देवदूत म्हणाला, “तिच्या जीवनातील पुढील सात वर्षे तिला असाच त्रास सहन करावा लागेल व तिच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल.”

कबूतर म्हणालं, “हे ऐकून तर ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का?”

देवदूत म्हणाला, “मी सांगतो तसा तिला जप करायला सांग – परमेश्वरा, तू मला जे काही दिलं आहेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे, धन्यवाद.”

कबूतराने आजारी चिमणीला भेटून देवदूताने पाठविलेला निरोप सांगितला.

सात दिवसानंतर जेव्हा कबुतर तिथून जात होतं तेव्हा त्याने बघितलं की ती चिमणी खूप आनंदी आहे. तिच्या शरीरावर पंख फुटले होते, वाळवंटात एक लहानसे झाड उगवले होते, जवळंच पाण्याचा तलावसुद्धा तयार झाला होता आणि ती चिमणी आनंदाने गात होती, नाचत होती.

हे सर्वं पाहून कबूतर आश्चर्यचकित झालं. कारण देवदूताने सांगितलं होतं की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. ह्या  कुतूहलाने कबूतर परत स्वर्गाच्या दरवाजावर असलेल्या देवदूताला भेटयला गेलं.

कबुतराने त्याचे कुतूहल देवदूताला सांगितलं. देवदूताने उत्तर दिलं,  “होय, हे सत्य आहे की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नव्हता. परंतु प्रत्येक क्षणी चिमणी, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते”, हा जप करीत होती. म्हणून तीचं जीवन बदलून गेलं. 

ती जेव्हा गरम वाळूवर पडत असे, तेव्हा म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा ती उडू शकत नसे तेव्हा ती म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा तिला तहान लागत असे आणि आजुबाजूला पाण्याचा थेंब सुद्धा नसे तेव्हा सुद्धा ती हेच म्हणत असे की, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

परिस्थिती कोणतीही असो चिमणी हाच जप आळवित असे म्हणून तिची त्रासदायक सात वर्षे, सात दिवसात बदलून गेली.”

जर आपण लक्षपूर्वक पहिलं तर, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील जेव्हा कृतज्ञतेच्या भावनेने परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले, इतकेच काय एखाद्याचे संपूर्ण जीवन देखील. 

जर का आपणसुद्धा प्रत्येक प्रसंगी, “हे देवा, तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो”, हा जप करु शकलो तर त्यात आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे.

ही गोष्ट आपला दृष्टिकोन, आपल्या जवळ काय नाही पासून आपल्या जवळ काय आहे पर्यंत बदलण्यास मदत करते. 

उदाहरणादाखल आपले डोके दुखत असताना जर आपल्या उर्वरित आरोग्याबद्दल आपण देवाचे आभार मानले की, “माझे बाकीचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवल्याबद्दल तुमचे आभार” तर आपली डोकेदुखी सुद्धा फारशी त्रास देत नाही.

चला तर मग मिळालेल्या सर्वं आशीर्वादांबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.. त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सुखद बदल घडून येईल.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

सुंदर कहानी, बधाई