श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
कवितेचा उत्सव
☆ निरोप… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
नऊ मास उदरी वाहूनी
सांभाळले मजला मातेने
उपकार अनंत असती मजवर
निरोप घेतो कृतज्ञतेने।।
*
अनंत जन्म असतील घेतले
किती माता अन पुत्र किती
गणना त्यांची कशी करू मी
निरोप घेतो कृतज्ञतेने।।
*
गुरुजनांनी शिक्षण दिधले
मायपित्याने ‘शहाणे’ केले
अनपेक्षित अलौकिक मज लाभले
निरोप घेतो कृतज्ञतेने।।
*
सगेसोयरे आप्तस्वकीय
अकृत्रिम स्नेहे करती माया
जनव्यवहार शिकविला मजला
निरोप घेतो कृतज्ञतेने।।
*
निरोप तुझा कसा मी घेऊ
जिथून आलो तेथेच जाणे
हेच ज्ञान मजला लाभावे सत्वर
निरोप घेतो कृतज्ञतेने।।
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




