सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ निष्ठूर पाऊस… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
अरे अरे पावसा रे
झाले काय सांग तुला
असा कसा वेड्यावाणी
धाड धाड कोसळला
*
आधीच रे शेतकरी
गरिबीने पिचलेला
मशागत शेतीची रे
करुनिया भिजलेला
*
तुझ्यावर जीव त्याचा
संसार ही तुझ्यावर
अशा तुझ्या येण्याने रे
घालतोय गहिवर
*
उभे पिक पाण्यामध्ये
भूई सपाट रे झाले
पाहुनिया दैन्यावस्था
धाय धाय ते रडले
*
असा का रे रागावून
कधी होतोस बेभान
घर दार जनावरे
सारे नेतोस वाहून
*
चोहीकडे पाणी पाणी
गाव पुराने वेढले
अवचित आल्याने रे
लाखो संसार बुडाले
*
होऊ नकोस निष्ठूर
कशी आटली रे माया
धर आम्हावरी छाया
तुझ्या पडते रे पाया
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




