श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
काय ते विरक्ती न कळेची आम्हां /
जाणों एक नामा विठोबाच्या//१//
*
नाचेन मी सुखें वैष्णवांचें मेळीं /
दिंडी टाळघोळीं आनंदें या //२//
*
शांति क्षमा दया ते मी काय जाणें /
विठ्ठलकीर्तनें वांचूनियां //३//
*
कसया एकांत सेवूं तया वना /
आनंदें या जनामाजी असो//४//
*
कासया उदास होऊं देहावरीं /
अमृतसागरीं डुबोनियां //५//
*
तुका म्हणे मज असे हा भरवसा/
विठ्ठल सरसा चालतसे//६//
– संत तुकाराम.
तुका म्हणे
तुकाराम महाराजांनी आत्मानुभवाने साधा सोपा भक्ती मार्ग स्वीकारला आहे. आणि तोच त्यांनी आपला जीवनक्रम ही मानला आहे. त्या मार्गाचे मोठेपण आणि सोपेपणा सांगताना ते म्हणतात.
विरक्ती म्हणजे नेमके काय हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम जाणतो त्याचेच नाम संकीर्तन करतो. त्यांच्याच पायी लीन होतो. तेथेच आम्हाला जीवनाचे सारसर्वस्व भेटते. तेच आम्हाला सुखशांती मिळवून देते. म्हणूनच आम्ही टाळमृदंगाचा गजर करत वैष्णवाच्या मेळ्यात सहभागी होऊन आनंदाने नाचत भक्तीरसात न्हाऊन निघतो
दया, क्षमा, शांती हे सारे काही आम्ही विठ्ठलाच्या तन्मयतेने केलेल्या कीर्तनातूनच जाणतो. विठ्ठला शिवाय आम्ही काहीच जाणवत नाही. मग आम्ही जप तप साधना करण्यासाठी काय म्हणून वनवासात एकांतात राहून तपश्चर्या करावी. आम्ही जनसमुदायात मिसळताना आनंदी होतो. तेच आम्हाला फलदायी वाटते. हितकारक वाटते. परमार्थ, अध्यात्म, विरक्ती हे शब्द आम्हाला फारच बोजड वाटतात. त्यांचा अर्थ ही आम्हाला निपटणे कळत नाही. ते सारेच कठीण आहे. अवघड आहे. म्हणून त्या जंजाळात पडावेसेही वाटत नाही. देवाचे भक्तीभावाने नामस्मरण करा. आनंदाने नाचा. तुम्हाला सर्व काही तेथेच मिळेल. त्यासाठी वनात राहून तपश्चर्या करण्याची जरुरी नाही. विविध प्रकारची कर्मकांडे, यज्ञयाग वृतवैकल्ये करण्यात ही काही अर्थ नाही.
सर्वसामान्य माणसांच्या आनंदायी मेळ्यात राहूनच परमोच्च पारमार्थिक आनंद परम सुखाने लुटता येतो. भक्ती रसाने तुडूंब भरलेल्या अमृतसागरात डुंबत असताना परमेश्वरानेच दिलेल्या या देहाकडे मी उदास वाण्याच्या नजरेने मी का पाहावे आणि त्याला कशासाठी दंडीत करावे. लोकांच्यात सामील होऊन, त्यांच्यात मिळूनमिसळून विठ्ठलाचे नामस्मरण व नामसंकीर्तन करत रहाणे हाच परमार्थ करण्याचा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. तो मार्गच आपल्या मनोकामना पूर्ण करील. तोच आपल्याला सर्व काही शिकवील. म्हणूनच परमार्थ करताना विषेश आणि विशिष्ट कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्ग इतका सहज आणि सोपा असताना तो अवघड आणि दुस्तर का करावयाचा.
रसास्वाद…
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







