डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ तथास्तु… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
नीताकडे काल खूप दिवसांनी वैशाली गेली. खूप दिवस सगळ्या मैत्रिणी तिला बोलावत होत्या पण वैशालीला कुठे जावसंच वाटायचं नाही. सगळीकडे गेलं की एकच प्रश्न…
‘ठरलं का सुजितचं लग्न? मिळाली का सूनबाई? बघ बाई. तिशी गाठली की सुजितने. फार उशीर नको ग बाई करू. मग मुली तरी कुठे चांगल्या उरतात? ‘
सुजितचं लग्न हा डोकेदुखीचा विषय झाला होता वैशालीला.
सुजित गुणी मुलगा. नाव ठेवायला जागा नव्हती त्याला. चांगल्या मोठ्या नोकरीत हा इंजिनीअर आयटी मध्ये भरपूर पगार असणारा मुलगा. , पण लग्न ठरताना कुठे घोडं पेंड खात होतं देव जाणे. विवाहमंडळात नाव नोंदवून झालं. , बऱ्याच मुली येत आणि मग पुढे गाडी सरकतच नसे. फोन केले की मुलीची आई म्हणे, “ अजून विचारलं नाही हो तिला. दमून येते ऑफिसमधून उशीरा. , कळवते हं चार दिवसात. ” – ते चार दिवस काही उगवत नसत.
आता मात्र वैशालीला समजेनासं झालं की काय चुकत आहे आपलं.
मग मागच्या आठवड्यात एक मुलगी सांगून आली. चांगली शिकलेली, दिसायला ठीकठाक. नोकरीही चांगली. जन्म शिक्षण सगळं खेड्यात बाहेरगावी झालेलं त्यामुळे तिच्या रहाणीमध्ये शहरी सफाई नव्हती.
आधी सुजित तिला भेटायला तयारच नव्हता. पण नाईलाजाने तो तिला कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. मग
दोघेही त्याला चांगले कपडे हवे होते म्हणून मॉल मध्ये गेले. सुजितने ब्रँडेड टी शर्ट्स, ऑफिससाठी शर्ट्स घेतले. सहज नऊ हजार बिल कार्डने देऊन दोघे बाहेर आले.
ही म्हणाली, “बाप रे. एवढा खर्च करतोस तू? नऊ हजार? यात साधे शर्टस् आठ आले असते. मला नाही असली उधळपट्टी आवडत. असाच नेहमी खर्च करतोस का तू?”
सुजित चिडून म्हणाला, ” हो. याहून जास्त सुद्धा. मला रहावं लागतं बरं असं. ऑफिस मध्ये सतत परदेशी लोक येत असतात, मीटिंग्ज असतात. माझे हे शूज पण नऊ हजाराचे आहेत बरं का ”
“हो का? मला असलं आवडत नाही. माणसानं साधं रहावं अशा मताची आहे मी. ”
सुजित म्हणाला, ”हो का? ते दिसलंच की. हा ड्रेस जो घातला आहेस ना तो अगदी वाईट गबाळा आहे. स्टिचिंग अगदी बंडल आहे. असेल तुमच्या गावाकडचा. खेडवळ दिसते आहेसच. ”
तिथल्या तिथे पाठ फिरवून सुजित घरी निघून आला.
घरी येऊन वैशालीला चिडून म्हणाला, ”आई, कसल्या ग मुली बघतेस आणि मला पाठवतेस त्यांना भेटायला? माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण असली खेडवळ ध्यानं आणत जाऊ नकोस. कसला तो भिकार चुडीदार घालून आली होती. भयानक रंग आणि शिवलेला तरी किती गावरान. वर ओढणी.. शी”
आई बाबा हसले.
“हसू नको आई. काय ती पोरगी ग. अग, सीसीडी मध्ये कॉफीचं बिल आलं नेहमीसारखंच सातशे रुपये तर ही म्हणाली, त्यापेक्षा त्या समोरच्या उडप्याकडे चाळीस रुपयात येते कॉफी. आई, कृपा कर. असली मुलगी मला नकोय ”
सुजित तणतणत आत गेला.
आईबाबा म्हणाले, ”अरे मग तू स्वतः शोध की ऑफिस मधली तुझ्या पसंतीची. आमची परवानगी आहे की. उलट आमचा त्रास वाचेल रोज त्या मंडळात वेबसाईटवर पोरी शोधत बसायचा. ”
सुजित म्हणाला, “ हो. त्या तर एक से एक नकचढ्या. या खेडवळ मुलीपेक्षा उलटीच तऱ्हा त्यांची. नुसत्या शॉपोहोलिक. जणू काही मॉडेलिंग करायला निघाल्यात. जाऊ द्या. असेल माझ्या नशिबात ते येईल समोर ग. नाही तर करणार नाही लग्न. त्यात काय मोठं? ”
सुजित चिडचिड करत झोपला आणि वैशाली आणि विनय हताश होऊन बघत राहिले.
वैशालीच्या खालच्या मजल्यावरचे प्रधान कायमचे परदेशात चालले होते मुलाकडे.
प्रधानबाई वैशालीकडे आल्या आणि म्हणाल्या, ”वैशाली, सगळ्यात आधी तुला विचारते. आम्ही हा फ्लॅट विकतोय. तुला हवाय का? आम्ही मुलाकडे कायमचे अमेरिकेला जातोय. बघ. विचार करून सांग. काय दोन लाख कमी दे पण तू घ्यावास असं वाटतं मला. ”
सुजित आणि विनय ऑफिस मधून आल्यावर वैशालीने हे त्यांना सांगितलं. ”अरे. मग घेऊन टाकूया की हा प्रधानकाकूंचा फ्लॅट आई. मस्तच आहे की.
बाबा, तुम्हाला काय वाटतं? आणि स्वस्तही पडेल आपल्याला. मला हसत लोन देईल माझी कंपनी.
देऊ काही दिवस भाड्याने. नंतर मग बघूया. यावर मात्र सगळ्यांचं एकमत झालं. दोनच महिन्यात ते डील करून आणि फ्लॅटचा ताबा देऊन प्रधान काका अमेरिकेला गेले देखील.
सुजित आईला म्हणाला” बघ आई. गोष्टी नशिबात असल्या की अशा समोर येऊन उभ्या रहातात बघ. स्वप्नात तरी वाटलं होतंका, अचानक आपला दुसरा फ्लॅट होईल? मस्त मिळाला ग आपल्याला. आणि स्वस्त पण. ”
वैशाली म्हणाली, ” हो रे सुजित. अशीच अचानक तुझी बायको समोर येऊन उभी राहील बघ. ” तथास्तु. असं म्हणत विनयने सुजितच्या डोक्यावर टपली मारली आणि सगळे हसायला लागले.
त्या दिवशी अचानक वैशालीकडे सुजाता आली.
”वैशू, तुम्ही म्हणे खालचा फ्लॅट पण घेतला विकत? भाड्याने देणार आहेस का? सहज विचारते हं. आग्रह नाही. माझी भाची मुंबईला आहे. ती पुण्यात एमएस करायला आलीय सर्जरीत. तिला दोन वर्षासाठी देशील का फ्लॅट रेंट ने? माझी बहीण श्रीमंत आहे आणि ही कविता फार हुशार डॉक्टर आहे बघ. तिला स्वतंत्रच फ्लॅट हवाय. तू म्हणशील ते भाडे हे लोक देतील. पण कविता इथे एकटीच रहाणार. तिचे आईबाबा जमेल तसे येत राहतील. बघ. विचार कर. विनय सुजितला पण विचार. ”
सुजाता निघून गेली.
सुजित म्हणाला, आई, तुला सांगणारच होतो, मला कंपनी सहा महिन्या साठी जपानला पाठवतेय. पुढच्याच महिन्यात मी सगळ्या फॉरमॅलिटीज करून जाईन. तर मग बघा. तुला योग्य वाटलं तर देऊन टाक खात्रीच्या लोकांना भाड्याने. ”
पुढच्याच महिन्यात पेठे नवरा बायको येऊन विनय वैशालीला भेटून गेले. फ्लॅट बघून गेले आणि म्हणाले,
”कविता आमची एकुलती एक मुलगी आहे. तिला एकटीला फ्लॅट मध्ये ठेवणं जरा अवघड वाटत होतं. पण तुम्हाला बघितल्यावर काळजी नाही. अर्थात ती डॉक्टर आहे आणि धीट पण आहे. तरीही लक्ष राहू दे”
सुजित जपानला निघून गेला आणि नंतर कविता पेठे खालच्या फ्लॅट मध्ये रहायला आली. दिवसदिवस ती हॉस्पिटल ड्यूटीत आणि अभ्यासात मग्न असायची आणि क्वचितच तिची गाठ पडायची वैशालीशी.
त्या दिवशी विनय ऑफिस मधून घरी आला आणि म्हणाला, अग वैशाली, ऑफिसचं ऑडिट आहे. मला आठ दिवस दिल्लीला जावं लागतंय. मी खूप सांगितलं की मुलगा नाहीये इथे आणि मग बायको एकटीच राहील घरी. पण नाईलाज आहे ग. आठच दिवसांचा प्रश्न आहे. का जातेस माहेरी? सांगलीला? तशीही तू बऱ्याच दिवसात गेलीच नाहीस की”
वैशालीला हसूच आलं. “अरे विनय, कमालच करतोस तू. मी काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करायला? उलट मला मस्त स्वातंत्र्य मिळतंय त्याचा उपभोग घेऊ दे की. जा खुशाल. रोज आपण फोनवर असूच की. अरे आठच दिवस तर जातो आहेस ना? मी नाही जात आता सांगलीला. तू आलास की मग दोघेही जाऊया. जा तू. चल बॅग भरते तुझी मी.” दुसऱ्या दिवशीच विनय विमानाने दिल्लीला गेला.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





