सौ. अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

नवं नातं… भाग-१ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

एप्रिल महिना होता. उन्हाळा मी म्हणत होता, अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. आभाळात ढग यायचे पण पावसाचा पत्ता नव्हता. त्यातच वीज गेल्यामुळे झोपही पूर्ण झाली नव्हती तरी ही रमा उठली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात आलेल्या दूधवाल्या कडून दुधाची पिशवी तिने आत घेतली. दूध तापत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवून दात ब्रश करायला गेली. दात घासून येईपर्यंत चहा तयार झाला होता. तो तिने दोन कपात ओतला. आणि एक कप आईला देऊन आली. आईची तब्येत बरी नसल्यामुळे पोळी भाजी करून तिला ऑफिस गाठायचे होते. ती कणिक मळून आंघोळ करून आली. पटकन एकीकडे भाजी टाकून पाच पोळ्या करून घेतल्या आपला डबा भरून पर्स मध्ये टाकला तोपर्यंत घड्याळाच्या काट्याने दहा वाजलेले दाखवले.

तिने पटकन गाऊन बदलून निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस चढवला. कंगव्याने केस विंचरून केसांचा पोनी बांधला, चेहर्यावर पावडरचा पफ फिरवला, ओठांवर हलकंस लिपस्टिक लावून पर्समध्ये घड्याळ आणि इअररिंगज टाकून पर्स खांद्याला अडकवली”आई, येते ग! ” म्हणत धावतच घराबाहेर पडली. बस स्टॉप वर आली. प्रवाश्यांची बरीच मोठी रांग होती. आज बहुतेक उशीर झाला त्यामुळे मोठी रांग असावी असा विचार करत ती रांगेमध्ये जाऊन उभी राहिली. आजूबाजूला कोणी ओळखीचे दिसते का? हे पाहण्यासाठी मागे मान वळवली आणि अचानक समोर पाहिले तर तिच्यापुढे चार पाच प्रवासी सोडून एक तरुण उभा होता. त्याच्याकडे तिचे लक्ष जाताच त्याने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले.

हा तरुण कोण असावा? पूर्वी शेजारी राहत होता का? शाळेत आपल्या वर्गात होता का? असातिने डोक्याला खूप ताण देऊन विचार केला पण तिला काही संदर्भ लागेना. तेवढ्यात बस आली. ती पटकन बस मध्ये चढली. तिने पाठीमागे वळून पाहण्याचे धाडसही तिने केले नाही\विलिंगडन कॉलेजचा स्टॉप येताच पटकन खाली उतरून झपाझप चालायला सुरुवात केली. रसायन शास्त्राचा पहिला तास पहिल्यावर्षाच्या वर्गावर असल्यामुळे तिला बरोबर अकरा वाजता वर्गात पोचायचे होते.

रमाने गेल्या वर्षी याच कॉलेजमधून एम. एससी. ची पदवी घेतली होती. तिची हुशारी, कामावरील तत्परता पाहून व्याख्याती म्हणून कॉलेजने तिची निवड केली होती. तिच्या भावाने, रोहनने दोन वर्षांपूर्वी वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटरमध्ये बी. ई. केले होते. गेल्या वर्षी रोहन एम. एस करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि एम. एस. होतास त्याला तिथे नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे रमा व तिची आई सांगलीमध्ये दोघीजणी राहत होत्या. राधाकृष्ण वसाहतीत त्यांचा छोटासा बंगला होता. मधुरभाषिणी व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे रमा लवकरच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाली.

डिसेंबरमध्ये मामे बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवस रजा काढून रमा नागपूरला गेली. लग्नघरातील उत्साही वातावरणात आठ दिवस कसे गेले समजलेच नाही. बहिणीची सासरी बिदाई करून रमा. सांगलीला परत यायला निघाली. सांगलीला जाणाऱ्या गाडीत बसता क्षणीच तिला पुन्हा त्या बस स्टॉपवर दिसणाऱ्या तरूणांची आठवण झाली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी ती बस स्टॉप वर आली तेव्हा बस स्टॉप वर तो तरुण उभा होताच. तो दिसायला रुबाबदार, उंच, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. अगदी सभ्य होता. दोघांनाही एकच बस मिळाली, बस मध्ये बरीच गर्दी होती. त्याला बसायला जागा मिळाली पण रमाला उभ्याने प्रवास करावा लागणार होता हे पाहताच त्याने उभे राहून, ” तुम्ही इथे बसा” असे खुणेने सांगून तो स्वतःउभा राहिला. रमाने प्रथम दुर्लक्ष केले पण त्याने दुसऱ्यांदा विनंती करताच ” “काय शिष्ट मुलगी आहे ” असा इतरांच्या नजरेतील भाव पाहताच तिने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला आणि त्याने दिलेल्या सीट वर ती बसली. स्टॉप येताच मात्र मागे न पाहता उतरून चालू लागली. असे बरेच दिवस चालले होते. तो कधीही तिच्याशी बोलला नव्हता की त्याने तिची चौकशीही केली नव्हती.

काही दिवसांनी अचानक आज “बस बंद “असा निर्णय घेतला गेला. रमाला या गोष्टीची कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी रमा बस स्टॉप वर आली, पाहते तो काय सर्व बस ओळीने उभ्या होत्या. आता काय करायचे? “अशा संभ्रमात रमा उभी असताना तो तरुण तिच्या जवळ येऊन म्हणाला, “मी रिक्षाने जात आहे तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या थांब्याजवळ सोडून मी पुढे जाईन, आज बस सुरू होतील असे वाटत नाही. “तिने जाणून-बुजून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घरी निघून गेली कामावर न जाता. तो मात्र रिक्षामध्ये बसून निघून गेला. आपल्याबद्दल काहीही माहिती न देता ओळखत नसूनही हा तरुण आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न का करतोय? हे रमाला उमजत नव्हते. आईला त्याच्याबद्दल सांगून तिला अडचणीत टाकायचे हे रमाला पटत नव्हते. त्यामुळे ती एकटीच होणारा मनस्ताप सहन करत होती.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आपले मनआपल्या मैत्रिणीकडे मोकळे करायचे तिने ठरवले. मैत्रिणीला म्हणाली, “अगं माझ्या बस मध्ये दररोज एक तरुण चढतो. माझी लक्ष त्याच्याकडे जाताच तो माझ्या कडे बघून हसतो, मला मदत करण्याची एकही संधी तो सोडत नाही. मला त्याचा खूप राग येतो अगं तो स्वतःला समजतो तरी कोण? अगदी दुर्लक्ष करुनही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही”

अगं तो कोणीतरी ओळखीचा असेल किंवा त्याचा चेहरा तसा असेल. तो “तुझ्याशी बोलत नाही किंवा त्याने तुला तुझे नाव विचारले नाही. स्वतःबद्दल काही माहिती सांगितली नाही, तुला त्रासही देत नाही. मग तू त्याचा एवढा राग राग का करतेस? “या प्रश्नांची रमाकडे उत्तरे नव्हती.

हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सवाला रमा आईसह मारुती मंदिरात गेली होती. जन्मसोहळा झाल्यावर प्रदक्षिणा घालून प्रसाद घेण्यासाठी रमा थांबली होती. प्रसाद घेऊन वळल्यावर तो तरुण तिला दिसला. तिला एकदा वाटले या तरुणांबद्दल आईला सांगावे पण काही न बोलता ती आईसह घाईघाईने देवळातून बाहेर पडली.

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

उत्कंठावर्धक