सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ दोन अनुवादित कथा – (१) ‘स्क्रीनच्या अलीकडे.. पलिकडे‘ (२) ‘दिवे, वाती आणि तेल’ – हिन्दी लेखक : श्री हेमंत बावनकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
श्री हेमंत बावनकर
[ हिन्दी लघुकथाएँ – (१) देट साइड ऑफ़ स्क्रीन (२) दिया, बाती और तेल ]
(१) स्क्रीनच्या अलिकडे.. पलिकडे – –
आता हे नेहमीचंच झालं होतं. जेव्हा जेव्हा एखादा सण किंवा मुलांचे -नातवंडांचे वाढदिवस असे काही खास दिवस असायचे, तेव्हा सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा आपल्या परदेशी असणाऱ्या मुलांना फोनवरूनच शुभेच्छा द्यायचे.. पण अशावेळी ते एकमेकांशी फक्त बोलायचे नाहीत, तर विडियोवर कॉन्फरन्स कॉल लावायचे. कुणाचा वाढदिवस असेल तर त्यावेळी प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनवर एक एक केकही असायचा.. आणि गंमत म्हणजे सगळे केक सगळेजण एकाच वेळी कापायचे … सणही असेच एकत्र.. अर्थात ऑनलाइन.. virtually एकत्र साजरे करायचे सगळे मिळून. असा आभासी का होईना.. पण सगळे मिळून त्या दिवसाचा आनंद साजरा करायचे – ‘ दुधाची तहान ताकावर ‘ म्हणतात ना.. अगदी तसंच.
या वर्षीही नेहेमीप्रमाणे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मुलाचा फोन आला.. अर्थात नेहेमीसारखाच विडियो कॉल… दोघांनाही खूप आनंद झाला आणि लगेच त्यांनी मोबाईल उचलला.. मुलगा – सून दोघेही स्क्रीनवर दिसत होतेच, आणि सेवकरामांचा आठ वर्षांचा मोठा नातू आणि अजून तीन वर्षेही पूर्ण न झालेला धाकटा नातूही स्क्रीनमध्ये त्यांना बघण्यासाठी आई-बाबांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होते. दिवाळी म्हणून आजी-आजोबांनी मांडलेली सुंदर पूजा दोन्ही नातू अतिशय उत्सुकतेने बघत होते.. आणि आजी-आजोबांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला होता.
– – मोठ्या नातवाने आजोबांच्या घरची दिवाळी.. पूजा.. सगळं काही आधीही पाहिलेलं होतं. पण धाकट्या नातवासाठी ते सगळंच नवीन आणि वेगळं होतं.. आणि त्याचं कुतूहल त्याच्या चेहेऱ्यावर पाहतांना सेवकरामही फार खूश झाले होते. मग मोबाईल हातात घेऊन ते घरभर फिरत होते. बाहेरची रोषणाई.. आणि त्या रोषणाईसोबत आसपास सगळीकडेच जणू झगमगत असलेला सणाचा उत्साह आणि आनंद…. सगळं काही त्यांनी त्या सगळ्यांना दाखवलं. धाकटा नातू.. त्याचं नाव होतं ‘देव’.. तो तर कमालीच्या कुतुहलाने सगळीकडे बघत होता. स्वतः हातात धरून फुलबाज्या उडवणारी लहान लहान मुलं आणि फटाक्यांची आतषबाजी करणारी आसपासची मोठी माणसंही बघून तर त्याचे डोळे कमालीच्या कुतुहलाने भरून गेले.. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायला लागली. आणि ते पाहून सेवकराम त्यांच्याही नकळत म्हणाले.. “ next year we all will celebrate Diwali in India “.. हे ऐकताच मुलगा सून दोघेही आश्चर्यचकित झाले. पण देव मात्र जरा वेळ काहीच बोलला नाही.. आणि मग आजोबांच्या इथली रंगीबेरंगी झगमगती दिवाळी पाहून भारावलेला तो त्यांना म्हणाला.. “ no Ajoba.. I would like to come to that side of screen just now.. “……
– – त्याच्या वडिलांच्या हातातल्या त्या मोबाईल स्क्रीनच्या बाहेर दिसणाऱ्या दुसऱ्या बाजूला येण्यासाठी तो मग हट्ट करायला लागला होता आणि त्यासाठी आता रडायलाही लागला होता… सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा त्या स्क्रीनच्या या बाजूने.. आणि मुलगा-सून स्क्रीनच्या त्या बाजूने असहाय्यपणे एकमेकांकडे पहायला लागले – –
…. आणि.. आणि काही क्षणातच तो विडियो कॉल कट केला गेला….. पलिकडून.. आणि अलिकडे मात्र मनात रेंगाळत राहिलं देवचं मुसमुसणं……
मूळ हिन्दी कथा : ‘दॅट साइड ऑफ स्क्रीन’ – कथाकार : श्री हेमंत बावनकर
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
—
(२) दिवे.. वाती.. आणि तेल – –
एखाद्या शहरातून खळखळत वहात जाणाऱ्या नदीच्या काठाला हल्ली ‘नदीकाठ’ म्हणत नाहीत बरं का.. तर त्याला मुद्दाम सुशोभित करून ‘ रिव्हर फ्रंट ‘ असं म्हणतात.. आता आधीचे ते हिरव्यागार तजेलदार वृक्षांनी सजलेले सुंदर नैसर्गिक काठ म्हणजे जणू भूतकाळ झाला आहे. निसर्गाची ओढ लावणाऱ्या अशा
नदीकाठांच्या जागी आता दिसतात मुद्दाम सपाटीकरण करून तयार केलेल्या बागा नाहीतर मैदाने, सिमेंटचे प्रशस्त रस्ते – सगळं कृत्रिम सुशोभीकरण.
सेवकराम रहातात त्या शहरातूनही ‘ पुण्यसलीला ‘ नावाची एक सुंदर नदी वहाते. रोज पहाटे सेवकराम जवळच्याच एका बागेत चालायला जात असत, आणि संध्याकाळी मात्र त्यांच्या मित्रांबरोबर या नदीच्या
‘रिव्हर फ्रंट‘ वर फिरायला जात असत. या नदीच्या काठावर एक सुंदर प्राचीन मंदिर आहे, जिथे भाविकांची आणि पर्यटकांची नेहेमी ये-जा सुरू असते. त्या मंदिरापर्यंतच्या मार्गावरही आता पूजा-सामान आणि इतर काही वस्तूंच्या दुकानांसाठी सोय करून देण्यात आलेली आहे. आणि मंदिरापासून नदीच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्याही बांधलेल्या आहेत… आता त्या पायऱ्यांवरच संध्याकाळची आरती दिमाखाने केली जायला लागली होती… आणि सगळ्यांनी हे सगळे बदल स्वीकारले होते.
नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या घरांमध्ये अजूनही पूर्वीसारखाच सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो, पण त्याच्या जोडीने आता विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळी तो सगळाच परिसर छान झगमगत असतो… नदीच्या लाटांवर लहरणारा हा प्रकाश बघण्याचा मनमोहक आनंद काही वेगळाच.
लवकरच या रिव्हर फ्रंटवर एकाच वेळी लाखों पणत्या लावण्याचा विश्व विक्रम करण्याची तयारी सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. त्या रम्य प्रसंगाचे साक्षीदार होण्याची संधि अजिबात गमवायची नाही असा सेवकरामांचे मित्र हरिभाऊ यांचा फारच आग्रह चालला होता. रात्री १० ते ११ अशी या कार्यक्रमाची वेळ होती. ते दोघेही ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी नदीकाठावर पोहोचले होते. तिथे अगदी कडक सुरक्षाव्यवस्था होती कारण हा सोहळा बघायला प्रचंड गर्दी झाली होती. कितीतरी लोक स्वयंसेवक म्हणून आपणहून काम करत होते. सगळे दिवे एकाचवेळी सहज पेटवता येतील अशा रीतीने मांडून ठेवले होते.
…. ठरलेल्या वेळी सगळे दिवे पेटवले गेले.. ते दृश्य आणि एकूणच सगळा आसमंत अतिशय नेत्रदीपक.. सुंदर वाटत होता. त्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी आकाशात ड्रोन कॅमेरे तयारच होते. वेगवेगळ्या कोनांनी त्यांनी लगेच त्या दृश्याचे कितीतरी फोटो आणि विडियो काढले.. आणि थोड्याच वेळात विश्व विक्रम झाल्याची घोषणाही केली गेली. लोकांनी एकच जल्लोष केला आणि मग कार्यक्रम संपल्याची घोषणा केली गेली. या कार्यक्रमाचे साक्षीदार झाल्याबद्दल सेवकराम आणि हरिभाऊ यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि ते जायला निघाले. त्यांना त्या दिव्यांमधूनच वाट शोधत जावं लागणार होतं…
ते जाण्यासाठी वळले आणि….
…. आणि जागीच थबकले.. त्यावेळचं तिथलं दृश्य मन सुन्न करणारंच होतं.. सुरक्षा व्यवस्था संपली होती..
…. इतक्या वेळानंतर सगळे दिवे हळूहळू विझायला लागले होते आणि अचानक कितीतरी बायका-पुरुष आणि लहान मुलांची एक झुंडच घाईघाईने तिथे पोहोचलीही होती … आणि बघताबघता त्या विझलेल्या दिव्यांवर तुटून पडली होती. त्या दिव्यांमधलं जळका वास येणारं उरलेलं तेल हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओतून घेण्याची घाई करत होते सगळेच…
– – सेवकराम आणि हरिभाऊ हतप्रभ होऊन ते दारुण दृश्य बघत तिथेच थबकले होते…. इतका वेळ तिथे रेंगाळलेला प्रकाश अचानक गायब झाल्यासारखा वाटत होता त्यांना….
…. प्रतिष्ठितांचं विश्व विक्रम करण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं होतं.. पण आत्ता इथे गर्दी केलेल्या या लोकांना त्यांच्या त्या स्वप्नाशी काहीच देणंघेणं नव्हतं… ते सगळेही खरंतर एक स्वप्न घेऊनच तिथे आले होते.. पण त्यांचं स्वप्न फारच वेगळं होतं.. ….
‘ कदाचित आता पुढचे काही दिवस तरी आपल्याला घरी जेवण बनवता येईल ’ हे ते स्वप्न …. तेच डोळ्यात साठवून आशेने ते सगळे तिथे घाईघाईने आले होते… विश्वविक्रम या शब्दाचा अर्थही बहुतेक माहिती नसावा त्यांना …तिथलं आधीचं आनंदाचं.. उत्साहाचं वातावरण या लोकांच्या आरड्याओरड्यात पार हरवून गेलं होतं…. फोटो काढणारे आधीचे ड्रोन आणि सगळे कॅमेरेवाले तर मागे वळूनही न बघता कधीच परतीच्या वाटेला लागले होते.. या आत्ताच्या दाहक दृश्यांचे फोटो काढण्याची गरजच वाटली नव्हती त्यांना.. ना त्यांना, ना आधीच्या त्या नेत्रदीपक कार्यक्रमाच्या आयोजकांना.. आणि ना तिथे झुंडीने जमलेल्या बघ्यांनासुद्धा …….
मूळ हिन्दी कथा : ‘दिया बाती और तेल’ – हिन्दी कथाकार : श्री. हेमंत बावनकर
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






