डॉ मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ देणाऱ्याने देत जावे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
(विंदा)
गोष्ट १९६४-६५ सालातली. नागरजीभाई मेहता हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या (पूर्वीच्या ठाणे – आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी गावातल्या शाळेतले शिक्षक – आज जरा ते चिंतामग्न होते. निवृत्ती जवळ आलेली. पण घरची आर्थिक घडी म्हणावी तशी नीट बसलेली नव्हती. चारही अपत्यांची शिक्षणं अजून पूर्ण व्हायची होती – अजून ती मार्गी लागायची बाकी होती. निवृत्तीनंतर ही गणितं कशी जुळणार? गुरुजी तर अगदी हवालदिल होऊन गेले होते.
शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी सोसायटीचे सर्वेसर्वा – सेक्रेटरी साहेबांना एक विनंती अर्ज पाठवून दिला. वयानुसार निवृत्तीकाळ आला आहे पण आर्थिक अडचणी लक्षात घेता मेहेरबानी करून एक वर्ष मुदतवाढ मिळू शकेल का अशी विनंती त्या पत्रात केली होती.
अर्ज विचारात घेतला गेला, गुरुजींचा व्यासंग आणि अनुभव लक्षात घेता, विशेष प्रकरण / case म्हणून संस्थेद्वारा एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मंजूरी आली. गुरुजींना हायसे वाटले.
इथे नियतीने एक वेगळीच कलाटणी घेतली. संस्थेच्या कारकुनाने गुरुजींच्या अर्जाची प्रत शिक्षण मंत्रालयाला पाठवून दिली व मुदतवाढीचा अर्ज केला. कागदी घोडे त्यांच्या गतीने चालले व सरकारकडूनही गुरुजींच्या मुदतवाढीस मंजुरी आली. कारकुनाने ही बाब सेक्रेटरी साहेबांच्या कानी घातली.
दिवसामागून दिवस भराभर चालले होते. गुरुजींचे अध्यापनाचे काम नेहमीप्रमाणेच जोमात चालू होते. आणि तेव्हाच सेक्रेटरी साहेबांचा निरोप आला.
“मी सोसायटीद्वारा तुम्हाला एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली होती. या वर्षी सरकारनेच तुम्हाला मुदतवाढ दिली आहे. तुमचा या वर्षीचा पगार सरकारकडूनच येणार आहे, त्यामुळे तुम्ही सोसायटीला पुढच्या वर्षीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा अर्ज करा. तुम्हाला सोसायटीतर्फे अजून एक वर्ष मुदतवाढ मिळेल. “
गुरुजी आनंदले. त्यांनी परत अर्ज केला. तो मंजूर झालाच पण कारकूनानेही परत सरकारकडून आणखी एका वर्षाचे extension मिळवले.
पुढची ४-५ वर्षे हा सिलसिला चालूच राहिला. गुरुजींच्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली, मुलं हाताशी आली आणि शेवटी गुरुजींनी स्वत:हून सेक्रेटरी साहेबांना पत्र लिहीले व आता निवृत्त होण्यासाठी परवानगी मागितली.
— —
१९९३ –
१९१८ साली स्थापन झालेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे ७५ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायचे घाटत होते. त्यानिमित्ताने संस्थेच्या बोर्डी शाळेतील हयात असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजिलेला होता. मेहता गुरुजींनाही आमंत्रण गेले होते. मात्र गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव झोनल सेक्रेटरींना प्रत्यक्ष येऊन भेटून गेले – आपण देऊ केलेल्या सन्मानाबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत, पण गुरुजी अंथरुणाला खिळून आहेत. ते इथे कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकणार.
झोनल सेक्रेटरींनी हा निरोप सेक्रेटरी साहेबांना कळवला होता. सेक्रेटरी साहेबांनी त्यांची appointements diary पाहिली व बोर्डी झोनल सेक्रेटरींना एक निरोप पाठवला. ते स्वत: मेहता गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार होते.
मेहता गुरुजींच्या घरी निरोप पाठवण्यात आला. मुलाला आनंद झालाच पण गुरुजींना यातील काय कळणार असा प्रश्नही पडला. गुरुजींचे वय आता नव्वदीच्या पुढे गेले होते, गेले सहा महिने ते कोमा सदृश निपचित पडूनच होते. पण त्याने सेक्रेटरी साहेब येणार असा निरोप मात्र गुरुजींना सांगितला.
बोर्डीतील माजी शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम फारच हृदयस्पर्शी झाला. सेक्रेटरी व झोनल सेक्रेटरी आता गुरुजींच्या घरी – बोर्डीपासून ४०-५० किलोमीटर दूर – वलवाडा गावी निघाले होते.
गुरुजींच्या घरी ते पोचल्यावर मुलाने गुरुजींना सेक्रेटरी साहेब आले आहेत असं सांगितले मात्र, जणू जादूची कांडी फिरावी तसे गुरुजी उठून बसले. हात जोडून ते म्हणाले, “सोसायटीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत, बोला मी आपली काय सेवा करू शकतो? “
ज्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्याला नोकरीत मुदतवाढ दिली ते साहेब निवृत्त झाले आहेत, हे नवीन साहेब आहेत हा तपशील गुरुजींच्या ध्यानात येत नव्हता, पण सोसायटीचे सेक्रेटरी स्वत: आपल्या दारात आले आहेत हे मात्र त्यांना उमगत होते.
संस्थेला अजून खूप पल्ला गाठायचा होता. बोर्डी परिसरात अजून विज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय नव्हते. डिग्रीसाठी जवळचे सायन्स कॉलेज पालघरला – बोर्डीहून अजून पन्नास किलोमीटरवर होते. इतक्या दूर मुला मुलींना शिकायला पाठवायला अडाणी अशिक्षित पालक तयार नसत. जो भरवसा; जो विश्वास त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीवर होता तो त्यांना या दूरच्या कॉलेजबद्दल नव्हता. पण यामुळे अनेक मुला-मुलींची शिक्षणं बाराव्वीतच संपत. पुढील शिक्षणापासून ते वंचित रहात. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातून आलेले हे बहुतेक सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी first generation learner होते. त्यांचे आई वडिल अशिक्षित / अल्प शिक्षित होते. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते गोखले एज्युकेशन सोसायटीकडे मोठ्या आशेने पहात होते.
करायचं खूप होतं, पण आर्थिक चणचण होती. सायन्स कॉलेजसाठी निदान ३०-४० लाख रुपयांची गरज होती. थोडीफार देणगी उभी रहात होती पण अपेक्षित रकमेच्या पासंगालाही तेवढे पैसे पुरत नव्हते. निदान काही खोल्या बांधून एखाद्या पदवी अभ्यासक्रमाचे तरी कॉलेज सुरू करता आले तर हवे होते.
सेक्रेटरी साहेबांच्या मनात क्षणार्धात हे सगळे विचार येऊन गेले पण आपण एका निवृत्त शिक्षकाच्या घरी आहोत याचे त्यांना भान होते. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यांनी गुरुजींना सोसायटीच्या पुढच्या वाटचालीची – ध्येयधोरणांची कल्पना दिली. गुरुजींना आतपर्यंत काय पोचलं; किती पोचलं कळलं नाही, सेक्रेटरी साहेब स्वत: आपल्या घरी आले यातच ते कृतकृत्य झाले होते.
काही दिवसांनंतरची गोष्ट. झोनल सेक्रेटरी मेहता गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले होते. गुरुजी कमालीचे अशक्त झाले होते, बोलताही येत नव्हतं त्यांना. गुरुजींनी एक पाटी मागवून त्यांच्या मातृभाषेत – गुजरातीत – तमारू काम थई गयू – तुमचं काम झालं – असे लिहून दाखवले. सरांना काही रेफरन्स लागला नाही.
त्याच्या दुसऱ्या दिवशी, झोनल सेक्रेटरी आपल्या ऑफिसमध्ये बसले होते, शिपायाने निरोप आणला – वलवाड्याहून मेहता गुरुजींची मुले आली आहेत.
तीन मुलगे व एक मुलगी – चेहऱ्यावर अतिशय कृतज्ञता भावाने आत आले.
“सर, तुम्ही सेक्रेटरी साहेबांना घेऊन आमच्या घरी आलात, आम्ही आपले खूप आभारी आहोत. गुरुजी तर अजून त्याच धुंदीत आहेत. आपण संस्थेच्या सायन्स कॉलेजच्या स्वप्नाविषयी सांगत होतात. गुरुजींच्यातर्फे आम्ही एक छोटी भेट आणली आहे त्याचा स्वीकार करावा. “
झोनल सेक्रेटरी सरांनी पाकिट उघडून बघितले – त्या पाकिटात चाळीस लाख रुपयांचा एक चेक होता आणि समुद्राभिमुख अशा एका सुंदर इमारतीचा – ज्यात एक मोठा हॉल, क्लासरूम्स / वर्ग, प्रयोगशाळा, ऑफिस, असा सहा सात डिपार्टमेंटसना पुरेल अशा रचनेचा आराखडा होता. “सर, आपल्या कॉलेजसाठी चालेल ना हे डिझाईन? “
झोनल सेक्रेटरी सर स्तब्ध झाले. कविवर्य विं दा करंदीकरांच्या ओळी त्यांना आठवल्या –
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे.
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे.
— —
१९९४
मार्च महिना – वृद्धापकाळाने जराजर्जर झालेले मेहता गुरुजी आज पुन्हा बोर्डीच्या समुद्रकिनारी आले होते. संस्थेच्या कॉलेजच्या भुमीपूजन समारोहासाठी – झोनल सेक्रेटरींना त्यांनी जे लिहून दिलं होतं – तुमचं कॉलेजचं काम नक्की होणार – ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.
दुर्दैवाने भुमीपूजनानंतर थोड्याच दिवसांत गुरुजींनी देह ठेवला पण त्यांच्या मुलांनी ती वास्तू मोठ्या दिमाखात उभारून वडिलांचे नाव अजरामर केले.
— —
२०१९ – २०२०
१९९४ साली स्थापन झालेल्या बोर्डीच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या N B Mehta (Valwada) Science College चे रजत जयंती वर्ष आहे.
नैसर्गिक उजेड, समुद्राची साद, नारळीची झाडे अशा सोबतीने ३६० विद्यार्थ्यांसह single faculty असे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या कॉलेजमध्ये आता १५०० च्या जवळपास विद्यार्थी शिकत आहेत. कॉलेजमध्ये विविध विषयांत पदवी; पद्व्युत्तर शिक्षणतर आहेच पण दोन विषयांत PhD संशोधनासाठी मान्यताही मिळालेली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात कॉलेजला महाराष्ट्र शासनातर्फे “जागर जाणिवांचा” हे जिल्हा स्तरावरील पारितोषिक व २०१२ साली मुंबई विद्यापीठाचा Best College – Rural अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
मेहता कुटुंबियांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा छान वटवृक्ष होत आहे आणि सावित्रीच्या लेकींना आणि लेकांना आता शिक्षणासाठी दूरवर पायपीट करावी लागत नाहीये.
© डॉ मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


