डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ मन उधाण वार्याचे… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
आज दिवसभर ढगांमुळे अंधारलेलेचं होतं. गार वारे वाहात होते. धुळीचे लोट उठत होते. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळणार होता. आईनं चूल पेटवून संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती. गरम गरम ज्वारीच्या भाकरीचा सुगंध सुटला होता. पातेल्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, लसूणाची फोडणी तडतडली व तिने त्यात पाणी वगारलं तसा चर्र चर्र आवाज झाला. खमंग दरवळला तसं माझ्या तोंडाला पाणी सुटलं. ” माय, काय बनवते. ” ” पिठलं बनवतेय. मग गरम गरम पिठलं भाकरी खाऊन घेशील. ” इतक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. ” अरे, प्रकाश सपर्यात पाणी जाऊ नये म्हणून अंगणातला ओंडका आडवा लावून देशील. कपिलेला चारा दिलास ना
रे. ” होय माय दिला. ” ” आणिक एक कर बेटा, कोंबड्या खुराडात बंद कर. पाण्याची वडसाड लागू नये म्हणून ओट्यावर बारदानाचा पडदा ओढून घेशील. “
रात्री पावसानं बराच जोर धरला. तसा बाप काळजीत पडला. आता भरात हंगाम होता. जोंधळ्यात टपोरे दाणे भरले होते. जोडीला हरभरा पेरला होता. दोन्ही पिके अगदी निकोप व जोमानं वाढली होती. हा पाऊस थांबला नाहीतर ? मोठं नुकसान होणार होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार होता.
बाप विमनस्कपणे पावसाकडे पाहात होता व हा पाऊस त्याच्या डोळ्यातून गालावर झिरपू लागला. ” शेवंता, मी शेताकडे जाऊन येतो. ” ” अहो, एवढ्या पावसात कसं जाता येईल. ? जाऊनही पिकांचं रक्षण कसं कराल ? ” शेवंता बोलतच होती कि पावसानं भिजल्यानं व पाण्याच्या लोंढ्यानं सपर्याची एक भिंत कोसळली. गाई, बैलं हंबरु लागली. बापानं ( महादेव ) त्यांच्या पाठीवर थोपटून शांत केलं, व कोसळलेल्या भिंतीचा मलबा फावड्यानं गोळा करून पाण्याच्या लोंढ्याला अटकाव केला.
रात्रभर पावसाचा जोर वाढतचं होता. अगदी खवळून रात्रभर बरसतंच होता. गावाजवळून वाहणार्या पूर्णा नदीलाही पावसामुळे प्रेमाची भरती आली होती. ती ही दुथडी भरुन वाहू लागली. सगळे गावकरी, शेतकरी आता धास्तावले. गावाच्या उत्तरेकडे असलेला तलावही आता ओसंडून वाहू लागला. पावसाचा जोर, वार्याचा जोर आणि पुराचाही जोर सगळीकडे हाहाःकार उडवू लागला. कोणाच्या छपराची कौले फुटली, कोणाच्या घरावरील पत्रे उडाली, कोठे भिंत कोसळली तर कोठे घरात पाणी शिरले. काय आज हा पाऊस वारा, वीजे समवेत एवढा उधाणला होता.
पाऊस चोवीस तास झाले तरी थांबत नव्हता. सगळेच आता हतबल झाले होते. दुसर्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात 1000 मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून शेतात प्रवेश केला होता. दोन्ही तिन्ही दिवस हिच परिस्थिती होती. डोंगर माथ्यावरुन येणारे पाणी नद्यांमध्ये येऊन पाणी धोक्याच्या पातळीच्या कितीतरी वर चढले होते. पाऊस जरी थांबला तरी नदीतील वाढलेले पाणी, धरणातील पाण्याचा विसर्गाने पुराचे पाणी ओसरण्याचा वेग मंदावला. जवळ जवळ 96000 हेक्टर जमिनीवरील पिके आठ ते दहा दिवस पाण्याखाली होती. माती, चिखलात असल्याने सडली होती. कुजली होती.
घरा दारातही पाणी शिरल्यानं अन्न धान्य, कपडालत्ता, सामानाची वाट लागली होती. आता सरकारी यंत्रणा कार्यरत झाली होती. लोकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. कॅम्प उभारले होते. खाण्याची पाकिटे वाटली जात होती. आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली होती. सर्दी, पडसं, ताप व साथरोगाने डोके वर काढले होते.
बापाच्या डोळ्यातील अश्रू खंडत नव्हता. दोन वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि हा आताचा ओला दुष्काळ, वाया गेलेलं बि बियाणं, लागवडीचा खर्च, त्यासाठी काढलेलं कर्ज, त्याचं तर जणू या ओझ्यानं कंबरडंच मोडलं होतं. या उधाणलेल्या बेधुंद पावसानं होत्याचं नव्हतं केलं होतं. भरीस आलेला हंगाम, दाण्यांच्या राशि, त्यातून हाती येणारा पैसा, फिटलेलं कर्ज, खाऊन पिऊन हाती उरलेले दोन पैसे, त्याचं असं उधाणलेलं मन क्षणात उंचावरुन खाली कोसळलं होतं.
“बाबा, रडू नका ना तुम्ही, मी बाबांच्या गळ्यात पडलो होतो. बापाला अधिकच भडभडून आलं. त्याचे उष्ण श्वास व हुंदक्यांनी धपापणारी छाती मला तीव्रतेनं जाणवत होती. माय आमच्या दोघांच्याही अंगावरुन हात फिरवत होती.
” प्रकाश, खूप शीक माझ्या लेकरा, मोठा हो. आॅफीसर हो, इंजिनियर हो पण या बिन भरवशाच्या शेती व्यवसायात नको राहशील “
बाहेर वारा उधाणला होता. पाणी उधाणलं होतं आणि आत बापाचं मन उधाणलं होतं चिंतेनं, फिकीरीनं.
बाबा माझ्या शिक्षण्यासाठी पै पै जमवित होते. मला शैक्षणिक साहित्य व इतर अत्यावश्यक गोष्टी स्वतः अर्धपोटी राहून पुरवित होते.
शेती करतांना जमिनीचा पोत, त्याची तपासणी, त्यानुसार त्यावरील उपाय व मार्गदर्शन, सेंद्रिय शेती, त्याचे फायदे, जैविक खतांचा वापर, सुधारीत व संकरीत बि बियाणे, शेताच्या एका बाजुला शोषखड्डा, त्यात पावसाळ्यात जल पुनर्भरण, त्यायोगे रब्बी पिकाला होणारा फायदे, सहकार तत्वावरील धान्य गोदामांची व्यवस्था, त्यायोगे धान्याचे रक्षण, आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर इ. इ. कृषी पदवी अभ्यासक्रमात मी शिकलो. आणि गावी परतलो. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय शेती करू लागलो.
बाबा थोडे नाराज झाले, ” शेतीच करायची होती तर एवढं शिक्षण कशासाठी घेतलं ” ” बाबा रागावू नका, शिक्षणही मी आपल्या शेती व्यवसायाचंच घेतलंय. जेणे करून आपल्या याच शेत जमिनीतून भरघोस पिक निघेल. मी आपली तर शेती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कसेनच पण गावातील माझ्या कृषिमित्रांनाही हे प्रगत तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेती कसण्यास मदत करीन. ” ” विचार चांगला आहे तुझा पण लहरी निसर्गाचं काय ?
बाबा त्यावरही उपाय आहे, शेतीत ठिबक सिंचन, पावसाळ्यात शेततळ्यांची निर्मिती, विहीर पुनर्भरणाने कोरड्या दुष्काळावर मात करता येते.
कमी पाण्यात येणार्या व कमी कालावधीत पिके तयार होणार्या वाणांची निवड करता येते. एकाच पिकावर अवलंबून न राहाता मिश्र पिके किंवा आंतरपिक घेता येतं. पारंपारीक पिकात बदल करून पेरू, डाळींब, सिताफळ यासारख्या हवामान सहन करणार्या फळबागाही लावता येतात.
बाबा महावेध’ किंवा इतर सरकारी हवामान ॲप्सचा वापर करून पावसाचा अंदाज घेता येतो आणि त्यानुसार पेरणी/कापणीचे नियोजन करणेही आजकाल शक्य झाले आहे. शिवाय भाजीपाला आणि फुलांच्या शेतीसाठी हरितगृह (Greenhouse) किंवा शेडनेटचा वापर करून पिकांचे वादळ-पावसापासून रक्षण करणे सुलभ झाले आहे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी मल्चिंग तंत्रज्ञान वापर केल्यास फायदा होतो.
बाबा यदा कदाचित निसर्गाची साथ नाही मिळाली तरी कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन (Poultry) सुरू करता येते. बाबा आजकाल
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ (PMFBY) शासनाने सुरू केली आहे. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेता येतो ज्यायोगे आर्थिक नुकसान भरुन निघते.
यावर्षी मी डाळिंब व सीताफळाची लागवड सुधारीत तंत्रज्ञानाने केली होती. चार एकरातील फळांनी लगडलेली बाग पाहून आई बाबा खुश होते. डोळे भरुन आपली बाग न्याहाळत होते. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कृषी अधिकारी नयनाचीही मला खूप मदत झाली होती. कृषी क्षेत्रातील नयनाचे ज्ञानही वाखाणण्याजोगे होते.
बाबा पुढच्या आठवड्यात फळांचा पहिला हप्ता मी मार्केटला नेईन. ” होय बेटा, आता आपली सगळी आर्थिक चणचण मिटेल.
आज पावसाचा भर बराच होता. घरी आलो. ओट्यावर छत्री ठेवली. व बाथरूम मध्ये हातपाय धुवून कपडे बदलले. ” केस पूस रे प्रकाश, अर्धा भाग पूर्ण ओला झाला आहे. आणि उद्या तिला मला भेटायला सांग जिच्यामुळे तू अर्धा ओला झाला आहेस. आता आयुष्याची जवाबदारीही अशी अर्धी अर्धी वाटून घ्या. ” ” काय आई, तुझं भलतंच ” ” भलतंच तर भलतंच, मला सून हवीय रे बाबा. आता उशीर नको “.
एका शुभ मुहूर्तावर नयनाने माझ्या जीवनात प्रवेश केला. उधाणलेल्या या वारा व पावसानं माझ्या जीवनातही प्रेमाला उधाण आणलं होतं.
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – karodeshailaja@gmail.com






