श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

गेल्या काही वर्षात आधीच अनोळखी व्यक्तीबद्दल माणसाच्या मनात काहीशी साशंकता निर्माण केली होती. . कोरोनाने ओळखीच्या व्यक्तीबाबतही साशंकता निर्माण केली. घरांच्या दारे-खिडक्याआधीच मनांच्या दारे-खिडक्या बंद झाल्या. घरात ही सुरक्षित अंतर पाहिले जाऊ लागले. अपवाद वगळता माणसाची स्वयं-केंद्रितता वाढली. कोरोनाने सारे जनजीवनच उध्वस्त करून टाकले होते. 

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बऱ्याचअंशी सुरळीत होता पण तरीही भविष्यातील अनिश्चितता मनाला ग्रासत राहिल्याने संग्राहक वृत्ती वाढली होती. सारी कामे ठप्प झाल्याने हातावरती पोट असणाऱ्यांची उपासमार सुरू झाली होती. . मदतीचे हात होते पण ते ही कमी पडत होते. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठं कुठं आणि कसे लावायचे? असे वाटण्यासारखी सारी परिस्थिती निर्माण झाली होती.

काळजी घेणे आणि काळजी करणे हातात हात घालून क्षणोक्षणी प्रवास करत होते. कुणी काही सांगत होते, कुणी काही सुचवत होते.. सूचनांचा तर भडिमार चाललेला होता.. काही पटत होते, काही पटत नव्हते तरीही सारे भीतीपोटी अमलात आणले जात होते. . अवघ्या भवतालात अशाश्वततेचे भय दाटून राहिलेले होते. कोरोना झालाय या भीतीनेच माणसाचे धैर्य खच्ची होत होते.. अचानक अकल्पित बातम्या येत होत्या.. असे काही होईल असे ध्यानी-मनी नसताना नात्यातील, परिचितांतील, माहितीतील व्यक्ती कोरोनाने जग सोडून जात होत्या. हे धक्के पचवणे ही अतिशय अवघड होत होते. फक्त दुरध्वनीनेच दुरच्याच नव्हे तर जवळपासच्या, रोज भेटणाऱ्या शेजारच्याशीही संपर्क होत होता. संवाद होत होता नाही असे नाही पण मन भरत नव्हते. खरंतर व्यक्ती व्यक्तीकडे मोबाईल आल्यापासून चार पावलांवरील शेजाऱ्यांशीही आवर्जून समक्ष भेटणे बऱ्याचअंशी कमीच झालेले होते पण कोरोनामुळे निर्बंध आल्यावर मात्र ती जाणीव आणि प्रत्यक्ष भेटायची, जाण्या-येण्याची उर्मी वाढली होती.

इतरवेळी चार चार दिवस फोन न करणारा मुलगा आणि सून कोरोनाची साथ आल्यापासून आणि प्रामुख्याने निर्बंध  लागू झाल्यापासून रोज एकदा, कधीकधी दोनदाही फोन करून रावसाहेबांची आणि राधाबाईंशी चौकशी करीत होते. त्यामुळे त्या दोघांनाही त्यांची ख्याली-खुशाली कळत होती.

कधी कधी रावसाहेबांच्या मनाला प्रश्न पडायचा… ‘कोरोनामुळे, निर्बंधांमुळे माणसे दुरावली की जवळ आली?  मुलाच्या अपार्टमेंट मध्ये कोरोनाचे पेशंट सापडले.. अपार्टमेंट सील केले गेले. हे कळल्यापासून रावसाहेबांना आणि राधाबाईंना मुलाची आणि सुनेची जास्तच काळजी वाटू लागली होती. दिवसातून एकदा होणारा फोन दोनदा, तीनदा होऊ लागला होता.

दिवस पुढे सरकत होते. . वृत्तपत्रे, टीव्ही सगळीकडे कोरोनाच्याच बातम्या. माणसाच्या मनामधील भीती अधिकाधिक वाढत होती. रावसाहेब आणि राधाबाईंचे स्वतःच्या मनातील भीती लपवत दुसऱ्याला धीर देणे चालू होते. एकेदिवशी राधाबाईंना किंचितसा ताप आला पण त्यांनी ते रावसाहेबांना कळू दिले नाही. एकट्याच मनातील नाना शंका-कुशंकांना तोंड देत वावरत होत्या., दुसऱ्या दिवशी ताप वाढला आणि खोकला ही येऊ लागला तेंव्हा रावसाहेबांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी गावातल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरनी नेहमीच्याच स्वरात ‘ काही काळजी करण्यासारखे नाही. . हवामान बदलाचा परिणाम असणार. . पण आपल्या मनात शंका नको म्हणून  कोरोनाची टेस्ट करूया. . ‘ असे धीर देत सांगितले. रावसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली पण त्यांनी राधाबाईंना धीर देत साथ आहे म्हणून टेस्ट करूया म्हणून सांगितले. ‘ डॉक्टरनी फोनवरूनच पाठवलेली औषधांची यादी औषधाच्या दुकानातून घरपोच मागवली.

राधाबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टमध्ये निष्पन्न झाले. तालुक्याच्या कोविड सेंटरची अँब्युलन्स त्यांना घेऊन गेली. जाताना राधाबाईंच्या मनावरचे दडपण चेहऱ्यावरती दिसत होते. रावसाहेब त्यांना धीर  देत होते. आपलीही टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी होती असे रावसाहेबांना वाटले. .  इतर कोणता आजार असता तर बरे झाले असते दवाखान्यात सोबत तरी जाता आले असते, राहता आले असते असे रावसाहेबांना वाटत होते.  दोन दिवसातच राधाबाई गेल्या. रावसाहेबांना कळवण्यात आले. मुलाला कळवले पण त्याला येता आले नाही. रावसाहेबांनाही अंत्यदर्शन मिळाले नाही. फक्त त्यांना दूर अंतरावर उपस्थित राहता आले.  राधाबाईंच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. रावसाहेब एकाकी झाले, सुन्न झाले. मुलाचा फोन येत होता पण कुणी कुणाचे आणि कोणत्या शब्दांत सांत्वन करायचे? गावातील लोक, शेजारी भले होते. . पण आजारच असला प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारा. . रावसाहेबांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह होती तरी ते आपल्यापासून कुणाला त्रास नको म्हणून दूर रहात होते. शेजारी आले तरी खिडकीतून बोलत होते. शेजारी मात्र त्यांची काळजी घेत होते. चहा- नाश्ता, जेवण देत होते. रावसाहेब एकाकी जगत होते. . काळ जाईल तसे सावरले जात होते.

विशेष बाब म्हणून काही अटींवर पोलीस खात्याकडून  प्रवास करायला परवानगी द्यायला सुरुवात झाली. तेंव्हा मात्र तशी परवानगी काढून मुलगा आला आणि रावसाहेबांना घेऊन गेला. . हळूहळू कोरोनाची साथ आटोक्यात आली. निर्बंध शिथिल होत जनजीवन सामान्य होऊ लागले तरीही प्रत्येकाच्या मनात नकळत काहीशी भीती होतीच पण काहींनी आपल्या स्वकीयांना गमावले होते. . त्याचे दुःख त्यांना होतेच पण सर्वत्र बंधमुक्ततेचा आनंद आणि उत्साह होता. कोरोनाच्या या महाभयंकर वाटणाऱ्या साथीतही आपण सहीसलामत राहिलो, वाचलो. . याचा अनेकांना आनंद झाला होता.  

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments