श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

सहा महिन्यांपूर्वी राधाबाई रावसाहेबांची अर्धांगिनी वारली. गावाकडे रावसाहेव एकटेच जगत होते. घरा-दारात सर्वत्र राधाबाईंच्या आठवणी वावरत होत्या. . त्या आठवणीसोबतच राहिलेले आयुष्य त्यांना काढायचे होते. मुलगा सोबत घेऊन जाण्यासाठी आला तेंव्हा त्यांना राधाबाईंच्या आठवणींनी भरलेले ते सोडून जायची इच्छा नव्हती पण त्यांचा मुलगा त्यांना तिथे एकटं सोडायला तयार नव्हता.

‘बाबा, आजवर खूप ऐकले तुमचे पण आता नाही. मी काही तुम्हाला एकटे सोडणार नाही इथं… तुम्हांला आमच्यासोबतच राहावे लागेल.’

असे मायेने, काळजीने निक्षून सांगून मुलाने त्यांना आपल्यासोबत आणलेले होते…

पदपथावरून चालता चालता नेहमीप्रमाणेच रावसाहेबांना मुलाचे वाक्य आठवले आणि ‘सोबत’ हा शब्द आठवताच त्यांच्या चेहऱ्यावर उदास हसू तरळुन गेले.

‘सोबत’ याचा अर्थ तरी कळतोय काय त्याला. . ? एकाच छताखाली राहणे म्हणजे सोबत नसते. . त्यांच्या मनात आले आणि त्यांना राधाबाईंची आठवण आली. राधाबाई म्हणाल्या असत्या, ‘अहो, काळ बदललाय.. त्यांचे सगळे राहणीमान बदललंय.. त्यांचे विचार, त्यांच्या सुखाच्या व्याख्या बदलल्यात.. आपण त्यांना समजून घ्यायला नको का?’ 

राधाबाईंचे दुसऱ्याला समजून घेणे  हे नेहमीचेच होते. आधी सासू-सासऱ्यांच्या पिढीला समजून घेतले आणि नंतर सून-मुलाच्या पिढीला. मुलगा जेंव्हा त्याच्याच आयटी क्षेत्रातील  मुलीशी लग्न करतो म्हणाला तेंव्हा रावसाहेबांना वाटले होते राधाबाई काहीसा विरोध करतील पण त्या मुलाला म्हणाल्या होत्या..

‘तुला करावेसे वाटतंय ना मग कर.. कधीतरी वर्षा-सहा महिन्यातून तिला घेऊन चार दिवस इकडे येत जा म्हणजे झाले. आपले गाव, आपले घर, आपली माणसे आपली वाटली पाहिजेत रे…!’  आणि नंतर रावसाहेबांना म्हणाल्या होत्या. ‘आपणच त्यांना समजून घ्यायला नको का?’ 

राधाबाईंचे सगळेच त्यांना पटत होते पण तरीही अलीकडे त्यांच्या मनात उलट सुलट विचार येत होते.

मुलगा हुशार होता. त्याने खूप शिकावे असे त्यांना वाटत होते. . त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलगा शिकला होता. इंजिनीअर झाला. स्वतःच्या पायावर उभा राहिला. आयटी क्षेत्रात नोकरीही करत होता.  त्यांनी आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती एवढा मोठा पगार त्याला मिळत होता. या साऱ्याचा त्यांना खूप अभिमान होता. पण आज मात्र त्यांच्या मनात खूप वेगळे विचार येऊ लागले होते.. आपण त्याच्या मनात अशा मोठमोठ्या इच्छा, आकांक्षा पेरण्यात चूक तर केली नाही ना? आज मुलगा-सून जे जगतायत त्याला का जीवन म्हणायचे ?  सकाळी जातात ते रात्री कधीही येतात, त्यातही येण्याची निश्चित अशी वेळ नाहीच. ‘दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी ! ‘म्हणतात तसे यांचे जीवन. एखाद्या मशीन सारखे नव्हे तर अलीकडे रोबोट का काय म्हणतात तसे ते जगतायत. . अगदीच यंत्रमानव होऊन गेलेत. . हे सारे आपल्या संस्काराचेच; खूप शिकावे, मोठे व्हावे या इच्छेचेच फळ आहे काय?

मुलाच्या लग्नानंतर त्याने टू बीएचके फ्लॅट घेतला तेंव्हा राधाबाई सुनेला म्हणाल्या होत्या. . ‘आता नातवंड खेळू दे आमच्या मांडीवर..’ तेंव्हा सून म्हणाली होती, ‘आई, आमचे ठरलंय, कमीतकमी नवा थ्री बीएचके फ्लॅट घेतल्याशिवाय मुलाचा विचार करायचा नाही.. त्याला सगळी सुखे द्यायची आहेत आम्हांला..’ एक स्वप्न पूर्ण झाले की त्याचा आनंद मिळवत राहण्याआधीच पुढच्या मोठ्या स्वप्नाकडे धावायला सुरवात करायची हे का जीवन आहे?

पस्तिशीला आले तरीही अजून मुलाचा विचारही करायला तयार नाहीत ते. . याला काय म्हणायचे?

गेल्या काही दिवसांच्या सवयीने रावसाहेब बागेत येऊन नेहमीच्या बाकावर येऊन बसले तरी त्यांच्या मनातील विचारांचे, आठवणींचे वादळ शमले नव्हते.

राधाबाई गेल्यानंतर ते मुलांसोबत आले होते पण त्यांचे एकाकीपण संपले नव्हते. इथं मुलगा आणि सून स्वतःच्या नोकरीत एवढे व्यस्त होते की त्यांना एकमेकांशी बोलालयलाही वेळ मिळत नव्हता. एखाद्या धर्मशाळेत अनोळखी पांथस्थ मुक्कामाला उतरावेत आणि त्यांच्या जेवढे आणि जसे बोलणे व्हावे तसे किंबहुना त्याहूनही कमीच बोलणे एकमेकांत होत होते. . निवांत बसून एकमेकांशी गप्पा मारणे हा प्रकारच नव्हता. गावाकडे आयुष्य घालवलेल्या रावसाहेबांना ते प्रकर्षाने जाणवत होते, त्या साऱ्याची उणीव जाणवत होती. तशी मुलगा-सून अगदी आपुलकीने, आपलेपणाने जाता येत त्यांची चौकशी करीत होते, त्यांना हवे-नको ते पाहत होते, नाही असे नाही पण गावाकडल्यांसारखा मोकळा वेळ त्यांच्याकडे नव्हता आणि रावसाहेबांकडे न सरणारा मोकळा वेळच वेळ होता. गावाकडे समोरून जाणा-येणारा कितीही घाई-गडबडीत असला तरी हटकून थांबतो. . हाक मारून दोन शब्द बोलून मगच पुढे जातो. . तसला काही प्रकार इथे नव्हता आणि या साऱ्यामुळेच रावसाहेबांचे मन इथं रुजलेंच नव्हते. . त्यांच्या सोबत इथं येऊनही ते काही दिवसातच गावाकडे परतले होते.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments