सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

मनाशी निर्धार करून घर सोडायचे ठरवले. पण आई बाबांना सोडून जाताना पुन्हा आकाश कोसळले. आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायलाच तयार नव्हते. बाबाही सैरभैर झाले होते. आपल्या लाडक्या लेकीची अशी पाठवणी करायची म्हणजे मोठे संकट होते. मी निर्धाराने माझी बॅग भरली. त्या जरीच्या साड्या, चमचमते ड्रेस, दागिने, सगळे बाजूला सारले आणि फक्त साधे ड्रेस बॅगेत भरले. मला आता कुठल्याही गोष्टीचा मोह नको होता. आयुष्याचा मार्ग मी बदलणार होते. मग कशाला ती झगमग? तो मोह आणि त्या आठवणी.

आत्याकडे जातानाच्या प्रवासात माझ्या मनात अनेक विचार उंचबळत होते. एक मात्र ठाम निर्णय मन देत होतं की पुन्हा स्टॅट नको, मॅथ्स नको त्याची आठवण नको. त्यापेक्षा पुन्हा बारावी सायन्सला ऍडमिशन घ्यायची. बायोलॉजी घेऊन. अगदी मेडिकलला नाही तर निदान नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवायची आणि लोकांच्या व्याधी दूर करण्यासाठी धडपडायचं. माझ्या दुःखामध्ये मला जसा इतरांनी आधार दिला, तसाच आधार आपण आता इतरांना द्यायचा.

माझा हा विचार आत्याला आणि तिच्या मिस्टरांना एकदम पटला. त्यांच्या मते तसे करणे अवघड होते पण अशक्य नव्हते. त्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला जड जात होते. हातात एक डिग्री असून पुन्हा माघारी मी फिरत होते. पण आता तसे करायलाच हवे होते. ही निवड आवडीने नाही तर परिस्थितीशी जुळण्यासाठी केली होती.

जीव ओतून मी आता अभ्यासाला लागले. दिवस आणि रात्र एकच. बारावीचा आणि एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास. पुस्तक एके पुस्तक. नो टीव्ही, नो पिक्चर,  नो गाणी एवढेच काय आई-बाबांनाही भेटायला मी गेले नाही. दादाच मधून मधून येऊन जायचा. माझ्या अभ्यासाचा ध्यास बघून निश्चिंतपणे जायचा. माझी प्रगती ऐकून आई-बाबा ही निश्चिंत झाले.

जीव आणि प्राण ओतून, रात्रीचा दिवस करून मी बारावीचा पुन्हा एकदा अभ्यास केला आणि मला योग्य तेच  फळ मिळाले. एंट्रन्स एक्झॅमलाही माझे छानच स्कोरिंग झाले. त्यामुळे नर्सिंगलाच काय, मला एमबीबीएसलाच ऍडमिशन मिळाली. तिही मुंबईतल्या प्रख्यात कॉलेजमध्ये. तिथून माझ्या आयुष्याला नवीनच वळण लागले. आयुष्यातला अंधार नाहीसा झाला, मला प्रकाशाच्या नवीन मार्ग सापडला.

यावेळी आई-बाबा मला मुंबईला सोडायला आले. त्यांच्या चेहऱ्यावरही मला बऱ्याच वर्षांनी आशेचा किरण दिसून येत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझे कौतुक ओसंडून वहात होते. पण दादाकडे परत जाताना आईचा बांध पुन्हा फुटला, पुन्हा एकदा गंगा यमुनांनी  मला न्हाऊ घातले. मात्र यावेळी मी माझं रडू आवरलं. तिला धीर दिला, सुट्टी मिळाली की मी दादाकडे नक्की येते अशी तिची समजूत घातली.

पण एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत मी काही दादाकडे गेले नाही. कारण वर वर किती जरी मी सावरल्यासारखं दाखवत असले तरी आतून माझे मन पार कोलमडून गेले होते. आयुष्यातला तो प्रसंग मी विसरू शकत नव्हते. आई-बाबांच्या सहवासात जखमेवरची खपली आपोआप निघत होती. अजून माझे मन दगड काही बनत नव्हते.

क्रमशः – 3

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments