? जीवनरंग ❤️

☆ EQ,  दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -2 ☆ योगिया

EQ (Emotional Quotient), दूधवाला आणि फ्री पिझ्झा

पिझ्झा खाताना आजोबा आम्हाला सांगत होते कि “आज तुमची आजी असती ना तर तिने त्याला आज ठेवूनच घेतला असता. फार जीव लावायची सगळ्यांना.” फार इमोशनल झाले होते आजोबा. सांगत होते कि “त्यांच्याकडे एक अप्पा दूध घालायला यायचे. जवळच्या गावातून पहाटे ५.३० – ६.०० ला निघायचे. बरोबर ७. २० ते ७. ३० च्या दरम्यान आमच्याकडे यायचे. कित्त्येक वर्षे येत होते. कधी खाडा नाही. आजारपण नाही. ऊन -पाऊस नाही. वेळ ठरलेली. एकदा मात्र त्यांना यायला उशीर झाला ८.३० वाजले. तुझ्या आजीची चलबिचल सुरु. कशात तिचं लक्ष लागेना. सारखा एकच घोष “अप्पाला कधी उशीर होत नाही आज काय झालं?” ९ वाजले. मग तिने दारामागे अप्पासाठी भांड पालथं घातलं (पूर्वी अशी पद्धत होती कि कोणाला उशीर झाला, आपण कोणाची वाट पहात असू तर त्याच्या नावाने दारामागे भांड पालथं घालायचं). १० वाजत आले. मला ऑफिस ला जायचे होते. मला म्हणाली अप्पा आल्याशिवाय ऑफिस ला जायचं  नाही. जा त्याला बघून या. मग मी एका दिशेला. तुझ्या बाबाला आईने पिटाळलं कि बाकी ज्यांच्याकडे अप्पा दूध टाकतो त्या सगळ्यांकडे जाऊन ये”

“शेवटी ११.०० ला अप्पा आला. त्याची गाडी खराब झाली होती. शिक्षा म्हणून मग त्या दिवशी अप्पा ला आपल्याकडे जेवावं लागलं. तिने नाही अप्पाला अजून १ लिटर दूध फ्री मागितलं. अप्पा पण तिला खरवस , भूईमूगाच्या शेंगा , शेवग्याच्या शेंगा , कणस असं काय काय द्यायचा. त्याचा हिशोब नसायचा.”

उन्हाळ्यात पोस्टमन साठी पन्ह करून ठेवायची..बिचारा इतक्या उन्हात पत्र वाटत फिरतो म्हणून.

कामवाल्या बाईंना रोज ओरडायची, भांडी स्वच्छ निघत नाहीत म्हणून. २ तरी परत धुवायला लावायची पण त्यांचं काम झालं कि त्यांना रोज १ ग्लास भर दूध. वर म्हणायची ताकद नसेल तर कशी निघणार भांडी म्हणून दूध देते तुला. कामवाल्या बाईंनी पण कधी कटकट केली नाही. पाहुणे -रावळे झाले कि  जास्तीची भांडी पडायची. पण म्हणून खाडा नाही केला त्यांनी.

तिने या सगळ्याकडे कधी सर्व्हिस म्हणून नाही पाहिलं. आमच्यावेळी एकूणच जगण्याला SLA ‘s, KPI’s, KRA’s, Goals, Targets चिकटली नव्हती रे. आम्ही  नाती मात्र जोडली होती.  तुम्ही सगळ्याला पेनल्टी किंवा रिवॉर्ड लावून सर्व्हिस मिळवता आणि सुखी होता.  आम्ही संवेदना जाणून सर्व्हिस मिळवायचो आणि समाधानी राहायचो.  अरे मी काय बडबड करत बसलोय. तुझ्या आजीची आठवण झाली इतकंच.  असो. चला पिझ्झा संपवा आणि मग तुमची काय ती कंप्लेंट लाँच करा. “

“मग केली का?”

“नाही बाबा.. यापुढे कधीच कोणाला उशीर झाला तर कंप्लेंट  नाही करणार आणि फ्री पिझ्झा पण नाही मागणार, नो वन ड्स इट पर्पसली.. मला तर वाईट वाटतंय कि आपल्याला वेळेत पिझ्झा पोहोचवण्याचा नादातच तो घसरून पडला असेल” – छोटे चिरंजीव म्हणाले.

दादुने विचारलं ” तुमचं लेक्चर कसं होतं”

बायको उठता उठता म्हणाली  “तुम्ही आज जे शिकलाय त्यापुढे काहीच नाही…जा झोपा आता”

– योगिया

०१ जून २०२२

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments