सौ.सुचित्रा पवार

? मनमंजुषा ?

☆ काला…..☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘काला ‘ म्हणलं की डोळ्यांपुढं काय उभं राहतं ? लहान बाळाने पाटीवर किंवा वहीवर उभ्या आडव्या किंवा गोल गोल रेघोट्या ओढून केलेला  गीजबीट काला की लहानपणी खाल्लेला आमटी भाकरीचा काला ? बऱ्याच जणांना हाच काला आठवला असणार! कारण या काल्याची चव जिभेवर तशीच रेंगाळत असणार! काला —भाकरी कुस्करून भिजेल इतपतच दूध किंवा आमटी घालून बनवलेला एकजीव लगदा ! जो पातळही नसतो आणि अगदी तोटरे लागेपर्यंत घट्टही.

लहानपणी मधल्या सुट्टीत जेवणाचे डबे फक्त ज्यांची घरे लांब आहेत किंवा शेतातल्या वस्तीवरून येणाऱ्या मुलं मुलीच आणत. ज्यांची घरे जवळ आहेत ते घरीच येऊन जेवत. कमी वेळेत पोटभर जेवण खायचा चविष्ट, साधा सोपा मार्ग म्हणजे भाकरीचा काला करणे. शक्यतो डाळीची किंवा कडधान्याचीच आमटी असायची. भाजी हा प्रकार फक्त कधीतरी हिरवी पालेभाजीच, इतरवेळी आमटीच. सकाळी भात ही त्याकाळी करत नसत. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ठेवून शेतावर कामासाठी किंवा मजुरीसाठी जायला लागायचे त्यामुळं मधल्या सुट्टीपर्यंत बुट्टीतली भाकरी थोडीशी वाळून गेलेली असायची अगदी मऊसूत नसायची म्हणून त्यावर शोधलेला नामी उपाय म्हणजे काला ! भाकरी कुस्करून (चुरून शब्द खूप मिळमिळीत)एका ताटलीत घ्यायची मग त्यात पळी दोन पळी आमटी घालायची आणि पूर्ण चुरा कालवला म्हणजे भाकरीच्या अणू -रेणूत आमटी एकरूप व्हायची मग ते छोटे छोटे घासाचे गोळे करून खायचे,अहाहा ! किती चविष्ट लागायचा तो काला ! आणि पोट भरल्याचे समाधानही ! (मटणाचा रस्सा अन शिळ्या भाकरीचा काला तर अवर्णनीयच!)

शेतावर जाताना फडक्यात बांधलेली भाकरी कालवणात भिजून जायची; तो भिजलेला काला भुकेल्या पोटी खाताना अमृताहून रुचकर लागायचा. पूर्वी डबे वगैरे असला काही प्रकार नसायचा. सरळ फडक्यात खाली दोन भाकरी, वर दोन भाकरी आणि मधल्या भाकरीवर कालवण. ही मधली भाकरी कालवणातल्या थोड्याश्या ओलसर पणाने भिजून जायची आणि तिचा मऊ काला व्हायचा. भुकेल्या पोटी हा काला खाताना होणारा क्षुधापूर्तीचा आनंद अवर्णनीयच !

म्हाताऱ्या माणसाना दात नसल्याने काल्याशिवाय पर्याय नसतो. कोणताही पदार्थ पातळ केला की पचायला सोपा होतो हेच तर शास्त्र नसेल ना काला करण्यामागचे?

खरे तर श्री कृष्णाने काल्याची सुरुवात केली असावी असे मला वाटते.

यमुनेच्या तीरी

जमवून गोपाळाना

करुनी गोपाळकाला

सुखावतो सवंगड्यांना

रानात गाई चरावयला नेल्यानंतर दुपारच्या वेळी गुरे सावलीत विश्रांती घेत आणि कृष्ण आपल्या सवंगड्यांना जमवून शिदोरी सोडत असे आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खात. गोपाळ काला तेव्हापासूनच समाजमान्य आणि समाजप्रिय झाला; कारण हा काला सामाजिक समतेचे प्रतीक होते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे हे बालगोपाल एकत्र जेवताना कुणालाच अवघडलेपण येऊ नये, सर्वजण एकत्र असताना कुणी स्वतःचे वेगळेपण जपू नये ,त्याचबरोबर अन्न हे जिभेसाठी नसून पोटासाठी, क्षुधा शमवण्यासाठी असते हाच संदेश कृष्णाने गोपाळ काला करून दिला. दही भाताचा काला कृष्णाला जसा प्रिय तसाच अनेक देवदेवतांना प्रिय आहे. भात, दही, साखर वरून तुपाची धार सोडलेला दही भाताचा काला शंकराला प्रिय आहे.खरे तर जे अन्न पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे तेच देवाला प्रिय आहे आणि तेच आपण देवाला नैवेद्यात वापरतो.

ताजा थंड झालेला मऊ भात ,त्यात मावेल इतपतच दही(फार पिचपीचीत न करता)चवीपुरती साखर घालून एकजीव काल वलेला दहिभाताचा अमृततुल्य काला लहान मुलांसाठी पौष्टिक आहे .क्षुधा शांत होते,जठराग्नी शमतो आणि बल देणारा हा काला देवालाही न आवडला तर नवलच.

“दही भाताचा घ्या काला आमचा कूळस्वामी(ज्याचा जो कुलस्वामी असेल त्याचं नाव घयायचे) पारधीला गेला.”

पौष पौर्णिमेला  दही-भात ,गाजराचे तुकडे ,कांदा पात, हिरवा ओला हरभरा एकत्र मिसळून  काला करायचा,त्याचे शंकू सारखे मूद करून देवाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी ताटात मूद ठेवून शेजारी पाजारी एक एक मूद वाटायची आणि त्यांनी ताटात त्याबदल्यात शिळी चतकोर-अर्धी भाकरी ठेवायची.माघारी आल्यावर ती शिळी भाकरी आपण खायची. शिळीच भाकरी का द्यायची?मला कारण समजले नाही पण अन्न शिळ की ताज असो त्याचा अव्हेर/अपमान करायचा नाही, असा संदेश असेल. त्या जमलेल्या भाकरी घरी येऊन खायच्या.आता कुणी मूद वाटत नाही.याच पौर्णिमेला मूदीची पुनीव म्हणतात.

नुकतेच जेवण घेऊ लागलेल्या बाळाला दही-भात, वरण भात, दूधभात किंवा दुधभाकरी, वरण भाकरी चा काला भरवतात. नुकतेच दात येऊ लागलेले असतात त्यामुळं त्याला घास चावणे व पचणे सोपे जावे व पोटही भरावे म्हणून बाळाला काला भरवतात.वृद्ध व्यक्तीही दात नसतात म्हणून काला खाणेच पसंद करतात. शेतकरी लोक गडबडीत जेवण उरकण्यासाठी आमटी भाकरीचा काला खाणेच पसंद करतात.

पारायणाची सांगता काल्याच्या किर्तनाने होते. काला सामाजिक समतेचे प्रतीकच आहे जणू. भिन्न आर्थिक स्तरातील समाज एकसंघ राहण्यासाठी स्वतःचे वेगळेपण बाजूला ठेवून, ‘स्व’ विसरून एकमेकांत मिसळणे गरजेचे असते कारण एकत्र रहाताना वेगळेपण जपायचे नसते त्याला ‘अहं’ची बाधा होते.म्हणूनच कृष्णाने गोपाळ काल्याची संकल्पना सुरू केली ..अवघा रंग एक झाला..’पंढरपुरात हरी कीर्तनात,हरी भजनात तल्लीन होताना भेद आपोआप गळून सगळेच रंग एक होऊन हरीमय होतात.भेदाभेदाला तिथं मुळीच स्थान नसते किंबहुना भेदाभेद पाळणारा हरीमय होऊ शकत नाही.लहान मोठा ,गरीब श्रीमंत ,उच नीच सगळेच चंद्रभागेच्या वाळवंटात एक होतात.

आज सामाजिक परस्थिती खूपच  बदलली आहे.काला खाणे कालबाह्य झालेय आणि एकाच घरातल्या माणसांचे वेगवेगळे रंग एकरंग होणे अवघड झालेय कारण हेच, आम्हाला एकमेकांत कालवून घ्यायचे नाही!   निकोप ,सुदृढ शरीरासाठी आणि समाजासाठी पुन्हा काल्याचे स्मरण होण्याची खरेच गरज आहे,तुम्हाला काय वाटते ?

तुम्हीही खाल्लाय का कधी काला?एकदा जरूर खा अन ब्रह्मानंदी टाळी लागू द्याच!!

 

© सौ.सुचित्रा पवार

10/3/21

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments