?  मनमंजुषेतून ?

☆ आणि डबा वाजू लागला… ☆ सुश्री स्वरदा केळकर वझे ☆

त्यादिवशी मीनल कडून आले. घरातली सगळी कामं तशीच पडून होती. मात्र थकव्यामुळे करण्याची उमेद नव्हती. आल्या-आल्या फ्रेश होऊन खाऊन घेतले आणि आता जरा पडावं म्हणून खोलीत आले.

खोलीला लागूनच मोठे ग्राउंड होते. सुट्टीचा दिवस म्हणून सगळी पोरं जमली होती. डबा ऐसपैस चा डाव मोठ्या रंगात आला होता. मी आडवी झाले, मात्र पोरांच्या दंगामस्ती करण्यामुळे आणि डब्याच्या आवाजामुळे झोप लागणे अशक्य होते. कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता नुसता. जोरात ओरडावंसं वाटलं आणि राग अनावर होऊन मी बाहेर आले. खूप बोलले त्यांना. बिचारी पोरं एवढेसे तोंड करून ग्राउंड वरच बसून राहिली.

घरी आले आणि समाधानाने झोपावं म्हंटलं तर मेली झोपच येईना. सारखी हिरमुसलेली मुलं आणि त्यांचे हिरमोड झालेले चेहरे डोळ्यांसमोर येत राहिले. लहानपणी आपण खेळलेले खेळ, केलेली दंगामस्ती आठवत राहिले. शेजारचे भावे काका ओरडायचे, मग इनामदार आजी समजायच्या, सगळं, सगळं आठवलं.

मग वाटलं, या मुलांचा काय दोष? आलेला थकवा घालवण्यासाठीच तर हि खेळतात, दंगा करतात. आपण मोठी लोक यांच्यावर ओरडतो, कारण आपल्याला थकवा घालवण्यासाठी दुसरा उपाय सापडत नसतो. खरं तर दोष आपला, पण बकरा होतो बिचार्‍या कोवळ्या जिवांचा. ते काही नाही, मुलांवर अन्याय होता कामा नये. त्यांनी खेळलंच पाहिजे.

विचार करत करत उठले, राग तर कुठल्या कुठे पळून गेला होता. झोपही उडाली होती. पटकन गरमागरम थालीपीठ खायला केलं आणि बाहेर बसलेल्या मुलांना अंगणात बोलावलं. साऱ्यांची अंगत-पंगत छान झाली. मुलांची कळी खुलली. त्यांनी दंगा न करता खेळण्याचे कबूल केलं, मात्र मी त्यांना भरपूर दंगा करण्याची परवानगी दिली.

त्या दिवसापासून मुलं रोज खेळू लागली. रोज डबा ऐसपैसचा खेळ रंगत राहिला. खेळातला डबा वाजत राहिला आणि त्याचे पडसाद माझ्या आठवणीतल्या अनुभवांच्या रुपाने उमटू लागले.

© सुश्री स्वरदा केळकर वझे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments