सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

(या लेखमालेचा पहिला भाग अनावधानाने “आत्मसाक्षात्कार” – १ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे, ही “पाऊलखुणा” नावाची लेखमाला आहे.)

लिंक  >> पाऊलखुणा – १

माझा जन्म माझ्या आजोळी झाला. आजी आजोबांच्या सुंदर बंगल्यात…ते ठाणे जिल्ह्यातील छोटसं टुमदार गाव! मोठ्या भावानंतर झालेलं मी दुसरं अपत्य! भावाचा जन्म वाडा या तालुक्याच्या गावी हॉस्पिटल मधे झाला.

 माझी आजी वाडा या गावातल्या सरकारी दवाखान्याच्या कमिटीवर चेअरपर्सन होती त्यामुळे ट्रेन्ड नर्सला घरी बोलवून आईचं हे दुसरं बाळंतपण आजीनं घरातच केलं! माझ्या जन्माच्या वेळी आजी आजोबा, मामा मावशी आणि माझा सव्वा वर्षाचा मोठा भाऊ इतकी माणसं घरात होती. कार्तिक प्रतिपदेचा, रात्री १२.४७ चा माझा जन्म !  तारीख   २० नोव्हेंबर १९५६ ! माझ्या आईला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं  पण मामांनी चंदाराणी ठेवलं!जे मला मुळीच आवडायचं नाही.

खुप संपन्न घरात आणि निसर्गरम्य परिसरात माझा जन्म झाला, आजोबांनी तो बंगला त्यांच्या आमराईत बांधला होता, आजीआजोबा दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक कार्यकर्ते, मामा पुण्यात एस. पी.काॅलेज मधे शिकत होते, मावशी नुकतीच मॅट्रीक पास झालेली, आजोळी आम्हा नातवंडांचे खुपच लाड झाले. मी आणि माझा मोठा भाऊ तीन चार वर्षाचे होईपर्यंत आजोळीच वाढलो. कारण माझ्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्याआधी आई बरीच आजारी होती त्यामुळे आम्हा दोघांना माहेरी ठेऊन ती सासरी निघून गेली होती. आमचं हे आजोळ वाडा तालुक्यातलं तेव्हा ठाणे जिल्ह्यात असलेलं पण आता पालघर जिल्ह्यात गेलेलं छोटंसं गाव “वरले” नावाचं!गावात देशमुखांची सात आठ घरं बाकीचे कुणबी, कातकरी, कोळी, वारली लोक!

घरात कामाला कोळीण होती! ती घरात झाडलोट, धुणीभांडी, गड्यांसाठी नाचणीच्या आणि घरात नाष्ट्याला तांदुळाच्या भाकरी करत असे, चंदु आणि अप्पा नावाचे दोन गडी कायमचे जेऊन खाऊन होते.

माझी आजी सुगरण होती आणि वेगवेगळे पदार्थ करायची तिला आवड होती. माझं आजोळ आणि वडलांचं गाव दोन्ही कडे संपन्नता होती, भरपूर शेतीवाडी, दुधदुभतं, फळफळावळ, भाजीपाला, धनधान्य सगळं मुबलक होतं! आजोळ कोकणात तर वडिलांचं गाव घाटावर! मला ती दोन्ही गावं अजूनही खुप आवडतात. आमच्या शिक्षणासाठी १९६० साली आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन आईनं पुण्यात बि-हाड केलं, आम्ही तीनचार वर्षे सदाशिव पेठेत तर तीन वर्षे डेक्कन जिमखान्यावर राहिलो! कधी दिवाळीच्या सुट्टीत तर कधी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो, दोन्ही मामा मुंबईत तर कोल्हापूर सासर असलेली मावशी पण काही काळ पुण्यात रहात होती, सुट्टीत मावस, मामे भावंडं भेटत असू. मोठे मामा सिव्हिल इंजिनियर होते, त्यांच्याकडे कंपनीची “डाॅज”  होती,काळ्या रंगाची,त्या गाडीतून ते आम्हाला जवळपास च्या ठिकाणी विशेषतः वज्रेश्वरीला  फिरवून आणत! मे महिन्यात भरपूर हापूस आंबे असत! जांभळं, पेरू, चिक्कू, केळी बंगल्या भोवती ही असंख्य फळझाडं आणि फुलझाडं होती.जंगलात जाऊन करवंदं तोडायची, तळ्यावर फिरायला जायचं, भावंडांबरोबर पत्ते, बुद्धीबळ खेळायचे…अशी मस्त सुट्टी असायची!

त्या बंगल्यात वरच्या मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका होती कपाटात, मांडणीवर असंख्य मासिके, पुस्तके होती, आम्हा मुलांसाठी चांदोबा, अमृत ही  मासिके आणली जात. गावात असलेले चुलत मामा, मावशी ही खुप प्रेम करायचे. आजोळच्या सगळ्या आठवणी हापूस आंब्यासारख्या मधूर आहेत!

मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे

गर्द काळ्या त्या तमाला भेदून आले चांदणे

जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा

त्याच गावी आठवांचे ठेवून आले चांदणे

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Arun Sawant

सुरेख पाऊलखुणा…..???
पुढील भाग वाचण्याची उत्सुकता!?

Prabha Sonawane

Thank you very much