श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

लहान मुलांना आपण शेकडो गोष्टी सांगतो. साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून सात-आठ वर्षांची होईपर्यंत सगळी मुलं गोष्टींमध्ये मनांपासून रमतात. या गोष्टींमधून मुलांचं स्वतःचं एक भावनिक, आभासी विश्व तयार होत असतं. त्यात राजा असतो, राणी असते, राजकन्या असते, म्हातारी असते, लबाड कोल्हा असतो आणि एक भला मोठा भोपळा सुद्धा असतो. ही सर्व मंडळी मुलांच्या लेखी खरोखरच अस्तित्वात असतात!आजी-आजोबा हा गोष्टी मिळवण्याचा मुख्य स्रोत! त्यानंतर रात्री गोष्टी ऐकत ऐकत झोपण्यासाठी आई लागते. बाबा लागतात.

या गोष्टीतल्या पात्रांमधल्या “म्हातारी” या पात्राबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे! वेगवेगळ्या गोष्टींतून ही म्हातारी येते. गोष्टी निरनिराळ्या असल्या, तरी मला म्हातारी नेहमी एकाच रूपातली दिसते. पांढरे शुभ्र केस, तोंडाचं बोळकं, बारिकशी कुडी, कमरेत वाकलेली, हातातली काठी टेकत टेकत तुरुतुरु चालणारी! डोक्यानं तल्लख! “एक होती म्हातारी” हे वाक्य ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर म्हातारीचं हेच चित्र उभं रहातं. म्हातारी आणि भोपळा यांचं नातं अतूट आहे. कुठल्याही मराठी माणसानं म्हातारीची ही विलक्षण कथा ऐकलेली नसेल, हे तर संभवतच नाही! पूर्वी कितीही वेळा ऐकलेली असली, तरी मुलं ही माहीत असलेली गोष्टच पुन्हा पुन्हा सांगायला लावतात! ती म्हातारी, तिची लेक, वाघोबा-कोल्होबा, शिरा-पुरी, तूप-साखर, लठ्ठलठ्ठ होण्याचं खोटं आश्वासन, भला मोठा भोपळा, आणि “म्हातारी बितारी मला नाही ठाऊक –  चल रे भोपळ्या टुण्णुक टुण्णुक” असं म्हणत वाघोबा-कोल्होबाचा पार मामा करून टाकणं — हे सगळं ऐकतांना गुदगुल्या झाल्यासारखी खिदळणारी पोरं पाहायला मला आवडतात!! या गोष्टीचा शेवट दोन प्रकारांनी सांगितला जातो. पहिल्या प्रकारात वाघोबा-कोल्होबाच्या हातावर तुरी देऊन भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणून पोचवतो, असा शेवट केला आहे. दुसऱ्या प्रकारात, म्हातारी राखेच्या ढिगाऱ्यावर झोपते, मग वाघ तिला खायला येतो, आणि मग म्हातारी जोरात *???? फुस्स्स्स्!! राख उडते आणि वाघाच्या डोळ्यांत जाते. डोळ्यात राख गेल्यामुळे वाघ डोळे चोळत बसतो आणि भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणतो, असा शेवट केला आहे. मला दुसरा प्रकार ऐकायला खूप आवडायचा! आणि इतर बच्चे कंपनीला सुद्धा! पण एकूणच या म्हातारीने बालवाङ्मयात अढळपद मिळवलं!!!

म्हातारीची इतर रूप पाहतांना देखिल मला मजा वाटते. सांवरीच्या झाडाची, चवरीच्या आकाराची, पांढऱ्या तंतुंची, बुडाला हलकसं बियाणं चिकटलेली, हवेवर तरंगत तरंगत जाणारी म्हातारी पाहायला मला आवडते! सावरीची म्हणजेच शेवरीची शेंग तडकली, की अशा शेकडो म्हाताऱ्या एकदम हवेवर तरंगायला लागतात. त्यांच्या हातात हात घालून मला पण तरंगल्याचा भास होतो! (शेवरीची म्हातारी म्हटल्यावर आचार्य अत्रे यांची आठवण येणे अपरिहार्य आहे!)

सुकं खोबरं किसतांना शेवटी किसला न जाणारा असा चिवट पापुद्रा शिल्लक राहतो. त्याला म्हातारी हे नांव कां पडलं असावं, हे मला एक कोडं आहे. बहुधा मरू घातलेल्या, पण चिवटपणे जिवंत राहून आप्तेष्टांच्या पदरी गाढ निराशा टाकणाऱ्या म्हातारीचा ‘चिवटपणा’ हा गुण या पापुद्र्याला चिकटला असावा आणि हे नामाभिधान त्याला प्राप्त झालं असावं!

साखरेच्या गुलाबी रंगाच्या तंतुंच्या काडीभोवती गुंडाळलेल्या कापसाच्या गठ्ठ्याला म्हातारीचे केस असं कां म्हणतात, हे सुद्धा मला एक कोडंच आहे. आजकाल बऱ्याच खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्या, मेंदी लावून आपले केस लाल-भगवे करून घेतात. खरं म्हणजे त्यांना म्हातारपणांत सुद्धा गुलाबी रंगाचं वावडं नसावं! म्हातारीचे गुलाबी साखरेचे केस विकणारे, हातात एक हळुवारपणे किणकिणणारी घंटा घेऊन केस विकायला येतात. त्यांच्याकडे गुलाबी रंग मिळू शकेल हे या खऱ्या म्हातार्‍यांना कुणीतरी सांगायला हवं! कदाचित तो म्हातारीचे केस विकणारा, खऱ्या म्हाताऱ्यांच्या खऱ्या केसांना सुद्धा गुलाबी रंग लावून देईल!

पावसाळ्यात गडगडाट झाला, की आकाशातली पीठ दळणारी म्हातारी केवढी असेल, तिचं ते धान्य दळायचं जातं केवढं मोठं असेल, असं कुतुहल लहानपणी वाटायचं! आकाशातून सरसरत खाली पडणाऱ्या पिठाचा पाऊस कसा होतो, हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीतच आहे. पण त्या लहान वयात सगळं खरं खरं वाटायचं!!

म्हातारीच्या टोपलीतली बोरं चोरणाऱ्या कोल्होबाची गोष्ट तर आबालवृद्धांना अतिशय प्रिय! या कोल्होबाला अद्दल घडवायला म्हातारी होते  सज्ज! हुशारच ती!! सणसणीत तापवून, लालबुंद केलेला तवा ती टोपली जवळ ठेवते. आपल्याला बसायला म्हातारीने रंगीत पाट ठेवलाय्, म्हणून कोल्होबा खुश्. ते त्या रसरशीत तव्यावर जरा बुड टेकून बसतात मात्र … आणि??? आणि हाहा:कार!!! कोल्होबा जीव घेऊन पळ काढतात. म्हातारीची हसून हसून पुरेवाट होते. जळके कुल्ले सांभाळत पळणाऱ्या कोल्होबाला म्हातारी खिजवून प्रश्न विचारते …

शहरी भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, खोड मोडली!!

ग्रामीण भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, * भाजली !!

तर अशी ही म्हातारी! लहान मुलांच्या गोष्टींतून, लोकवाङ्मयातून दिसणारी. ती डोक्याने तल्लख आहे, चटपटीत आहे, युक्तीबाज आहे, विनोदी आहे! ती लहान मुलांच्यात रमते आणि मुलं तिच्यात रमतात. मुलांच्या भावविश्वात तिचं स्थान अढळ आहे आणि म्हणूनच …

ही म्हातारी अमर आहे!

?  ?

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments