सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… कोनाडा – भाग – ४९/१ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
कोनाडा – –
जीजीने आम्हाला हे अनेकवेळा सांगितलं असेल!
“तुमची आई गरोदर असायची तेव्हां, मी घरात नाही असे पाहून गल्लीतल्या कोपर्यावरची ती आजी तुमच्या आईकडे गुळ आणि बिब्बा मागायला यायची. म्हणूनच तुमच्या आईला प्रत्येक वेळी मुलगीच झाली. मुलगा झालाच नाही. “
हे सांगताना जीजीचा सावळा, ओघळलेला चेहरा, काहीसा उदास, कसातरीच व्हायचा.
तिच्या गालावरचा चामखीळही त्यावेळी अधिक लोंबल्यासारखा वाटायचा. मग मी हळूहळू जीजीच्या मांडीवर जायचे आणि तिला विचारायचे,
“तुला आम्ही नको होतो का? आम्ही सार्या मुलीच झालो म्हणून तुला वाईट वाटतं कां? उगीच जन्माला आलो आम्ही. “
मग मात्र ती चिडायची.
“चल!! अभद्र कार्टी कुठली? तू तर माझ्या जनाचा मुलगाच आहेस हो! “
जीजी आणि आम्ही तिच्या पाच नाती.
तिच्याशी आमचं विलक्षण जमायचं. जन्म आईने दिला पण संगोपन जीजीनेच केलं. तिच्याच खांद्यावर आम्ही वाढलो. आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलगा झाला नाही, त्याचा वंश बुडाला, भविष्यात त्याचं नाव लावायला कुणी नाही म्हणून तिला सदा दु:ख वाटायचं पण आम्ही अभ्यास करावा, खूप मार्क्स मिळवावेत, मोठं व्हावं आणि अशा रीतीने तिच्या विद्वान मुलाचं नाव वाढवावं असंही तिला वाटायचं.
परीक्षेचा निकाल असला की आम्ही शाळेतून परत येईपर्यंत ती पायरीवर बसलेली असायची. वरचा नंबर आलेला असला की तिला तिच्या वयाचंही भान
रहायचं नाही. ती उड्याच मारायची.
“माझा बाबा, माझा हुश्शार बाबा. ” म्हणत आमचे पटापट मुके घ्यायची. इतकी आनंदी व्हायची आणि दिवसभर स्वत:शी हसत बसायची.
आणि जर का आमचा नंबर घसरलेला असला की लगेच म्हणायची,
“जाऊदे! त्या बाई जरा पक्षपातीच आहेत. तुला मुद्दामच कमी मार्क्स दिले असतील. त्यांची मुलगी आहे ना तुझ्या वर्गात? तिला पुढे आणण्यासाठी तुला ढकलली असेल मागे. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस.. “
अशी जीजी! आभाळागत माया तिची.
ती बोलायची ते सारं बरोबरच असायचं असं नव्हे पण या सर्वामागे असायचं ते तिचं निरागस निर्मळ प्रेम!
आईनं आम्हाला शिस्त लावली, चांगले संस्कार केले, पपांनी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची अभ्यासात्मक दृष्टी दिली पण जीजीने आम्हाला आधार दिला. त्या कोमल बालपणी, कुठल्याही भयावह क्षणी आम्हाला शिरावसं वाटलं ते जीजीच्या सुरकुतलेल्या कुशीत. तिच्या लुगड्याचा वास आणि तिच्या हाताच्या थोपटण्याने आमची उदासीनता त्या त्या वेळी दूर झाली.
तसं आमचं स्वतंत्र कुटुंब. फारसे नातेवाईक नाहीत. आई, पपा, जीजी आणि आम्ही पाच बहिणी हेच आमचं सिमीत विश्व आणि आमच्या कुटुंबावर जीजीचा तसा पहिल्यापासून प्रभाव.
कळत नकळत ती सगळ्यांना तिचं ऐकायला लावायची. पपांचं व्यक्तीमत्व इतकं जबरदस्त, हट्टी पण अनेक वेळा त्यांनाही तिच्यापुढे नमावं लागायचं. तशी देवधर्म करणारी ती नव्हती. उलट तिनं वयाच्या सोळाव्या वर्षापासून इतकं जग पाहिलं आणि इतके कटु अनुभव घेतले की देवाविषयी ती फार भोळी नव्हती पण घरातून बाहेर जाताना मात्र देवाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. त्यासाठी ती आम्हाला पायरीवरुन परतायला लावायची.
“नमस्कार केलास? आधी कर. आणि मग जा. “
पपांनी मात्र तिचा हा नियम कधी पाळला नाही पण पपा बाहेर पडले की बापूडवाणी होऊन दिवाणखान्यातल्या खिडकी जवळच्या शंकराच्या फोटोजवळ पाच मिनीटं हात जोडून काहीतरी पुटपुटत उभी रहायची.
ती जशी प्रेमळ, तशी त्रासदायकही होती. तिचं कुणी ऐकलं नाही की ती त्या गोष्टीचा इतका पिच्छा पुरवायची की शेवटी कंटाळून तिचं ऐकावंच लागायचं.
एकदा आठवतंय्.. दिवस पावसाळ्याचे होते पण म्हणावा तसा पाऊस अजन कोसळत नव्हता. त्या दिवशी तर चक्क उन पडलं होतं. आभाळ अगदी मोकळं, निरभ्र होतं. तरीही घरातून निघताना जीजी म्हणाली,
“छत्री घे. “
“काय तरी काय? इतक्या कडक उन्हात मी छत्री घेतली तर माझ्या मैत्रीणी मला हंसतील आणि मी छत्री कुठेतरी विसरेनही. “
पण गंमत झाली. संध्याकाळी वातावरण एकदम बदललं. आकाश काळंकुट्ट झालं. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. ओली झालेली मी कशीबशी बसमधून टेंभी नाक्यावर उतरले तर बस स्टाॅपवर जीजी डोक्यावर एक आणि हातात एक छत्री घेऊन उभी!!
ते चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या दिवसाची तिची ती काळजीभरली प्रेममय नजर मनात कोरली गेली आहे.
“अग!! तू कशाला आलीस इतक्या पावसात? “
“कार्टे तुला सकाळी छत्री घेऊन जायला सांगितलं तर ऐकलं नाहीस. हट्टी, द्वाड.
किती भिजली आहेस! न्युमोनिया झाला तर? परीक्षा जवळ आली आहे. “
रस्ताभर ती बोलत होती.
घरात शिरल्याबरोबर स्वत:च्या पदरानेच तिनं माझं डोकं खसाखसा पुसलं. गरम पाण्यातून चमचाभर ब्रांडीही पाजली. कितीतरी वेळ नुसती अस्वस्थ होती.
लहानपणी मला वरचेवर सर्दी, खोकला ताप यायचा. डांग्या खोकल्याने मी दोन महिने आजारी होते. कितीतरी औषधे, इंजेक्शने झाली पण खोकला काही थांबायचा नाही एक दिवस कंटाळून मी जीजीला म्हटलं,
“जीजी आता तूच मला बरं कर. तू दिलेलं कितीही कडू औषध मी पीईन पण हा खोकला थांबव. नाहीतर मी मरुन जाईन. “
तिच्या अंत:करणातला मायेचा झरा, तिच्या डोळ्यातून ठिबकला. एरवी मला सतत ‘कार्टी भामटी’ म्हणणारी… तिनं मला पदरात वेढून घेतलं.
“असं बोलू नकोरे बाबा! संध्याकाळच्या वेळी कसलं हे अभद्र बोलणं. मी कशी मरु देईन तुला? “
अन् तिने माझे मटामट मुके घेतले.
मग ती सकाळीच घराबाहेर पडली. कुठे गेली कोण जाणे! पण परत आली तेव्हा तिच्या हातात हिरवीगार अढुळशाची पानं होती.
तिनं ती स्वच्छ धुवून पाट्यावर वाटली आणि त्याचा रस काढला.
आणि तो कडू रस, “अच्च्युताय नम:
गोविंदाय नम:”असं म्हणत माझ्या घशात उतरवला. लागोपाठ सात दिवस या धन्वंतरीची ट्रीटमेंट मी याच पद्धतीने घेतली आणि खरोखरच माझा तो जीवघेणा खोकला बरा झाला.
तिची श्रद्धा, तिची मेहनत आणि तिच्या ममतेपुढे तो रोग नमला. तिला इतकी आयुर्वेद उपचारपद्धती कशी माहीत होती, ते गुपीतच होतं पण तिने केलेले लेप, गुट्या, चाटणे, काढे यांच्यामुळे आमच्या व्याधी झटकन् बर्या व्हायच्या.
जीजी सार्यांसाठी झटायची. तिला आमच्यापैकी कुणाचंही काही करताना कधीही कंटाळा आला नाही. तिच्या मनात आमच्याबद्दल अत्यंत माया होती. ओलावा होता.
जीजीची तिसरी नात छुंदा. आमच्या सर्वांपेक्षा हुशार, अत्यंत अभ्यासू. जीजीला तिचा फार अभिमान.
“हा माझा अर्जुन हो! “असं सगळ्यांना सांगायची.
पण जीजीची ही नात फार रडकी आणि खेंगट. शाळेत जाताना रडायची. म्युनिसीपालिटीची बारा नंबरची शाळा तिला आवडायची नाही पण घराजवळची शाळा म्हणून आमचं सर्वांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. आम्ही कुणीच शाळेत जाताना त्रास दिला नाही पण छुंदाने खूप त्रास दिला. जीजी रोज तिच्याबरोबर शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून रहायची. ना भूक ना तहान. छुंदा वर्गातून बाहेर येऊन खात्री करुन घ्यायची, जीजी पायरीवर असल्याची. छुंदा पाचवीत जाईपर्यंत ही जोडगोळी शाळेत जायची. छुंदा वर्गात अन् जीजी पायरीवर.
पुढेपुढे छुंदाच्या वर्गबाईंनाही जीजीची सवय झाली. ही एवढी म्हातारी बाई नातीसाठी ५—६तास पायरीवर बसून राहते याचं त्यांनाही प्रचंड कुतुहल वाटायचं. कधी कधी तर बाईंना काही काम असलं तर त्या जीजीलाच वर्ग सांभाळायला सांगायच्या. वर्गातल्या सार्यांचीच ती आजी झाली होती.
पुढे छुंदा उच्च श्रेणीत केमिकल इंजिनिअर झाली. आजही ती म्हणते. “जीजी नसती तर मी शिकले असते का?? “
इंजीनीअरींगचं डिग्री-सर्टीफिकेट जीजीच्या हातात देत ती म्हणाली होती…
“खरं म्हणजे ही डिग्री तुलाच दिली पाहिजे. “
त्याक्षणी तिच्या चेहर्यावरचा आनंद, डोळ्यातलं पाणी अतुलनीय होतं.
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटीच घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा.
पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची. त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्या कातकरी आदीवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून निवडून तीआंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,
“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. “
तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं.
आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून जायचो.
तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू पण आजोबांकडे सगळं शिस्तीत, नियमात, वेळेत. जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. भरपूर, केव्हांही, कधीही आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता.
– क्रमशः भाग ४९ / १..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






