सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ चिमटे आणि बक्षीस… लेख क्र. १२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
बर्वेबाई विक्रांतला (नाव बदललेले) घेऊन माझ्याकडे आल्या. त्या वर्गातील सर्व पालकांची तक्रार होती की तो खूप शिव्या देतो. विक्रांत खाली मान घालून माझ्यासमोर उभा होता.
मी त्याला म्हटलं, “तुमच्या बाई शिव्या देतात की मी शिव्या देते रे? कोणाच्या शिव्या ऐकून तू अशा शिव्या देतोस?”
थोडा वेळ तो काहीच बोलला नाही.
त्याच्या पाठीवर हात ठेवून मी म्हटलं, “खरं सांग, मी नाही शिक्षा करणार तुला, आणि खरं बोललास, तर बक्षीससुद्धा देईन.” त्यावर तो म्हणाला, “आईला मारताना बाबा अशा शिव्या देतात.”
काय बोलणार आता याच्यावर?
मला एक कल्पना सुचली. मी म्हटलं, “आता बाबा आईला मारायला किंवा शिव्या द्यायला लागले ना की त्यांना चिमटा काढ आणि सांग की मला नलावडेबाईंनी असं करायला सांगितलं. तू असं केलंस तर मी बक्षीस देईन तुला.”
आठ दिवसांनी तो माझ्याकडे आला, म्हणाला, “बाई, मी बाबांना दोनदा चिमटा काढले. तेव्हा बाबा मला मारायला आले पण चिमटा काढायला तुम्ही सांगितलं – नलावडे बाईंनी सांगितलं, असं सांगितल्यावर हात जोडून म्हणाले – बाईंना नको सांगूस बरं, मी आता शिव्यापण देणार नाही आणि मारणारपण नाही. बाई, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, आता द्या मला बक्षीस!” असं तो म्हणाला.
मी त्याला दोन चित्रकलेची पुस्तकं आणि रंगपेटी दिली. तो एकदम खुश झाला, म्हणाला, “बाई, आता मी शिव्या देत नाही, अभ्यास करतो.”
घरी आईवडील जसे वागत असतील तसंच मुलं वागतात. दोष कोणाला द्यायचा?
मुलांना विश्वासात घेऊन काय चूक आहे ते समजावून सांगितलं तर ते ऐकतात. एक कौतुकाची थापही मुलांचं वर्तन बदलू शकते, फक्त त्यांना समजेल असं सांगणं गरजेचं असतं.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




