सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

२००० साली आमचा मुलगा सून- सतीश सुप्रिया- सतेजसह मिनीयापोलिस इथे होती. अमेरिका पहायला जायचं मनात होतं. व्हिसाही  मिळाला होता. पण गणेशोत्सव जवळ आला होता. आणि सासुबाईंनी नेहमीच्या समजूतदारपणे अमेरिकेत गणपती साजरा करण्याची परवानगी दिली. मग तयारीची धांदल उडाली. श्रींची मूर्ती इथूनच नेण्याचे ठरले. पण ‘केसरी’ने त्यांच्या पूर्वीच्या  अनुभवावरून बजावून सांगितले होते की, गणपतीची मूर्ती बॅगेत ठेवू नका. कितीही चांगलं पॅकिंग केलं तरी एवढ्या प्रवासानंतर मूर्तीला काही झालं तर आपला विरस होतो. म्हणून माझ्या खांद्यावरच्या मोठ्या पर्समध्ये राहील अशी मध्यम आकाराची मूर्ती व्यवस्थित पॅक करून घेतली. मुंबई- न्यूयार्क व पुढे पंधरा दिवस पूर्व-पश्चिम-पूर्व अमेरिका दर्शन  असा श्री गणेशाच्या साथीने प्रवास करून मिनीयापोलिसला पोहोचलो. खूप आधीपासून  आणलेली मूर्ती सुखरूप होती हे पाहून फार बरे वाटले.

घराभोवती सुरेख हिरवळ आणि हरतऱ्हेच्या फुलांनी सजलेली बाग बघून माझे डोळे चमकले. सतीशने लगेच बजावले, ‘ इथल्या कुठल्याही फुलालाच काय पण पानालाही हात लावायचा नाही. मी तुम्हाला डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये घेऊन जाईन. तिथे सारे काही मिळते.”  गणपतीसाठी बहुतेक सर्व तयारी मुंबईहूनच  करून आणली होती. अभिषेकासाठी चांदी-पितळेची छोटी मूर्ती तेवढी आणायची राहिली होती. डेकोरेशनचे मनाजोगते सामान ,फळे , फुले आणि एक डॉलरला नारळसुद्धा त्या स्टोरमध्ये मिळाला.. यांनी स्वतःच पुस्तकावरून श्री गणेशाची यथासांग प्रतिष्ठापना केली.  डिस्नेलॅ॑डमध्ये एका स्टॉलवर सुंदर रंगीत दगड विकायला ठेवलेले दिसले. त्यातला लाल रंगाचा, गणपतीच्या आकाराचा भासणारा, नर्मदा गणपती खरेदी केला होता, त्याचीच  गणपतीच्या मूर्तीबरोबर पूजा करून त्यावरच आवर्तनांचा अभिषेक करत होतो. तिथल्या काही परिचितांना सहकुटुंब बोलावले होते. पूजा, आरती, नैवेद्य सर्व यथासांग झाले. शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून झांजा न वाजवता टाळ्या वाजवून आरती झाली. एसीमधून उदबत्तीचा जास्त सुगंध जाऊ नये म्हणून साध्या उदबत्या लावल्या. आदल्या दिवशीच गुलाबजाम व तळलेल्या करंज्या मोदक करून ठेवले होते. भरगच्च मेन्यू होता. सर्वजण गणपती, आरती, प्रसाद यावर खुश होती. आम्हालाही मुंबईसारखेच सगळे साग्रसंगीत झाल्याने आनंद झाला होता.

दोन दिवसांनी सतीशच्या ऑफिसमधील आठ नऊजणं रात्री गणपतीला जेवायला येणार होते.  संध्याकाळीच स्वयंपाक करून ठेवला.  आरतीही करून घेतली. पण पाहुणे विचारायला लागले, ‘ऑंटी, आरती कभी करेंगे?’  आरती झाल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले,’नही नही .ऐसे कैसे हो गया? हमे तो आरती, पूजा सब देखना है. करना है. कितने बरस के बाद ये सब देखने का मौका मिला है.’– मग पुन्हा एकदा साग्रसंगीत आरती झाली. आमचा नातू आश्चर्य वाटून म्हणाला की, ‘आजी, आपण उद्याची आरतीसुद्धा आजच करीत आहोत का?’— ठिकाण आणि पाहुणे दरवर्षीपेक्षा वेगळे पण आनंद, मानसिक समाधान तेच!

मिनीआपोलिसला मिनेसोटा नदी मिसिसिपीला मिळते. मिनीयापोलिस व सेंट पॉल ही जुळी शहरे मिळून तिथे पाण्याने भरलेले अनेक मोठे तलाव आहेत. लोक मजेने स्वतःच्या बोटीतून फिरत असतात. आत्ममग्न, उच्चभ्रू लोकांचे हे शहर आहे. फक्त डाऊन टाऊनमध्ये उंच टॉवर्स आहेत. बाकी सगळीकडे शोभिवंत, टुमदार बंगले. निगुतीने राखलेली रंगीबेरंगी फुले, झोपाळे ,छोटी कारंजी व निवांत लोक. तलावांशी पोचणाऱ्या शांत स्वच्छ वाटा! विसर्जनाच्या वेळी बाप्पांना घातलेले सर्व वस्त्रालंकार, फुले घरीच उतरवून, छानपैकी मॅक्झीमा गाडीतून  श्री गणेशांसह सिडार लेकवर गेलो  आणि अभिषेकाच्या ‘नर्मदा’ गणेशासह शांतपणे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे एक प्रकारच्या हुरहुरीने, समाधानाने मन भरून आले.

दोन दिवसांनी सॅनहोजेला आमच्या  भाच्याकडे गेलो. तिथेही सनीवेल  इथे साजरा होणारा गणेशोत्सव पहायला मिळाला. गणेश चतुर्थीला श्रींची प्रतिष्ठापना, पूजा आरती यथासांग करतात. पेणहून खास मूर्ती नेली जाते. सर्वांना सोयीचे जावे म्हणून गणपतीत येणाऱ्या  शनिवार-रविवारी भरपूर कार्यक्रम ठेवले जातात. आम्ही गेलो तेंव्हा रविवारी सर्वांसाठी मोदकांचे साग्रसंगीत जेवण होते. आधीच  नोंदणी केलेले लेंगे-झब्बे–त्यावर जाकिटे किंवा रंगीबेरंगी उपरणी घालून लहान मोठे सारे पुरुष हजर होते. बायका ठेवणीतले शालू पैठणी नेसून, नटून सजून उत्साहाने वावरत होत्या. लहान मुलांनी सादर केलेले श्लोक ,नाच-गाणी असा कार्यक्रम चालला होता, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. रांगोळ्या, समया आणि फुलांच्या आराशीत गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान होती. अगदी आपल्यासारखीच  थोडी गडबड आणि गोंधळ होताच. क्षणभर आपण अमेरिकेत आहोत की भारतात असा संभ्रम पडला.  आपली तरुण हुशार पिढी स्वकर्तृत्वाने, कष्ट करून या परदेशात उभी आहे–उत्साहाने आपले उत्सव साजरे करून मनातले काही टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून कौतुक वाटले — आणि प्रकर्षाने जाणवले की —-श्री ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला ‘विश्वात्मक देव’ इथे आपल्या देशात काय आणि सातासमुद्रापलिकडे काय —एकच !— त्यामागची मनातली भावना महत्त्वाची !

 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments