श्री विश्वास देशपांडे

??

☆ फुले वेचिता बहरू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळियांसी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली!

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध…! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे!

आपण अनेकदा देण्यात थांबतो. आता पुरेसे दिले, आता माझा वाटा संपला असे म्हणत. पण निसर्ग मात्र कधी थकत नाही. फुले वेचली तरी तो पुन्हा बहरतो. झाडावरून फुले काढली, तरी ते रुसत नाही; उलट नव्या कळ्यांना उमलण्याची संधी देते. देताना त्याला अपेक्षा नसते. नाही मोबदल्याची, नाही कौतुकाची. त्याशिवाय ते हातचं राखून देत नाही. आपली ओंजळ अपुरी पडते.

कुंदाला वास नसतो, असे आपण म्हणतो. पण खरंच नसतो का? की आपण वासाच्या शोधात असताना सौंदर्य पाहायचे विसरतो? शुभ्र पाकळ्या, नितळ रूप, साधेपणा—हे सारे पाहिले की मन आपोआप प्रसन्न होते. देवाला वाहिले तरी तो प्रश्न करत नाही, “ मला सुगंध का नाही? ” गजऱ्यात गुंफले, हार केला तरी फुले आढेवेढे घेत नाहीत. केवढी ही स्थितप्रज्ञता! हे शिकायला गीताच वाचली पाहिजे असे काही नाही. निसर्ग आपल्याला त्याच्या कृतीतूनही शिकवत असतो.

कुंदाच्या फुलांना त्यांच्या अस्तित्वातच समाधान असते. त्यांनी आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलेले असते. मोगऱ्याच्या फुलांसारखा आपल्याला वास नाही म्हणून ते स्वतःला दुःखी करून घेत नाहीत. ते प्रसन्नच असतात नेहमी आणि त्यांच्याकडे मन भरून पाहणारा देखील प्रसन्न होतो. या फुलांकडून आपल्यालाही शिकायला मिळते. आपल्यात असलेले गुण, सौंदर्य, सामर्थ्य हे दाखवण्यासाठी गाजावाजा कुठे आवश्यक असतो? सुगंध नसला तरी चालतो, रूप नितळ असेल तर पुरेसे आहे. कुणी देवासाठी वापरले, कुणी सजावटीसाठी… फुलांचे काही म्हणणे नसते; आपण मात्र लगेच माझा वापर कसा केला गेला याचा हिशेब मांडायला लागतो.

कुंदाच्या झाडाकडे पाहताना वाटते, आपणही असेच असावे. कुणी आपल्याकडून घेतले तरी न रुसता पुन्हा पुन्हा द्यावे. कौतुक न झाले तरी बहरणारे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो; आपण त्यातून प्रसन्नता घ्यायची की आपल्याच दुःखाला कवटाळून बसायचं हा आपला प्रश्न आहे.

अंगणातले ते शुभ्र चांदणे संध्याकाळपर्यंत मनात साठवून ठेवले. फुले सुकतील, गजरे विस्कटतील; पण त्या फुलांनी दिलेली शांती, प्रसन्नता मात्र टिकून राहील. आणि ती टिकवून ठेवणे आपल्यावर असते. आपलं आयुष्यही असंच असतं ना! थोडे देणे, थोडे बहरणे आणि उरलेल्या कळ्यांसाठी जागा ठेवणे!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments