श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ “शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…
“गुढीपाडवा शुभेच्छा”
आज मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे, म्हणजे शालिवाहन शके १९४८ चा पहिला दिवस चैत्र शु १.
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
गुढी पाडव्याला मराठी नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो.
.. .. .. पण ज्यांना आपण शुभेच्छा दिल्या त्यांचे पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून संपूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.
ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा शुभेच्छांचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता वर्षभर काहीतरी करत रहायला पाहिजे.
आपण स्वतः जर वर्षभर आनंदी असलो तरच आपण इतरांना वर्षभर आनंद देऊ शकतो. आणि त्याकरता खालील सोपे सोपे बदल आपण स्वतःमधे करायचे आहेत –
मला जर कायम आनंदी राहायचे असेल तर हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे. ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, आध्यात्मिक गुरूंनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हे असे आहे – —
- १) रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –
- २५ मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’ टू घरगुती वाद / नकारात्मक चर्चा. रमतगमत चालणे – नो वे ! स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे.
- १५ मिनिटे प्राणायाम -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम, ५ मिनिटे दीर्घ श्वसन, ५ मिनिटे ओंकार जाप.
- १० मिनिटे ध्यान : विचारशून्य अवस्थेमधे बसणे
- १० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.
आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का ? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.
२) कळते पण वळत नाही —
‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’, ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं. ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.
३) आलिया भोगासी असावे सादरं – चित्ती असू द्यावे समाधान —
ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो.
अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू शकतं, की, आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा आपल्याला घोडदौड सुरु करता येते.
४) संवाद —
घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.
एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.
५) कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-
रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं ? त्यानी असं कां केलं ? हा असं कां वागतो ? वगैरे, काथ्याकूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो. स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता – इतरांचा नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे.
६) वर्तमानकाळात रहा —
आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच आनंदी राहण्याची महाऔषधी आहे.
७) कायम आनंदी चेहेरा —
कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो ?
आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.
– – – मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.
चला तर मग – यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण “ठोस” बनायचे आहे.
नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा ! ! !
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदानी आणि उत्साहानी भरलेले असो, आणि मंगलमय असो.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





