शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ वयाचा धाक आणि आदर… ☆ शीला पतकी ☆
☆
आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषता महाराष्ट्रात वय वाढलेल्या व्यक्तींबद्दल प्रथमपासूनच आदर दाखवला जातो वयाने वाढलेल्या माणसांचा आपण मानसन्मान ठेवतो घरात सुद्धा पूर्वी मोठ्या माणसांसमोर बसून कोणी बोलत नव्हते. मोठी माणसे घरात आली की लहान मुलं सुद्धा पटकन उठून उभे रहात. मोठ्या माणसासमोर लोळत पडणे.. अशा गोष्टी होत नव्हत्या! बोलताना एक आदर होता मोठ्या भाऊ बहिणीला मान होता आणि त्यांच्या वयाचाही आपण आदर करत होतो. यामागे घरात असणारे छान संस्कार होते!
घरातच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करायचो ते कार्यालय, शाळा, कचेऱ्या, व्यवसाय या ठिकाणी सुद्धा आपल्यापेक्षा वरिष्ठांना मान देण्याची पद्धत होती आणि आजही आहे. सिनिऑरिटी हा सन्मानाचा मुद्दा मानला जातो. आजही आम्ही शाळेत गेलो होतो तर सर्व ज्युनिअर शिक्षक वाकून नमस्कार करतात. शिक्षकी पेशामध्ये तर विद्यार्थी अगदी रस्त्यात भेटला आणि तो त्याच्या क्षेत्रात कितीही मोठा असला तरी तो पटकन वाकून नमस्कार करतो हा अनुभव आहे. या कृतीमध्ये नमस्कार करणाऱ्यांचा मोठेपणा दिसतो. त्यांच्यामध्येआपल्या प्रति आदर भाव आहे हे लक्षात येतं. पण काही वेळा ज्यांना आपण आदर देतो, मान ठेवतो ती माणसे आपल्या वयाचा धाक दाखवायला लागतात. आमच्या पुढे येणाऱे आमचे विद्यार्थी आमच्यापेक्षा प्रचंड हुशार असतात. त्यांनी निवडलेली क्षेत्र त्या ठिकाणी ते करीत असलेले काम हे स्पृहणीय असते. त्या मानाने आमचे शिक्षण तोकडे असते. पण त्यांच्याजवळ त्यांच्या पदाचा हुशारीचा शिक्षणाचा किंचितही गर्व नसतो. आणि नमस्कार करून घेणार माणूस उगाचच त्याला काहीतरी दोन गोष्टी कधी कधी ऐकतो सुद्धा.
अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या धाकट्या भावंडाना आपल्या वयाचा धाक घालतो. माझे एक ओळखीतले गृहस्थ आहेत वयाने मोठे आहेत. लोकात सन्माननीय. त्यांना अनेक ठिकाणी बोलवतात पण दरवेळी त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. लोकांनी त्यांना येऊन घेऊन जावं आणून पोहोचवावं. त्यांची दखल घ्यावी. हे काही कारणाने काही वेळेला होत नाही मग ते घरी बोलावून कान उघडणी करतात.
सासवा सूनामध्ये नेमकं हेच घडतं सासूचा सदैव धाक आणि सातत्याने “आम्ही नाही असं केलं, आम्ही नाही तसं केलं. “… बदलत्या परिस्थितीच भान ठेवायला पाहिजे असं मला वाटते बरेच जण इतरांना टॉर्चर करत असतात आणि या धाकामुळे संबंध बिघडतात.
एका घरातला किस्सा आहे. मोठा भाऊ फारसा काही शिकलेला नाही कदाचित त्याच्यावरती जबाबदार्या असतील. धाकटी भावंडं हुशार निघाली त्यांना समाजात मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, पैसा मिळाला, पण हा माणूस जिथे तिथे त्यांना ऐकवायचा ” गप्प काही सांगू नकोस तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी “किंवा “उगीच नाही आमचे केस पांढरे झाले शिकला म्हणजे मोठा झालास का “.. असे सदैव ऐकवत असे भावंडे बिचारी मोठा भाऊ आहे त्याचा मान ठेवण्यासाठी त्याच्या धाकात होती पण हे अनेक वेळा घडल्यावर वयाने लहान असलेला पण कर्तुत्वान असलेला धाकटा भाऊ म्हणाला, “दादा तू पावसाळे खूप पाहिले पण ते सगळे दुष्काळी होते रे त्या दुष्काळी पावसाळ्यात पाऊस पडला नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही उगवलं नाही कुठल्या गोष्टीची पेरणी झाली नाही नव्याने काही घडलच नाही नव्या विचारांचे कुठले अंकुर फुटले नाहीत अशा नुसत्या दुष्काळी पावसाळ्याचा उपयोग काय? आणि केस पांढरे म्हणशील तर आता ते तरुण मुलांचे सुद्धा होत आहेत त्याचा वयाचा आणि अनुभवाचा संबंधच राहिला नाही”… त्यांच्यातले नातेसंबंध दुरावले गेले. कारण धाकामुळे मान देत असलेली भावंड स्वतःच्या किरकिरी मुळे एक दिवस बोलून बसली आणि मग ते टोचले मला वाटतं वयस्कर माणसाकडून ही होणारी मोठी चूक आहे.
केवळ वय वाढलं, आपले अनुभव काही वेगळे आहेत म्हणून दरवेळी आपण आदरणीय ठरतो असं असण्याचा काहीच कारण नाही. जग इतक्या झपाटाने बदलतय पिढीची भाषा बदलतीये, कौशल्य बदलताय, शिक्षण पद्धती बदलतीये,… अफाट हुशार मुलं आहेत. त्यांचे अनुभवही सुंदर आहेत ते खर तर आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि दोन पिढीतील ही समज वाढली तर नातेसंबंध हे उत्तम होतील आणि मग उगाचच वयाचा आणि अनुभवाचा धाक कोणाला घालवा लागणार नाही.
काल सहज फोनवर बोलताना माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या अनुभवावर मी विचार केला आणि पटलं, *पावसाळ्यावर काही अवलंबून नसतं ते दुष्काळी असता कामा नयेत त्या अनुभवात आपल्याला काही रुजवता आलं पाहिजे काही उगवता आलं पाहिजे तर आपल आयुष्य समृद्ध आणि हिरवं होऊन जातं आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आपण हिरवळ आणू शकतो* काल मला जगण्याचा छान मंत्र मिळाला. वाचा पटलं तर घ्या नाहीतर धाक दाखवा.
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




