मंजुषा सुनीत मुळे
☆ “‘तो‘ अविस्मरणीय ‘बालदिन‘…” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
१४ नोव्हेंबर.. बालदिन..
२०२५ साली प्रत्यक्ष अनुभवलेला ‘तो एक अनोखा बालदिन‘ मी कधीच विसरू शकणार नाही.
त्या दिवशी कुतुहलापोटी मी अगदी उत्साहाने त्या कार्यक्रमाला गेले होते… फार तर पन्नास-एक मुलंमुली असतील तिथे… वयोगट ३ वर्षे ते १३-१४ वर्षे. आज त्या मुलांसाठी तिथे एक ‘ बबल शो ‘ आयोजित केलेला होता. साबणाच्या पाण्याचे फुगे.. त्यांचे वेगवेगळे आणि मोठाले आकार फक्त फुंकर मारत तयार करण्याचे ते कसब मीही पहिल्यांदाच बघत होते. मुलं तर खूपच excited झालेली होती. हा खेळ सादर करणारी ती एक स्मार्ट मुलगी अतिशय सफाईदारपणे आणि मुलं खुश होतीलच असे वेगवेगळ्या आकाराचे फुगे कौशल्याने हवेत सोडत होती. ज्यांना शक्य होतं ती मुलं उड्या मारून मारून ते फुगे हातात पकडण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे ज्यांना जमत नव्हतं अशी काही मुलं हाताचे पंजे जवळ आणून टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करत होती. आणि विशेष म्हणजे त्यावेळी तो प्रयत्न अजिबात ‘केविलवाणा’ म्हणावासा वाटत नव्हता – – आश्चर्य – कुतूहल – आणि ‘ काय चाललंय कळतच नाहीये ‘.. असे विविध भाव मुलांच्या चेहेऱ्यावर दिसत होते… पण एक निरागस निर्मळ आनंद मात्र जणू तिथल्या वातावरणातच दरवळत होता… हे सगळं बघतांना मलाही नकळत लहान झाल्यासारखं वाटत होतं.
… त्या मुलीचा कार्यक्रम संपला. मग त्यातल्याच एका मुलाने न घाबरता सहज बोलावे तसे ३ – ४ वाक्यात आभार मानले… आणि मग केक कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
एका टेबलावर मोठे दोन केक आणि बऱ्याच लाकडी सुऱ्या ठेवल्या गेल्या. टेबलापाशी येऊ न शकणारी किंवा काही लाजाळू मुलं सोडून इतर बरीच मुलं टेबलाभोवती दाटीवाटीने उभी राहिली. मग त्या सगळ्यांना एक एक सुरी दिली गेली आणि त्यांच्या हस्ते घाईघाईने केक कापणे सुरू झाले.. अर्थात मुलांना अजिबात न रागावता शांतपणे आणि प्रेमाने त्यांना कंट्रोल करणाऱ्या ४ -५ तरतरीत तरुणी तो केक जास्तीत जास्त व्यवस्थित कापला जाईल याची काळजी घेत होत्या… आणि मग त्यांनी स्वतःच्या हाताने तिथल्या प्रत्येक मुलाला केक भरवला. त्या सगळ्या ‘तायांना’ केक भरवण्यासाठी मुलांचीही मनापासून गडबड चालू होती… फार मस्त वाटत होतं ते सगळं भाबडं दृश्य बघतांना.
आता तो दुसरा केक कुणासाठी असावा हा विचार करत असतांनाच त्या ४ – ५ जणी तो केक आणि सुरी घेऊन आमच्या मागच्या बाजूला असलेल्या खुर्च्यांकडे गेल्या. मी मागे वळून पाहिले आणि खरोखरच स्तंभित झाले. त्या खुर्च्यांवरही काही मुलेच बसलेली तिथे गेल्यागेल्याच दिसली होती.. पण आत्ता लक्षात आलं की त्या सगळ्या व्हीलचेअर्स होत्या आणि त्यावर ‘बसवलेली’ मुलं.. काही पूर्णपणे physically disabled. काही mentally disabled. तर काही दोन्ही दृष्ट्या… अशी मुलं होती ती. त्या तरुणी प्रत्येकाजवळ जात होत्या. दोघीजणी केकचा ट्रे त्यांच्यासमोर धरत होत्या. आणि एकजण त्या मुलांनी स्वतःच्या हातात सुरी धरावी याचा प्रयत्न करत होती.. ते जमत मात्र नव्हतं. मग अखेर ती मुलगी त्या मुलाचा हात आणि सुरी दोन्ही स्वतःच्या हातात धरून जमेल तसा तो केक कापण्याचं ‘फील’ त्यांना देण्याचा प्रयत्न करत होत्या.. आणि मग स्वतःच त्यांना केक भरवत होत्या.. पण त्यातल्या बहुतेक मुलांना
ते फील जाणवत तरी होतं का हा प्रश्न मला पडला होता … कारण काही मुलांच्या चेहेऱ्यावर पुसटसं हास्य.. बहुतेक जन्मतःच असलेलं.. की सवयीचं? की आपण काहीतरी केलं या आनंदाचं? .. देवच जाणे.. आणि काहींचे चेहरे मात्र पूर्ण निर्विकार.. माझं गलबललेलं मन डोळ्यातून वाहू लागलं…
पण त्या तरुणी.. त्या मात्र अगदी शांत आणि प्रसन्न चेहऱ्याने हे सगळं करत होत्या. कमालीचं कौतुक दाटून आलं होतं माझ्या मनात.. त्या तरुणींबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या त्या संस्थेबद्दलही.
… ‘बाल’ आणि ‘दिन’ या दोन्ही शब्दांचा अर्थही बहुदा माहीतच नसावा अशा त्या अजाण मुलांच्या चेहेऱ्यावर आणि मनातही आनंदाची उधळण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारी ही संस्था आहे..
“सोफोश“ – (Society of Freinds of Sasoon Hospital).
– – ही संस्था. MSW ही पदवी प्राप्त केलेल्या त्या ‘शब्दशः’ सेवाभावी तरुणी. आणि प्रत्येक मुलामागे एक एक caretaker स्त्री – – सगळेच खरं तर माननीय… या सगळ्यांचे आभार कसे मानावेत हेच तेव्हा कळत नव्हतं… पण “ समाजसेवाभावी “ या शब्दाचा खरा अर्थ मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभवत होते.
निराधार – निराश्रित मुलांना इतक्या मायेने सांभाळणारी सोफोशची एक शाखा म्हणजे “ श्रीवत्स “ हे शिशुगृह. १ दिवस ते ६ वर्षं या वयोगटातली मुलं इथे ‘अनाथाश्रमात’ म्हणून आणली जात नाहीत. तर खरोखरच त्यांचा कळवळ्याने सांभाळ करण्यासाठी आणली जातात आणि खरोखरच मायेने सांभाळली जातात. “ Tara Child-care Centre (for differently able children) ही सोफोशचीच आणखी एक संस्था.. जिथे ६ वर्षांच्या पुढची दिव्यांग मुलं अगदी काळजीपूर्वक सांभाळली जातात.
खरं तर या “ सोफोश “ बद्दल आणखी खूपच काही सांगायला हवे.. ते पुन्हा कधीतरी…
… पण आज त्यांचे हे काम प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर. संत तुकारामांना अभिप्रेत असणारी – –
“ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती।। “..
… ती नक्कीच अशी असणार असे मनोमन वाटले.
… त्या दिवशी श्रीवत्स संस्थेतली लहानगी मुलंही खास या कार्यक्रमासाठी खास बस करून ‘तारा’ मध्ये अगदी काळजीपूर्वक आणली गेली होती हेही फार विशेष वाटलं.
या कार्यक्रमात आणखी एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली आणि मनावर ठसली…
एरवी अशा कुठल्याही कार्यक्रमाचे कुणीतरी अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे असतात… मुलांच्या डोक्या-
-वरूनच जाईल असं ‘भाषण’ करतात. बक्षीस-वाटप वगैरे करतात.. आणि अलिप्तपणे निघून जातात.
.. पण इथल्या कार्यक्रमात मात्र या सगळ्याचा संपूर्ण अभाव होता.. ना कुठेही कसलाही बॅनर.. ना स्टेज.. ना अध्यक्षांसाठी विशेष अशी खुर्ची.. ना कुणाचा फोटो. – होते फक्त ‘बाल’ आणि त्यांचे caretaker.
अर्थात एक अपवाद होता.. म्हणजे तिथे अध्यक्ष तर हजर होते.. पण या कार्यक्रमाचे नाहीत.. तर
‘सोफोश‘ या संस्थेचेच अध्यक्ष.. श्री. सचिन अभ्यंकर.. सोफोशव्यतिरिक्त स्वतःच्या व्यवसायासोबतच इतर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळणारे हे उच्चशिक्षित अध्यक्ष स्वतः जातीने या कार्यक्रमाला हजर होते..
‘आपल्यामुळे मुलं ताटकळायला.. कंटाळायला नकोत‘ म्हणून ते वेळेआधीच हजर होते… अगदी नित्याच्या साध्या आणि मुलांना परिचित असलेल्या कपड्यात.. आले आणि सरळ तिथे अंथरलेल्या सतरंजीवर मांडी ठोकून बसले.. आणि लगेचच ५-६ मुलं येऊन त्यांना चिकटली.. तिघं चौघं दाटीवाटीने त्यांच्या मांडीवर.. काही पाठीशी लोंबकळणारी.. एक अगदी लहानगी तर कडेवरच — खरं सांगते.. जणू एक ‘लेकुरवाळा विठू’च बघितला मी त्या दिवशी… एवढ्या नामांकित संस्थेचे ‘अध्यक्ष’ असे असू शकतात? फार आश्चर्य आणि त्याहूनही जास्त कौतुक दाटून आलं होतं मनात!!
कार्यक्रम संपला आणि आम्ही.. म्हणजे मी आणि अध्यक्ष परत जायला निघालो (तिथे बाहेरची म्हणावी अशी मी एकटीच होते ना..) – – आणि आणखी एक गोष्ट मनाला प्रकर्षाने जाणवली – –
आमच्या मागोमाग ५-६ मुलं आली आणि त्या अध्यक्षांना.. म्हणजे त्यांच्या लाडक्या काकांना अडवून म्हणू लागली – – “ काका जाऊ नका ना.. आज तुम्ही इथेच आमच्याबरोबर जेवायला थांबा.”
“काका पुढच्या रविवारी आपल्याला चिकन खायचंय.. कबूल केलंय हं तुम्ही..“
“काका माझी सायकल पंक्चर झालीये.. तो दादा दुरुस्त करून देतच नाहीये.. तुम्ही रागवा ना त्याला“
“काका माझं पेन चालतच नाहीये.. माझ्यासाठी नवं पेन आणा..“
… आणि अशाच काही तक्रारी. मागण्या.. आणि हट्ट.
– – त्या प्रत्येक हट्टागणिक मला जाणवत होती ती प्रत्येक मुलाला नैसर्गिकपणे असणारी एका “ fatherly figure “ ची गरज. आईच्या मायेने काळजी घेणाऱ्या स्त्री caretaker तर होत्याच तिथे.. अगदी प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र अशी… पण वडील? ते मात्र ‘ कळवळ्याच्याच जातीच्या’ त्या अध्यक्षांमध्येच शोधत होते सगळे.. नव्हे.. त्यांना तोपर्यंत कधीच न भेटलेलं ते एक अनामिक नातं त्यांच्याही नकळत शोधत होते.. ‘वडील ‘ हे लेबलही माहिती नसतांना. मनात आलं एकाच वेळी किती दुर्दैवी होती ती सगळी मुलं.. आणि नक्कीच जराशी सुदैवीही.. कारण इथे त्यांना ‘वडील’ हे निनावी नातं आणि आईही त्यांच्याही नकळत अनुभवायला मिळत होती.
.. आणि मी?? तोपर्यंत न अनुभवलेल्या असंख्य भावना आणि विचार यांनी कल्लोळलेलं मन कसंतरी आवरत मी तिथून बाहेर पडले.. पण मला अनुभवसंपन्न करणाऱ्या त्या अनोख्या ‘बालदिनाचा’ ठसा मात्र मनावरून कधीच पुसला जाणार नाही हे नक्की.
आणि हो.. तिथे अनुभवलेली आणखी एक गोष्ट शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये – –
– – दत्तक विधानासंदर्भातले सर्व कायदे आणि नियम यांच्या चौकटीत बसत असल्याची अगदी काटेकोरपणे पूर्ण दक्षता घेऊन इथली.. विशेषत: श्रीवत्स संस्थेतली मुलं दत्तक देण्याचे कामही या संस्थेमार्फत केले जाते. त्या दिवशीही नियमानुसार मूल दत्तक घेण्यासाठी पात्र ठरलेले एक जोडपे तिथे आले होते. ते ज्याला दत्तक घेऊ शकत होते तो एक छोटा मुलगाही त्या कार्यक्रमासाठी तिथे आलेला होता. आणि त्याला प्रत्यक्ष बघायला ते दोघे आज तिथे आलेले होते… आणि माझ्या मनात नकळत त्यांच्या चेहेऱ्यावरचे बदलते भाव टिपले जात होते — —
दोघेही लांबूनच पण खूप मनापासून त्या मुलाला न्याहाळत होते.
“आता यापुढे हा आमचा मुलगा असणार “ ही आनंदाची.. समाधानाची आणि सुखावणारी भावना त्यांच्या डोळ्यात लकाकत असल्याचे स्पष्ट जाणवत होते..
..आणि मग मीही एका अनामिक समाधानाने भारावून जाऊनच तिथून बाहेर पडले..
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






