श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३१ आणि १३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १३१ – – –
भजावा जनीं पाहता राम येकु ।
करी बाण येकु मुखी शब्द येकु ।
क्रिया पाहता उधरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकु ।।१३१।।
अर्थ : समस्त जगामध्ये भक्ती करण्यायोग्य श्रीरामासारखे दुसरे दैवत नाही. एकबाणी आणि एकवचनी असा असलेला हा श्रीराम आहे. त्याच्या चरित्राचे नीट अवलोकन किंवा अनुसरण केले तर सर्व लोकांचा उद्धार होतो. अशा श्रीरामांचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवावा.
विवेचन : श्रीरामाच्या गुणांची महती स्पष्ट करणारा हा अतिशय सुंदर श्लोक आहे. श्रीराम हे समर्थांचे उपास्य दैवत. त्या दैवताची महती समर्थ वेगवेगळ्या प्रकारे गात आहेत. श्रीरामाची उपासना किंवा भक्ती जगामध्ये सर्वश्रेष्ठ कशी हे सांगताना समर्थ म्हणतात की तो एकबाणी आहे. एकबाणी या शब्दाचा अर्थ त्याने एकदा धनुष्यावर बाण चढवला की त्याचा नेम चुकत नाही. त्यावरूनच एखादी गोष्ट/एखादा उपाय जर अचूकपणे काम करत असेल तर आपण त्यासाठी ‘ रामबाण ‘ हा शब्द वापरतो. परंतु रामाच्या ‘ एकबाणी ‘ या विशेषणाचा अर्थ अजून जर व्यापकपणे घ्यायचा तर तो अचूक निर्णय घेणारा आहे. त्याचा निर्णय आणि निश्चय दोन्ही गोष्टी अचूक आणि अपरिवर्तनीय आहेत.
त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो एकवचनी आहे. एकदा जे शब्द उच्चारले ते खरेच होणार! एकदा जे वचन दिले ते पाळणार. त्यात कालत्रयीही बदल नाही. रामाचा जन्म ज्या कुळात झाला. त्याची रीतच अशी होती. ” रघुकुल रीत सदा चली आयी. प्राण जाय पर वचन न जाई. ” रामाने हे ब्रीद कटाक्षाने पाळले आहे. आपल्या पित्याला दिलेले वचन. आपल्या मित्रांना दिलेले वचन त्याने प्राणांचे मोल देऊनही पाळले आहे. राम वनवासात असताना जेव्हा भरत त्याला परत घेऊन जाण्यासाठी आला तेव्हा प्रजेच्या आग्रहाखातर आलो म्हणून तो पुन्हा राज्यकर्ता होऊ शकला असता. तेव्हा एक राज्यकर्ता म्हणून देखील त्याचे चरित्र आदर्श आहे. ” मी असे बोललोच नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता” असे बोलून शब्द फिरवण्याची वेळ त्याच्यावर कधी आली नाही.
राम एकबाणी. एकवचनी होता तसाच एकपत्नी होता. सीतेवर त्याचे अपरंपार प्रेम होते. त्याने सीतेचा त्याग केला म्हणून त्याच्यावर टीका करणारे लोक ही दुसरी बाजू पाहत नाहीत. सीतेचा त्याग केल्यानंतरही त्याने दुसरा विवाह केला नाही. अश्वमेध यज्ञाच्या वेळी वसिष्ठांनी त्याला अशा वेळी दुसरे लग्न करता येते असे सांगितले होते. त्यावेळी एकापेक्षा अधिक विवाह करण्याची प्रथा होती. दशरथ राजाचेच तीन विवाह झाले होते. तरी देखील रामाने दुसरा विवाह केला नाही. एका सीतेशिवाय तो दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नव्हता. म्हणूनच समर्थ म्हणतात की त्याच्या चरित्राचे अवलोकन करावे. कारण सर्व दृष्टींनी अनुकरण करण्यासाठी रामाचे चरित्र आदर्श आहे. ज्यांनी ज्यांनी रामाची भक्ती केली. त्यांचा उद्धार झाला.
शेवटच्या ओळीत समर्थ धरा ‘ जानकीनायकाचा विवेकु ‘ असे आपल्याला सांगतात. रामाचा विवेक घेणे म्हणजे आदर्श म्हणून रामाची निवड करणे. त्याचा विवेक करणे म्हणजे रामाने जसे बोलण्याप्रमाणे आपले आचरण ठेवले तसे आपणही ठेवावे. केवळ त्याचे चरित्र वाचणे. गुणगान करणे. त्याची परमेश्वर म्हणून पूजा करणे यापेक्षाही त्याच्या गुणांची पूजा बांधणे. ते गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
स्वसंवाद
१. श्रीरामांप्रमाणे मी ‘एकवचनी’ आहे का? मी दिलेला शब्द किंवा घेतलेला निर्णय प्रामाणिकपणे पाळतो. की स्वार्थासाठी “माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता” असे म्हणून सोयीस्करपणे शब्द फिरवतो?
२. आजच्या अस्थिर आणि प्रलोभनांनी भरलेल्या जगात. माझ्या जोडीदाराप्रती माझा नितांत आदर आणि ‘एकपत्नी / एकनिष्ठ’ असण्याचे व्रत अबाधित आहे का?
३. श्रीरामांनी ‘एकबाणी’ राहून जसे आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडले. तशी अचूकता आणि कामावरची निष्ठा माझ्या कृतीत कधी दिसते का?
४. मी केवळ देवघरात रामाची पूजा करण्यातच धन्यता मानतो. की ‘जानकीनायकाचा विवेक’ धारण करून त्यांचे सद्गुण माझ्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो?
=====
श्लोक क्र. १३२ – – –
विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त ते ही निवाले ।
बरे शोधिल्यावीण बोलो नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।१३२।।
अर्थ : जी व्यक्ती बोलताना नेहमी विचार करून बोलते आणि आपले वर्तन विवेकपूर्ण ठेवते अशा व्यक्तींचा सहवास लाभल्यानंतर संसारात तापाने किंवा दुःखाने पोळलेली माणसे देखील शांत आणि समाधानी होतात. बोलताना आपण सर्व बाजुंनी विचार केल्याशिवाय बोलू नये. लोकांमध्ये वावरताना आपले वागणे बोलणे शुद्ध आणि विवेकपूर्ण हवे.
(विचारूनि – विचारपूर्वक. विवंचूनि – मागचा पुढचा विचार करून/विवेकाने. नेमस्त – शिस्तबद्ध)
विवेचन : आजच्या भाषेत सांगायचे तर समर्थ हे मॅनेजमेंट गुरू आहेत. त्यांचा हा श्लोक पाहिला तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. जीवनात ज्यांना आपली प्रगती साधायची आहे. ध्येय गाठायचे आहे अशा सर्वच लोकांसाठी हा श्लोक मार्गदर्शक आहे. जीवनात कसे वागावे हे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. सर्वसामान्य माणूस बऱ्याच वेळा विचार न करता बोलतो. परंतु समर्थ म्हणतात की बोलताना आपण साधक बाधक विचार करून बोलले पाहिजे. आपल्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे सुटलेल्या बाणासारखे असतात. ते परत घेता येत नाहीत. त्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतात. म्हणून विचारपूर्वक बोलले पाहिजे म्हणजे पश्चात्तापाची वेळ येत नाही. आजकाल समाजमाध्यमांवर विचार न करता लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. अभ्यासपूर्ण बोलण्याऐवजी भडक लिहिणाऱ्या बोलणाऱ्यांची चलती आहे. समाजाची नैतिक पातळी घसरताना दिसते आहे. वागण्याबोलण्यातील विवेक हरवताना दिसतो आहे. म्हणूनच समर्थांचा उपदेश आज कधी नव्हे तो जास्त मोलाचा आहे. ‘ अभ्यासोनि प्रकटावे ‘ असे समर्थांनी दासबोधात जे सांगितले आहे त्याचा अर्थ हाच आहे.
आजच्या धावपळीच्या जगात जो तो विविध प्रकारच्या तापांनी किंवा दुःखाने त्रस्त आहे. कोणीतरी दोन प्रेमाचे शब्द बोलले की त्याला बरे वाटते. जी माणसे समर्थांनी सांगितल्यानुसार विचारपूर्वक वागतात आणि बोलतात अशा माणसांचा सहवास लाभला तर दुःखी आणि त्रस्त जीवांना बरे वाटते. त्यांच्याशी बोलून समाधान वाटते. समाजमाध्यमांवर विचार न करता व्यक्त होणारी माणसे पाहिली की समर्थांनी जे ‘ बरे शोधिल्यावीण बोलो नको हो ‘ हे किती मह्त्वाचे आहे हे पटते. सभांमध्ये उथळपणे विचार मांडणारे नेते. एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते. त्यांच्या विचारांना प्रसिद्धी देणारी प्रसिद्धीमाध्यमे या सर्व गोष्टी पाहिल्या की समाजाची नैतिक आणि वैचारिक अधोगती होत आहे असे दिसते.
लोकमान्य टिळक. स्वा. सावरकर. प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्रा. राम शेवाळकर आदींची भाषणे पाहिली तर त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष पटते. असे खरोखर ‘ अभ्यासोनि प्रकटणारे ‘ वक्ते आणि नेते आज अभावानेच आढळतात. म्हणूनच वागणे बोलणे हे ‘ नेमस्त ‘ म्हणजे शिस्तबद्ध असावे. चारित्र्य शुद्ध असावे तरच जनमानसावर प्रभाव पडू शकेल. समर्थांचा हा उपदेश जीवनात किंवा अध्यात्मात कोणालाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्वसंवाद
१. समाजमाध्यमांवर (Social Media) किंवा प्रत्यक्ष जीवनात व्यक्त होताना मी ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या नियमाचे पालन करतो. की केवळ भावनेच्या भरात विचार न करता उथळ बडबड करतो?
२. माझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांमुळे संसारात तापलेल्या किंवा दुःखी माणसांना ‘शांतता आणि समाधान’ मिळते. की माझ्या बोलण्याने त्यांचा त्रास अधिक वाढतो?
३. माझ्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना माझे चारित्र्य आणि आचरण खरोखरच ‘शुद्ध आणि नेमस्त’ (शिस्तबद्ध) आहे का?
४. भूतकाळातील थोर विचारवंत आणि वक्त्यांचा आदर्श समोर ठेवून. मी बोलण्याआधी ‘साधक-बाधक विचार’ करण्याची सवय स्वतःला लावून घेतली आहे का?
– क्रमशः श्लोक १३१ आणि १३२
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







