कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
✈️ मी प्रवासी ✈️
☆ “ओह मॅन ! …” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जायचे होतेच. ओमान देशामधे एक-दोन दशके नोकरी-व्यवसायानिमित्त राहिलेल्या काही व्यक्तींकडून त्या देशाबद्दल आम्हाला खूपच चांगले ऐकायला मिळाले होते. त्यामुळे तो देश पाहायची इच्छा झाली होती. पूर्वी फार काही ऐकले-वाचले नसले तरी मस्कती डाळिंबाचे नाव तेवढे लहानपणापासून ऐकून होतो.
माझ्या पत्नीचा धाकटा भाऊ गिरीश, त्याची पत्नी प्राची, मुलगी दीपशिखा, आणि मुलगा-सून म्हणजे देवाशीष-आकांक्षा, असे सर्वजण दिवाळीत ओमानच्याच सफरीवर जायचा बेत ठरवत होते. मग मी, माझी पत्नी सौ. स्वाती, आणि तिचे वडील (दादा) असे तिघे त्यांना सामील झालो.
देशा-परदेशातल्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्या-त्या प्रदेशाची जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. स्वातीला पर्यटनाची आवड असल्याने तीही अनेक पर्यटकांनी बनवलेले व्हिडिओ पाहत असते. ओमानमधल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती तिने काढली. ओमानचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांविषयी मी वाचून काढले.
अरबस्तानच्या आग्नेय टोकाला असलेला ओमान हा तसा एक लहान देश आहे. ओमानच्या ईशान्येकडे ओमानी आखात आणि आग्नेयेला अरबी समुद्र असल्याने त्याला लांबलचक किनारपट्टी लाभली आहे. परंतु किनाऱ्यापासून आत आले की सगळा प्रदेश डोंगराळ आणि वाळवंटी आहे. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे अनेक शतकांपासून भारत, चीन आणि आफ्रिकी देशांसोबत ओमानचे व्यापारी संबंध आहेत.
मुहम्मद पैगंबराच्या हयातीतच ओमानमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार-प्रसार झाला. सुरुवातीला ‘सुन्नी’ इस्लाम मानणारा हा देश सातव्या शतकापासून हळूहळू ‘इबादी’ इस्लामचा अनुयायी झाला. इबादी पंथाचे लोक काहीसे मवाळ असतात आणि ते कट्टरपंथी सुन्नींपेक्षा अधिक सहिष्णु आहेत. इस्लामच्या मूळ शिकवणीशी सर्वाधिक साम्य त्यांच्या पंथाचे आहे असे ते मानतात. गेल्या काही शतकांत भारत, पाकिस्तान, व बांगलादेशातून येऊन ओमानमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी लोकांमुळे इथल्या लोकसंख्येत लक्षणीय बदल झाला आहे. आता इथे सुमारे ४५% इबादी, ४५% सुन्नी आणि उरलेले इतरधर्मीय लोक आहेत.
आमच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. इथले बहुसंख्य धनिक व्यापारी आणि राज्यकर्ते मूळ ओमानी वंशाचे आहेत. परंतु लहान-सहान दुकानदार, हॉटेलांमधले वेटर, पेट्रोल पंपावरचे कर्मचारी, बांधकाम किंवा सुतारकाम करणारे कामगार हे सगळे बाहेरच्या देशातून इथे पोटापाण्यासाठी आलेले आहेत. त्यातले बहुसंख्य लोक भारतीयच आहेत. त्यामुळे, आम्ही जाऊ तिथे खुशाल हिंदीतच संवाद सुरू करायचो आणि समोरून हिंदीतच प्रत्युत्तर येई. आम्हाला इथल्या हॉटेल-रिसॉर्टमध्ये मुख्यत्वे केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील तरुण-तरुणी भेटले.
ओमानच्या राष्ट्रीय संग्रहालयात भेटलेला पुण्याचा ज्ञानेश, सूरच्या हॉटेलातले कोलकात्याचे शॉप्तर्षी चॉक्रोबोर्ती किंवा शौमिता, आणि वहिबा वाळवंटातल्या रिसॉर्टमधली नाशिकचे ईशा, हर्षवर्धन, कुणाल वगैरे मुला-मुलींशी झालेल्या गप्पांवर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
ओमानला आम्ही आमच्या कौटुंबिक सफरीवर निघालो होतो. यात्रा कंपनीसोबत जात नसल्याने सर्व नियोजन आम्हालाच करायचे होते. हॉटेल बुकिंग, प्रेक्षणीय ठिकाणे, तिथे जाण्यासाठी वाहनव्यवस्था, जेवणखाण अशा सर्व बाबींवर आमचा विचारविनिमय झाला होता. विमानतिकिटे आपली आपण काढायची आणि इतर सर्व खर्च सामायिकपणे करायचे हेच आमच्या सगळ्या कौटुंबिक सफरींचे सूत्र असते. त्यानुसार आम्ही मुंबई-मस्कत-मुंबई तिकिटे तीन महिने आधीच काढली होती. पण व्हिसा काढण्यापासून पुढचे सर्व काही आमचा भाचा देवाशीष आणि त्याची पत्नी आकांक्षानेच समर्थपणे पार पाडले.
मुंबईहून अडीच तासांचा विमानप्रवास करून आम्ही स्थानिक वेळेनुसार दुपारी १-१. ३० च्या सुमारास मस्कतला पोचलो. बोशर या मस्कतच्या उपनगरात ‘फ्रेझर स्युईट्स’ नावाच्या एका ‘अपार्ट-हॉटेल’मध्ये आमचे बुकिंग होते. ‘अपार्ट-हॉटेल’ म्हणजे हॉटेलवजा अपार्टमेंट किंवा अपार्टमेंटवजा हॉटेल! अलीकडच्या काळात खूपच लोकप्रिय होऊ लागलेली ही एक छान संकल्पना आहे. यात एकाच ग्रुपमधल्या ४-६-८ लोकांना एकत्र राहायचे असल्यास एक २-३-४ बीएचके अपार्टमेंट मिळू शकते. हॉटेलात मिळणाऱ्या सोयी, म्हणजे रूम सर्व्हिस, कॉंप्लिमेटरी नाश्ता वगैरे सर्व सोयी इथेही असतात.
‘फ्रेझर स्युईट्स’ च्या समोरच एक पांढरीशुभ्र संगमरवरी मशीद होती. विमानतळावरून आम्हाला घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरने पुरवलेल्या माहितीनुसार तिचे नाव ‘मोहम्मद अल अमीन मशीद’ असे होते. ओमानमधल्या ‘बाहवान इंटरनॅशनल’ या सुप्रसिद्ध बिझनेस ग्रुपने ती मशीद बांधलेली असल्याने तिला बाहवान मशीदही म्हटले जाते. ड्रायव्हरने असेही सांगितले की त्या मशिदीच्या घुमटांवर सुंदर नक्शी असून त्या नक्शीला सोनेरी पार्श्वभूमी आहे. शिवाय त्या मशिदीवरचे दिवे लावल्यानंतर तिच्यावर एक हलकी निळसर झाकही दिसते. त्या माहितीचा प्रत्यय मात्र मला दुसऱ्या दिवशी पहाटे आला आणि ते सुंदर दृश्य मी मोबाईलमध्ये कैद करून घेतले.
अपार्टमेंटमध्ये सामान ठेवून आम्ही लगेच मस्कतच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. एका क्रूझवर आमचे बुकिंग केलेले होते. त्या दुमजली बोटीत आमच्यासह देशोदेशीचे एकूण २०-२५ पर्यटक होते. खानपानाची रेलचेल होती. समुद्रकिनाऱ्यालगत प्रवास सुरू असताना एक माणूस आम्हाला माहिती पुरवत होता. मस्कतमधल्या इमारती, किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज, नांगरून ठेवलेली ओमानच्या सुलतानाची मोठी विशेष बोट, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहत होतो. एका इमारतीकडे इशारा करत गाईडने आम्हाला सांगितले की ते मस्कतमधले सर्वात आरामदायी आणि सर्वाधिक महागडे हॉटेल होते. रिट्झ-कार्लटन कंपनीच्या त्या ‘अल-बुस्तान पॅलेस हॉटेल’ मधल्या आणि जवळच असलेल्या ‘शांग्री ला’ नावाच्या आणखी एका लक्झरी हॉटेलमधल्या सर्व खोल्या काही महिन्यांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी श्री. मुकेश अंबानी यांनी बुक केल्या होत्या म्हणे!
खऱ्या-खोट्याची शहानिशा मात्र आम्हाला करता आली नाही.
अल बुस्तान पॅलेस हॉटेलजवळच्याच एका इमारतीबद्दल आमचा गाईड म्हणाला की तो सुलतानाचा जुना राजवाडा आहे. सुलतान आता तिथे राहत नाही परंतु ओमानला भेट देणारे सर्व देशांचे राष्ट्रपती-पंतप्रधान त्या राजवाड्यातच राहतात. त्या राजवाड्याबद्दल त्याने दिलेली अधिक माहिती अतिशय रोचक होती. जर सुलतान निपुत्रिक असेल किंवा त्याच्या पश्चात राजगादीसाठी दोघा-तिघा वारसांमध्ये चुरस होण्याची शक्यता असेल तर सुलतान मृत्यूपत्रात आपली इच्छा लिहून ठेवतो. ते पत्र एका लिफाफ्यात बंद करून जुन्या राजवाड्यात ठेवले जाते. सुलतानाच्या मृत्यूनंतर तो लिफाफा उघडला जातो आणि दिवंगत सुलतानाने नेमलेला उत्तराधिकारी गादीवर बसतो. १९७० पासून ओमानवर राज्य करणारा सुलतान, काबूस बिन सैद अल सैद, हा जानेवारी २०२० मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे सध्याचा सुलतान हैथम अल तारिक बिन सैद याला त्याच पद्धतीने निवडले गेले.
दिवंगत सुलतान काबूस याने आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत ओमान देशासाठी पुष्कळ काही केले. या देशाची प्रगती कशी होत गेली असेल याची झलक आम्हाला हळूहळू दिसू लागली होती. पण त्याबद्दल विस्तृत माहिती अजून मिळायची होती. दुसर्या दिवशी ‘Oman across the Ages’ नावाचे संग्रहालय पाहताना ती मिळाली.
ओमानमधल्या ऐतिहासिक किल्ल्यांचा आणि राष्ट्रीय संग्रहालयाचा दौरा करायला आम्ही दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर बाहेर पडलो.
यात्रा कंपनीसोबत जाणाऱ्यांना, यात्रा संयोजकांकडून मिळणाऱ्या “उद्या ६-७-८” किंवा “उद्या ७-८-९” अशा सूचनांची सवय असेल. “उद्या ६-७-८” या संक्षिप्त सूचनेचा अर्थ असा असतो की “बेड टी सहा वाजता मिळेल, नाश्ता सात वाजता खायचाय, आणि बस आठ वाजता निघेल”!
यातली अखेरची वेळ सर्वात महत्त्वाची असते. तिचे पालन न करणाऱ्यांची, संयोजकांकडून सौम्य शब्दात, आणि सहप्रवाशांकडून तिखट शब्दात, किंवा बोलके हातवारे आणि नेत्रपल्लवीद्वारे ‘पूजा’ होते हेही अनेकांना माहीत असावे!
पण आमची कौटुंबिक सहल असल्याने हे सगळे आम्हाला लागूच नव्हते! कारण आमच्यातले ‘लेट लतीफ’ निवांतच होते आणि इतरांच्या सौम्य कोपरखळ्यांचाही आनंद लुटत होते! परंतु, सगळे वेळापत्रक आमच्याच हातात असल्याने आम्ही फारशी फिकीर करत नव्हतो. या निमित्ताने यात्रा कंपनीच्या संयोजकांना त्यांच्या संयमासाठी मनोमन सलाम मात्र करावासा वाटला!
आमच्यासोबत ‘अल-नासर’ नावाचा एक जेमतेम तिशीचा तरुण, स्थानिक वाटाड्या म्हणून आला होता. आमची मिनीबस मस्कतहून निझवाच्या दिशेने निघाली. खिडकीतून मस्कत दिसत होते. इथल्या जवळपास सर्वच इमारती उदी रंगाच्या किंवा पांढऱ्याशुभ्र आहेत. शहरी भागात बहुमजली इमारती आहेत, परंतु इतरत्र बहुतांशी बैठी अथवा दुमजली घरेच दिसतात. काही घरांच्या आवारात तुरळक फुलझाडे दिसली. पण मोठ्या हमरस्त्यावर आल्यानंतर मात्र दुतर्फा खडकाळ, डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नव्हते. एक वैशिष्ट्य मात्र सगळीकडे जाणवले, की गावातले रस्ते आणि मुख्य हमरस्ते हे सगळे इतके छान, मखमली होते की पोटातले पाणीही हलले नाही!
अल-नासर म्हणाला होता, “वाटेत तुम्हाला मी
‘डेट फॅक्टरी’ दाखवणार आहे. ” निझवाच्या अलीकडे एका ‘सूक’ जवळ आमची मिनीबस थांबली. अरबी भाषेत बाजाराला ‘सूक’ म्हणतात. उत्साहात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांना हा शब्द ऐकून निश्चितच सुख होईल!
डेट, म्हणजेच खजूर हे फळ म्हणजे वाळवंटातल्या लोकांसाठी हापूस आंब्याहूनही श्रेष्ठ! या प्रदेशात कॉफी प्यायची प्रथा आपल्याकडच्या चहापानासारखीच आणि तितकीच जुनी आहे. वेलची घातलेल्या काळ्या कॉफीच्या घुटक्यांसोबत खजूराचा आस्वाद इथे सर्रास घेतला जातो.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈




