श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “अग्निरूपेण संस्थिता…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भस्मासूराची राखरांगोळी करण्यासाठी हृदयात अग्निचा संचार व्हावा लागतो… आणि हा अग्नी प्रज्वलित व्हावा यासाठी मुखाने त्या अग्नीला आवाहन करावे लागते… मरणावर चालून जाताना एकाच वेळी हजारो मुखांतून ज्वाला माता की जय! असा जयकारा उच्चारला जातो… आणि उर्वरित कार्यभार अग्नी देवता तिच्या शिरावर घेते!
भारतीय सैन्यातील Gentlemen Warriors अर्थात सभ्य, सुसंस्कृत लढवय्ये अशी ख्याती असलेले डोग्रा सैनिक जेंव्हा सैनिकी कारवाईस निघतात, आनंदाचे क्षण साजरे करतात तेंव्हा त्यांची पहाडी गर्जना असते… ज्वाला माता की जय!
जळी, स्थळी, अग्नी आणि पाषाणी आपल्या देवता वास करतात! पाषाण कितीही कठीण असला तरी त्याच्यातून भावनांचा झरा प्रवाहित करण्याची मानवी मनांत शक्ती असते. आभाळातून बर्फ पडतो हे जरी खरं असलं तरी त्या बर्फाने मनातल्या शिवलिंगाचं दृश्य स्वरूप धारण केलं तर तो बर्फच शिवस्वरूप होऊन जातो! अग्नीचं तरी काय निराळं असतं… प्राणिसृष्टि सदैव सचेतन राखण्यासाठी जे चैतन्य आवश्यक असतं त्यासाठी अग्नीच कारणीभूत. अशावेळी या अग्नीची एक पुसटशी ज्वालासुद्धा देवता बनते!
अग्नी प्रज्वलित होण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते हे कुणीही नाकारणार नाही, पण या इंधनाचा स्रोत, त्याची निर्मिती कुणीतरी करत असेलच… आणि निर्मितीचे पितृत्व निसर्गाच्या भाळी स्पष्टपणे गोंदवलेलं दिसतं!
सुमारे हजार वर्षांपूर्वी देवभूमी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एका पर्वताच्या पायथ्याशी एकाच वेळी नऊ ज्वाला प्रकटल्या असं इतिहास सांगतो… आणि हे उघड्या डोळ्यांना दिसतं… आणि स्पर्शाला जाणवतं!
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि सामूहिक मानसशास्त्र यांच्यात मानवी मनाची शक्ती अजेय ठरते. एखाद्या घटनेचा अर्थ कसा लावायचा ते समूह ठरवतो… आणि त्याचा निर्णय शिरसावंद्य मानला पाहिजे, असा संकेत आहे!
भूगर्भातून वायू उत्सर्जित होत राहतो आणि त्याला अग्निचा स्पर्श घडल्यास त्यातून ज्योत उमलते हे साहजिकच. परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशात, विशिष्ट ठिकाणी असं घडणं याला दैवी चमत्कार अशी संज्ञा प्राप्त होणंही काही आश्चर्याचं नाही.
मनातील भावनांच्या ज्योती मालवून टाकणं शक्य नसतं. भौतिक ज्योत फुंकून टाकता येते… पण इथं तर तेही शक्य झालेलं नाही आजवर. तरवारीच्या जोरावर तसं करूनही बघितलं गेलं… पण ज्योती आजही लवलवत आहेतच. भूगर्भ वायूतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले आहेत. किमान याक्षणापर्यंत तरी कुणाला स्रोत समजला नाही… ! असो.
मानवी बुद्धीच्या, आकलन शक्तीच्या पल्याड बरंच काही असतं. एखाद्या श्वानाला जो गंध जाणवतो तो विकसित मानवी घ्राणेंद्रिय टिपू शकत नाहीत… याचाच अर्थ आपल्याला मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणे किंवा न करणे यावर सर्वसामान्य मानवी व्यवहाराचे काहीही अवलंबून नाही! यास्तव सामान्यत्वाचा छाप घेऊन जगणाऱ्यांनी चमत्कारांना नमस्कार करणे क्रमप्राप्तच असते.
जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी डोग्रा नावाच्या समाजसमूहातून अत्यंत नीडर, कर्तव्यदक्ष, कणखर आणि त्याचवेळी सुसंस्कृत, सभ्य सैनिकही जन्म घेतात. त्यांच्या माध्यमातून भारत भूमीच्या पर्वतीय सीमा अभेद्य आहेत. या सैनिकांनी ज्वाला मातेला त्यांची रक्षक, पूज्य आणि स्मरणीय देवता मानली आहे. आणि याच भक्तीचा आधारे त्यांनी शक्तीची जोपासना केली आहे.
ज्वालामुखी, ज्वालाजी अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राचा जीर्णोद्धार, विकास डोग्रा सैनिक मोठ्या आस्थेने करत असतात, हे लक्षणीय आहे!
अखेरीस, भारतभूमी देवता मानली असता तिची अशी पूजा बांधणे सर्वथा वंदनीय मानले पाहिजे!
सैनिक आहेत म्हणून देश आहे… आणि हे सैनिक जिथे माथा टेकवतात.. ते ठिकाण आपल्यालाही पूजनीय असावे!
यानिमित्ताने कर्तव्यं अन्वात्मा अर्थात मृत्यूआधी कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणारे डोग्रा सैनिक आणि व्याघ्रावर आरूढ ज्वालामाता यांना नमस्कार.. जय हिंद… जय हिंद की सेना!
(धरमशाला/धर्मशाला येथे स्थापित war memorial पाहण्यासारखे आहे. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात व्हावे!)
(लेखात व्यक्त केलेल्या भावना माझ्या वैयक्तिक आहेत. हिमाचल प्रवासातून..)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





