वाचताना वेचलेले
☆ इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही… – लेखक : वैद्य सुविनय वि. दामले ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆
☆
‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.’
हे वाक्य प्रत्येकानं लक्षात ठेवायलाच हवं.
आणखी असंच एक वाक्य आहे, ‘हेही दिवस जातील.’
खूप मोठा अर्थ भरला आहे या वाक्यांमागे.
प्रसंग एक
दवाखान्यात एक माऊली आली. म्हणाली,
“गणेशजी येताहेत, पाळी पुढे जाण्यासाठी काही तरी उपाय सांगा. या वर्षी वरसल आमची आहे. घरात करणारं आणखी कुणीच नाही. कसं होणार सगळं ? त्यात श्री सत्यनारायण महापूजा देखील ठरवली आहे. आणि यांची कामं काही संपत नाहीत.मलाच सगळं बघायचंय.”
तिला हे वाक्य ऐकवलं,
“इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.” तिने एकदम चापकन माझ्याकडे बघितलं, म्हणाली,” अहो,पण कसं शक्य आहे? नैवेद्य कोण करणार ? साफसफाई, आवराआवर मीच करणार.”
म्हटलं,”एक वर्ष बाजूला शांतपणे बसून बघ. कसं होतं साळसूदपणाने ते.. सगळं अगदी साग्रसंगीत होणार नाही, पंचपक्वान्न होणार नाहीत, पण निदान वरणभात आणि गुळखोबर्याचा नैवेद्य तरी गणेशजींना मिळेल की नाही ? तेवढं नवरा करू शकेल; नव्हे त्याला करता यायलाच हवं. नाहीतर एवढ्या वर्षात काय शिकला ?”
म्हणाली,” तेही खरंच, कधीतरी करता यायलाच हवं. उद्या कुणाचा काय भरोसा ? आज आहे तर उद्या नसूसुद्धा… म्हणूनच एक वाक्य कायमचं लक्षात ठेवावं,
इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.
प्रसंग दोन –
“मला लवकर ठीक करा, डाॅक्टर. कॅश काऊंटरची जबाबदारी माझ्यावरच असते. माझ्याशिवाय कुणाला काही माहिती नाही. जरा स्ट्राँग औषध द्या.”
त्यांना म्हटलं,
‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.
म्हटलं, तुला औषध लागूच पडलं नाही आणि उद्या तू बॅंकेत गेला नाहीस तर काय होईल?”
थोडा वेळ विचार करून म्हणाला,” कॅश काऊंटरवर दुसरा कुणीतरी क्लार्क येईल. काम थोडं सावकाश होईल, पण अडणार नाही…. बॅंक सुरूच राहील.”
“म्हणूनच म्हणतोय,
इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.”
“खरं आहे” म्हणाला.
प्रसंग तीन –
“डाॅक्टर, आम्हाला मूल होत नाही.खूप प्रयत्न केले पण यश येत नाही.”
म्हटलं, “मूल कशाला हवंय ? काय फरक पडणार आहे त्याने ?”
“असं कसं म्हणता डाॅक्टर, एखादं मूल तर हवंच ना. पुढील पिढी निर्माण करायला हवीच.” ती म्हणाली.
मी विचारलं,
“आणि तुम्हाला मूल नाही म्हणून जगावर काय मोठ्ठासा फरक पडणार आहे ?”
“असाच विचार जर राजमाता जिजाबाईनी केला असता तर ?” तिचा प्रतिप्रश्न.
“त्यासाठी आधी तुला जिजामाता व्हायची तयारी ठेव.”
” आणि ज्यांना मुलं आहेत, ती कुठे समाधानाने जगत आहेत ?”
यावर ती दोघंही निरूत्तर.
म्हटलं,
” जेव्हा ईश्वर एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तिला सामोरं जायचं आणि स्वीकारायचं एवढंच आपल्या हाती असतं,
बाकी इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.
प्रसंग चार –
दवाखान्यातील स्टाफ म्हणाली, “मला एक दिवसाची रजा पाहिजे.”
“का, कशासाठी, कोणासाठी असल्या प्रश्नात मी स्वतः कधी गुंतून रहात नाही, कारण मला माहीत आहे, इथे कुणाचं कुणावाचून अडत नाही.”
रजा लगेच मान्य करून मी मोकळा होतो. दवाखानाही त्यादिवशी सुरळीत पार पडतो.
प्रसंग पाच –
दवाखान्यातील एका स्टाफला अचानक कामावरून कमी करावं लागणार. अशी धर्मबाह्य कृती तिने केल्यावर जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, तिचे दवाखान्यासाठी झोकून देऊन काम करणं आठवलं.आपलं म्हणून काम करण्याची वृत्ती आठवली.तिचा सेवाभाव, तळमळ, संतुष्टपणा, डॅशिंग व्यक्तिमत्त्व या सर्वापेक्षा जेव्हा तिचा एक दोष ठळकपणे दिसू लागला, तेव्हा माझेच वाक्य मला आठवलं,
“इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.”
लगेचच तिला कामावरून कमी केलं. तिच्या जागी अन्य दुसरी एक मुलगी मिळाली देखील.
प्रसंग सहा –
आमच्यातल्या एकाच्या लग्नाचं निमंत्रण मला जाणीवपूर्वक दिलं गेलं नव्हतं. मनाला फार झोंबलं. रागही आला.मनाला समजावलं,’ तुझ्या न जाण्यानं कुणाचं काही अडत नाहीये. लग्नाला तू गेला नाहीस, म्हणून लग्न लागणं थांबणार नाहीये. विनाकारण वाद वाढवून, तू उगाच स्वतःला नको तेवढं मोठं करवून घेतोयस.. तू नसलास तरी कुणाचं काऽऽही अडणार नाहीये.’पटलं… आणि विचारांची गाडी पुढे निघाली
प्रसंग सात –
चार पुरूषार्थावर आधारीत समाजरचना होती. मोक्षप्राप्तीसाठी जगायचं होतं.
आमच्या घरातील आजोबा, आज्जींची एक अख्खी पिढी स्वर्गस्थ होताना मी पाहिली आहे. त्यानी पुढील पिढीला दिलेले संस्कार, शिकवण घेऊन एक पिढी तयार झाली. कोणत्याही संस्कार वर्ग वा गर्भ संस्कार वर्गात न जाता घडलेली वडिलांची पिढीदेखील खूप उत्तम होती. आर्थिक दृष्ट्या चणचण असतानाही बारा चौदा बहिणभावंडे छान एकत्र नांदत होती. आयोडीनयुक्त नमक न खातादेखील बुद्धिमान होती. वारसा पुढे देण्याचे काम गुरूजींकरवी सुरू होते.
त्याहीनंतरची आमची पिढी तीन चार संख्येवर येऊन थांबली. आर्थिक सुबत्ता होती. पण एकमेकांना द्यायचा वेळ कमी होत गेला. नंतरची पिढी एक किंवा दोन बस्स पर्यंत घसरली. मार्कांचे परसेंटेज मात्र खूपच वाढले. गुरुजीचे रूपांतर सर आणि मॅडममध्ये झाले. आईवडिलांचे एकत्रित मार्क मुलाला मिळू लागले. पण तोंडदेखलेपणा सुरू झाला. याच पिढीने मोबाईलचे वेड लावले. नातेसंबंध ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन जुळू लागले. आईवडिलांच्या इच्छेविरूद्ध शिक्षण आणि विवाह होऊ लागले. ग्लोबलायझेशन क्रांतीमुळे जग खूप जवळ आले; पण माणसे एकमेकांपासून मनाने लांब होत गेली. सर आणि मॅडमची जागा टीचरनी घेतली. संस्कार वर्ग आणि गर्भसंस्कार वर्ग सुरू झाले.
एवढे सगळे होऊनही जग पुढे जातच रहातं. कुणाचं कुणावाचून फार अडलेलं नसतं. आपला खास व्यवसाय, कुटुंब काबीला आणि आपलं स्वतंत्र विश्व भिन्न जाती धर्मातही निर्माण होतं.
हे असंच चालायचं…
तसं बघायला गेलो तर
आपल्याकडील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ एकमेकांवर अवलंबून होते. पण काळाच्या ओघात हे सिलॅबसमधूनच गायब झाले.
प्रसंग आठ-
गणेशोत्सव काळात दोन्ही- तिन्ही दिवस दवाखाना सुरू ठेवावा का, असा विचार मनात आला, पण लगेचच विचार बदलला, याच काळात अनेक चाकरमानी कोकणवासीय कोकणात येणार तेव्हा ते माझ्या दवाखान्यात येऊन पुढील औषधोपचार माझ्याकडून ठरवून घेऊ शकतील, म्हणून दवाखाना बंद नको.
पण लगेचच दुसरा विचार आला, की मी माझ्या कुटुंबीयांसाठी माझा वेळ कधी देणार ? तो या निमित्ताने देता येईल, चार नवीन जुने चेहेरे दिसतील, सुखदुःखाच्या गोष्टी करता येतील, अनेक भाऊबंध गोळा होतील, पारंपारिक भजनं, आरत्या, उसळीचा दरवळ, मोदकांच्या पंगती, चढ्या आणि खड्या आवाजात देवे म्हणणं, सगळ्याचा आनंद घेता येईल.
घरचे मोदक वळायला आणि इतर आवराआवर करायला दुसर्या तिसर्या पिढीतील माणसं येतच होती.
आणि दवाखाना बंद ठेवून, सणाच्या निमित्ताने घरच्या व्यक्तींसमवेत मिळून मिसळून रहावं हा विचार पण तसा चूक नव्हता. तसं बघितलं तर मी दवाखान्यात नसलो म्हणूनही माझे सगळे रुग्ण काही लगेच देवाघरी जाणार नाहीत, कारण इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.मी मदतीला नसलो तर गावातील, तालुक्यातील, जिल्ह्य़ातील अन्य वैद्य मंडळी आहेतच की…
मोदक करायला मी नसलो तरी मोदक करून होणारच. भजनाचा फेरही होणार, एकमागून एक पंगतीही उठणार..
जरा अहंकार सोडून बघा, किती मजा आहे, एकत्र रहाण्यात, जगण्यात !
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
जगात भरला, दिशात उरला
मोद विहरतो चहुकडे.
जग म्हणतं, तू नाही आलास तरी चालेल, इथे कुणाचं कुणावाचून अडत नसतं. आमचा आनंद आम्ही घेणारच.
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय ?
जन पळभर म्हणतील हाय हाय…
इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.
जगाचं रहाट गाडगं तसंच पुढे सरकत असतं.
‘हेही दिवस जातील’असं म्हणत पुढे जात रहायचं असतं.
☆
लेखक:वैद्य सुविनय वि. दामले
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




