श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका शाळेतील आठव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याला चोर या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. त्याने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे तुम्हालाही विचार करायला लावतील. त्याचा निबंध असा…..

राष्ट्राच्या अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चोर होय. तो या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. राष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्योग पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण मी आता यावर आणखीन काही प्रकाश टाकू इच्छितो.

चोरांपासूनच संरक्षणासाठी तिजोऱ्या, कपाटे, कुलपे, बनविली जातात. या वस्तू बनविण्याच्या उद्योगामुळे पुष्कळ कारखाने यात गुंतले आहेत. त्यायोगे खूप कामगारांना रोजगार मिळतो. अगदी सोसायटीत किंवा बंगल्यातही कंपाउंड असतात, त्याला गेट असतात व गेटवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्यांना नोकऱ्या मिळतात. इतरही काही कारागिरांना पोटासाठी पैसे मिळू शकतात. त्यांचे व्यवसाय म्हणजे खिडक्या दारांवर जाळ्या बसविणे, कुलपे बसविणे इत्यादी. चोरांमुळेच घरे, दुकाने, शाळा-कॉलेजेस, कचेऱ्या आणि कारखाने सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, आणि अशा इतर साधनांची निर्मिती करीत राहतात आणि या योगेही अनेक रोजगार निर्माण होतात.

पोलीस, वकील, न्यायाधीश, कोर्ट-कर्मचारी, अशा अनेक लोकांची नेमणूक चोरांमुळेच होते. शिवाय पोलिसांच्या मदतीसाठी बॅरिकेड, शस्त्रे, बंदुकीतील गोळ्यांचे पट्टे, गणवेश, वाहने, गाड्या, मोटरसायकली अशा बऱ्याच वहानांची खरेदी केली जाते. त्यामुळे देशाच्या आर्थिक उलाढालीस चालनाच मिळते.

शिवाय कारागृहातील कर्मचारी, ज्वेलर्सच्या दुकानातील रखवालदार, यांना चोरांमुळेच नोकऱ्या मिळतात. चोर कैदी म्हणून कारागृहात असताना अनेक वस्तूंची निर्मिती करीत असतात, आणि त्यांच्या विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळू शकते.

जेव्हा मोबाईल, लॅपटॉप, मोटारी, बाईक्स, इ. गोष्टी चोरीला जातात तेव्हा त्यांची नक्कीच पुन्हा खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारही वाढतो. खूप प्रसिद्ध अट्टल चोर राजकारणात जातात आणि तेथेही घोटाळे करतात. मात्र अशा राजकीय चोरांचा देशाच्या अर्थकारणाला अजिबात फायदा होत नाही कारण ते देशासाठी नाही तर स्वतःसाठीच जगत असतात. असो.

तसेच ‘ चोर ‘ या शब्दामुळेच चित्रपटसृष्टीला प्रसिद्धी आणि अर्थही मिळतो. उदाहरणार्थ ‘चोरी चोरी’, ‘चोरी मेरा काम’, ‘चितचोर’, ‘चोर मचाये शोर’, ‘चोरोंकी बारात’, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ इत्यादी इत्यादी.

आणि त्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी कित्येक लोकांना कित्येक दिवस रोजगार मिळतो.

आपली मराठी भाषाही ‘चोर’ या एक शब्दावरून आलेल्या कितीतरी म्हणींमधून समृद्ध झाली आहे. उदाहरणार्थ – – चोरावर मोर / चोराच्या मनात चांदणे/ चोर सोडून संन्याशाला फाशी / चोर तो चोर वर शिरजोर.. इत्यादी.

अजूनही बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण एकंदरीतच देशाच्या आर्थिक प्रगतीत चोरांचा वाटा हा वाखाणण्यासारखाच आहे हे मात्र नाकारता येणार नाही असं माझं ठाम मत आहे..

…. शिक्षकांनी या संशोधनपूर्ण निबंधास 100 गुण देऊन त्या विद्यार्थ्याची गणना मेरिट लिस्टमध्ये सुद्धा केली आहे.

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments