वाचताना वेचलेले
वजनकाटा ठेवला झाकून… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर
परवा आमच्या घरी एक सुशिक्षित महिला तिच्या तरुण मुलीला घेऊन आली होती. त्यांच्या ओळखीच्या एका महिलेला महिला मदत केंद्रात काही काम मिळेल का, याची चौकशी करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्या दुरून आल्यामुळे मी त्यांच्यासाठी पोहे भिजवले.
दोघी मायलेकी स्वयंपाकघरात येऊन बसल्या. त्या मुलीला म्हणाल्या, “काकूंना मदत कर.” मी मोठ्या कौतुकाने त्यांच्या मुलीसमोर कोथिंबीर ठेवली आणि तिला निवडायला सांगितली. कांदा चिरताना सहज त्या मुलीकडे पाहिलं, तर ती दोन्ही हातात कोथिंबिरीची काडी धरून खाली-वर पाहत होती. मी तिच्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यानंतर तिने विचारले,
“काकू, ट्विग्ज ठेवायच्या की फक्त पानं ठेवायची?”
“तू घरी जशी निवडतेस, तशीच निवड.”
मी म्हणाले. मग त्या मुलीने तिच्या आईकडे पाहिलं.
दोघीही मायलेकी ‘दृष्टादृष्ट विजये होआवेजी…’ अशा अद्भुत पद्धतीने एकमेकींकडे बघू लागल्या. मग मी पुढे होऊन डाव्या हातात एक काडी घेतली आणि कोवळ्या देठांसह पाने तोडून तिला कोथिंबीर कशी निवडायची, ते दाखवले. मी दोन-तीन दांड्या तोडून दाखविल्यानंतर तिने लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली,
“ओह… ओक्के…”
मग ती अत्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक कोथिंबीर निवडू लागली.
“अहो मॅडम, आम्ही तिला घरातले कोणतेच काम करू देत नाही. तू फक्त तुझा अभ्यास कर, असे आम्ही तिला सांगितले आहे…”
तिची आई अभिमानाने मला म्हणाली.
मुलीला घरातले काम करू न देण्यात कसला अभिमान आहे, ते मला समजत नाही.
पंधरा वर्षाच्या त्या मुलीला साधी कोथिंबीर निवडता येत नाही, याचे मला खरोखर आश्चर्य वाटले. माझा मुलगा पाचवीत असल्यापासून व्यवस्थित कोथिंबीर निवडतो. तो काही रोज कोथिंबीर निवडत नाही, पण त्याला कशी निवडायची ते पाहून पाहून माहीत आहे.
विशिष्ट क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे करिअर किंवा कौशल्य असणाऱ्या व्यक्तींकडून कोथिंबीर निवडण्याची अपेक्षा ठेवू नये; परंतु सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुला-मुलींना हे कौशल्य यायला काही हरकत नसावी, असे वाटते.
काही जीवनावश्यक कौशल्ये योग्य वेळी मुला-मुलींना शिकवली पाहिजेत. इथे लिंगभेद न करता सगळी कामे दोघांना आली पाहिजेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांना भाकरी करता येत नाही अशा अनेक महिला मला माहीत आहेत. भाकरी करता येणे, हे जगातले सर्वोच्च कौशल्य नव्हे. पण स्वतःला खाण्यापुरता स्वयंपाक करता येणे निश्चितच गरजेचे आहे.
आमच्या ओळखीतल्या एका उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबात त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहणे सुरू आहे. त्यांचा मुलगा पुण्यात शिकला आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. बाहेर एकटा राहिल्यामुळे त्याला स्वयंपाक आणि घरातली कामे चांगली करता येतात, असे त्याच्या आईने सांगितले. त्यांनी मोठ्या शहरातल्या काही कमावत्या मुली पाहिल्या. पण त्या मुलींनी ‘घरातली कामे करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही,’ असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्याची आई आता खेड्यावरच्या कमी शिकलेल्या मुली शोधत आहे.
मुलगा असो किंवा मुलगी, आयुष्यात घरातली सगळी कामे कधी ना कधी करावीच लागतात. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी स्वयंपाक करण्यात किंवा इतर कामे करण्यात काही कमीपणा आहे असे मुलींना का वाटत असावे?
मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी दैनंदिन कामे कितीही क्षुल्लक वाटली तरी ती महत्त्वाचीच असतात. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या कामांचे महत्त्व कमी होत नाही.
टापटीप, नीटनेटकेपणा, घरगुती स्वच्छता याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही याची सारखीच गरज आहे. कमावत्या मुलींनी घरातली कामे करण्यात काही कमीपणा आहे, अशी विचित्र विचारधारा पाहिली की आश्चर्य वाटते.
महात्मा गांधींनी ‘नई तालीम’ ही शिक्षण पद्धती सुरू केली होती. इथे विद्यार्थ्यांना अन्न पिकविण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व प्रकारचे जीवनावश्यक शिक्षण द्यावे, असे त्यांचे मत होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नाही आणि कुठल्याही कामाची लाज वाटते कामा नये, असा त्यापाठचा विचार होता.
पूर्वी जिल्हा परिषद शाळांना ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ असे नाव दिले जायचे.
जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये सर्वांनी शिकली पाहिजेत, अशी यामागची विचारधारा होती. आपण कितीही उच्च-अत्युच्च शिक्षण घेतले तरी भूक लागल्यावर पटकन दोन पोळ्या करून खाता यायला पाहिजेत. डाळ, भात, खिचडी करता आली पाहिजे.
“आम्ही आमच्या मुलींना अजिबात काम सांगत नाही.” असे आजकाल अनेक आया बोलताना आढळतात. पण “आम्ही आमच्या मुलींना अजिबात मोबाईल वापरू देत नाही,” असे बोलणारी मात्र एकही आई सापडत नाही. दिवसाचे 24 तास कुणीच अभ्यास करत नसते. यांच्या मुली अखंड मोबाईलमध्ये मुंडी खुपसून बसलेल्या यांना चालतात. घरातली कामे करताना मात्र चालत नाहीत.
मुला-मुलींच्या हातात आयते ताट द्यायचे, इथपर्यंत ठीक आहे; पण जेवल्यानंतर ताट सिंकमध्ये नेऊन टाकावे, एवढे पण यांना जमत नसेल तर ही काही यांच्या उज्वल भविष्याची नांदी नाही.
सगळ्यात शेवटचा आणि गंभीर प्रश्न- या सगळ्या मुली श्रीमंत घरात गेल्या, तर नोकर चाकर ठेवू शकतात किंवा कामासाठी अत्याधुनिक मशीन्स वापरू शकतात. पण या स्वतःच कमी कमावत असतील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात राहायची वेळ आली, तर या काय करणार? त्यातही त्या अजिबात कमावत नसतील आणि गरिबीत राहायची वेळ आली तर ‘आम्हाला कामाची सवय नाही,’ असे म्हणून यांचा निभाव लागेल का?
भविष्यात कधीतरी स्वतःचा संसार सुरू केल्यानंतर जर यांना घरातली कामे करायची अशीच लाज वाटत राहिली तर त्यांचं कुटुंब चालणार कसे? आपल्या मुलांनी कामच करायचे नाही, असल्या कुठल्यातरी भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन आपण नवीन पिढीचे नुकसान तर करत नाही ना, याचा प्रत्येक पालकाने शांतपणे विचार केला पाहिजे.
☆
लेखिका: श्रीमती अमृता खंडेराव.
प्रस्तुती: श्रीमती प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



